आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Champala Desarada Investigation At Aurangabad

झाडाझडती: देसरडा यांच्या फर्मची चौकशी; हेराफेरी केल्याचा संशय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नामवंत उद्योगपती चंपालाल देसरडा यांच्या शहरातील सात कंपन्यांसह राहत्या घरात असलेल्या मुख्य कार्यालयात केंद्रीय अबकारी विभागाने गुरुवारी सकाळी नऊ वाजता अकस्मात भेट देऊन चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरूच होती.

उद्योगपती देसरडा यांच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये पेपर प्रॉडक्टसाठी लागणार्‍या यंत्रांचे उत्पादन केले जाते. पॅरासन मशिनरी, प्रतिष्ठा अलॉय कास्टिंग, पॅरासन एक, दोन, तीन, सनमून स्लीव्ह आणि एसएसयू अशा कंपन्या आहेत. या कंपन्यांचे मुख्य कार्यालय जालना रोडवरील व्यंकटेशनगर येथील त्यांच्या राहत्या घरात आहे. देसरडा प्रतिष्ठानच्या पॅरासन सनमून कॉर्पोरेट ऑफिसवर गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून केंद्रीय अबकारी अधिकार्‍यांच्या वेगवेगळ्या पाच पथकांनी चौकशी सुरू केली. एकाच वेळी आठ ठिकाणी होत असलेल्या चौकशीबाबत गोपनीयता पाळत मीडियाला दूरच ठेवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चौकशीबाबत दै. ‘दिव्य मराठी’ने देसरडा यांच्या व्यंकटेशनगरमधील कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी एका अधिकार्‍याने पुढे येत सांगितले, ही गोपनीय चौकशी असून आत्ता तुम्हाला काहीच माहिती देता येणार नाही.

शुक्रवारी सकाळी दिल्लीतील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. या कारवाईत कॉर्पोरेट कार्यालयासह कंपन्यांतील अनेक फाइल्स ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्तालाही त्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला.

पोलिसांची मदत नाही : देसरडा यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असून कंपन्या एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. या चौकशीपूर्वी सेंट्रल एक्साइजच्या अधिकार्‍यांनी पोलिसांना कळवले नाही. मात्र, दोन्ही ठिकाणी काही तरी चौकशी होत असल्याची माहिती पोलिसांना कळाली होती.

हेराफेरी केल्याचा संशय
देसरडा यांच्या वतीने केंद्रीय अबकारी कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून कर चुकवल्याचा संशय आला. संशयानंतर कार्यालयाच्या वतीने गुप्त चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांची हेराफेरी झाल्याचे संकेत मिळाल्याने अकस्मात चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.