आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेच्या बाजारपेठेची नजर शहरातील ग्राहकांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या रोडावली असली तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला शहरी ग्राहकांच्या आगमनाकडे व्यापार्‍यांचे डोळे लागले आहेत. मुहूर्तावरची सोने खरेदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी चांगली राहील, अशी बाजारपेठेला आशा आहे. रविवार संध्याकाळपर्यंतचा बाजाराचा कल पाहता दुष्काळाच्या सावटामुळे बुकिंग्जमध्ये 25 ते 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात एसी, फ्रिज, एलसीडीसाठी काही प्रमाणात विचारणा होत असली, तरी आतापर्यंत बुकिंग झालेले नाही. नेमकी किती प्रमाणात खरेदी होईल, हे प्रत्यक्ष तृतीयेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (13 मे) कळेल. मात्र सध्या एकूणच इलेक्ट्रॉनिक्स मार्केटवर 15-20 टक्के परिणाम झालेला आहे, असे बालाजी इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापक सचिन वर्मा यांनी सांगितले. औरंगाबाद इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि सानिया डिस्ट्रिब्युटर्सचे संचालक पंकज अग्रवाल म्हणाले, दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या किमान तीन दिवस अगोदर मोठय़ा प्रमाणावर बुकिंग होते आणि तृतीयेला नागरिक डिलिव्हरी घेतात. मात्र यंदा बुकिंग फारच कमी आहे. विशेष म्हणजे कंपन्यांच्या ऑफरही नगण्य आहेत. तृतीयेच्या दिवशी आणि आसपासच्या दिवशीही दाट लग्नतिथी आहेत. दरवर्षी अक्षय्य तृतीयेपर्यंत सर्व तिथी संपलेल्या असतात. मात्र यंदा बर्‍याच तिथी असल्याने बहुतेक लोक लग्नसराईमध्ये व्यग्र आहेत. तसेच सोमवारी ‘वर्किंग डे’ आला आहे. या सगळ्याचा खरेदीवर परिणाम होणार असला तरी या वर्षी शहरात अडीच कोटींची इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री होईल, जी दरवर्षी तीन कोटींपेक्षा जास्त असते, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

80 टक्के उलाढाल अपेक्षित : औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, अक्षय्य तृतीयेला ग्रामीण भागातून येणार्‍या ग्राहकांचे प्रमाण अधिक असते. पण यंदा दुष्काळामुळे ते प्रमाण कमी होणार आहे हे स्पष्ट आहे. शिवाय एलबीटीच्या वादामुळे मुंबई, पुण्याहून होणारी मालाची आवकही गेल्या काही दिवसांत कमी झाल्याचा परिणाम जाणवणार आहे. पण लग्नसराईची खरेदी आणि गुंतवणूक म्हणून खरेदी करणार्‍या शहरी ग्राहकांवर व्यापार्‍यांच्या आशा अधिक आहेत. कंपन्यांनी दिलेल्या ऑफर्सदेखील ग्राहकांना आकर्षित करतील असे चित्र आहे. बाजाराचा एकूण मूड पाहता अक्षय्य तृतीयेला जेवढी उलाढाल होत असते, त्याच्या साधारण 75 ते 80 टक्के उलाढाल निश्चित होईल.

सोने खरेदीलाही झळ

सोन्याच्या बुकिंगमध्ये 50 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 27, 900 रुपये प्रतिदहा ग्रॅम (तोळा) असून सोमवारी याच आसपास राहील; पण विक्री कमी होण्याची शक्यता आहे, असे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक अशोक चोपडा यांनी सांगितले. ‘वामन हरी पेठे’च्या जालना रस्त्यावरील दालनाचे व्यवस्थापक विजय शिंदे म्हणाले, मुंबईपेक्षा मराठवाड्यात व औरंगाबाद शहरामध्ये अक्षय्य तृतीयेचे महत्त्व जास्त आहे. त्यामुळे सोमवारी चांगलीच खरेदी होणार. मात्र नेमकी किती व कशा प्रकारची होईल, हे सांगणे कठीण आहे. सोने खरेदीविषयी भाकीत करणे कठीण आहे, असेही शिंदे म्हणाले. औरंगाबाद सराफ संघटनेचे अध्यक्ष अशोक वारेगावकर यांच्यानुसार, दुष्काळाचा काही प्रमाणात परिणाम आहेच. त्याशिवाय सोन्याचे भाव कमी होतील, या आशेवर अनेक ग्राहक असतात आणि भाव पाहून त्या दिवशी खरेदी करतात. मात्र शे-दोनशेचा फरक वगळता भाव स्थिर राहील, असे ते म्हणाले.

दुपारी पाऊण वाजेपर्यंतच मुहूर्त

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सांगताना पं. अनंत पांडव म्हणाले की, हा पूर्ण मुहूर्त आहे. कुठलाही क्षय नसलेला असल्याने अक्षय्य मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेली सोन्याची खरेदी ही अक्षय्य संपन्नता ठेवते असा विश्वास आहे. लग्नासाठीदेखील हा दिवस अतिशय योग्य मानला जातो. सोमवारी अक्षय्य तृतीया दुपारी 12 वाजून 47 मिनिटांपर्यंत असल्याने त्याआधीच महत्त्वाची खरेदी करावी. दुपारी 12 वाजून 24 मि. ते 12 वाजून 48 मि. हा विजय मुहूर्त आहे.


पाव किलो सोन्याची खरेदी

शहरी ग्राहक एकंदर स्थिती-परिस्थिती बघूनच चोखंदळपणे सोने खरेदी करीत असतो. शहरी ग्राहकांमध्ये काल्पनिक भीतीचे प्रमाण जास्त असते आणि काल्पनिक भीती ही वास्तवापेक्षा बहुतेकदा जास्तच असते. ग्रामीण ग्राहक प्रत्यक्ष उन्हाळे-पावसाळे सोसत असतो, लाखोंचे पीक होत्याचे नव्हते झालेलेही पाहत असतो. तो कुठल्याही काल्पनिक भीतीखाली सोने खरेदी न करता थेट खरेदी करतो. अशीच एक साधारण व्यक्ती गुरुपुष्यामृताला चक्क पाव किलो सोने घेऊन गेल्याचा प्रसंगही एका पेढीतून सांगण्यात आला.