आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक बनलेल्या कामगाराची युरोपभरारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - बजाज ऑटो लि. मध्ये 17 वर्षे कामगार म्हणून नोकरी केल्यानंतर स्वत:चा उद्योग सुरू करणारे गजानन नांदूरकर यांनी सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. त्यांच्या डायटेक इंजिनिअरिंगमधील उत्पादने युरोपीय समुदायामध्ये झालेल्या 46 व्या ‘इंटरनॅशनल ट्रेड फेअर’ या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनात मांडण्यात आली. देशभरातून 11 उद्योग, तर महाराष्ट्रातून एकमेव डायटेक इंजिनिअरिंगची या प्रदर्शनासाठी निवड झाली होती. हे प्रदर्शन स्लोव्हेनिया या देशात 11 ते 17 सप्टेंबर दरम्यान भरवण्यात आले होते.

गजानन नांदूरकर यांनी बजाज ऑटोमध्ये 17 वर्षे कामगार म्हणून नोकरी केली. 2002 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र, त्यांच्यातील उद्योजक त्यांना स्वस्थ बसू देईना. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी वाळूज एमआयडीसीमध्ये भाडेतत्त्वावर जागा घेतली. त्यात दोन लेथ यंत्र घेऊन डायटेक इंजिनिअरिंग (प्लॉट क्र. ई-70/45) हा टुल्स अँड डाइज बनवण्याचा उद्योग सुरू केला. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हा उद्योग 6 वर्षे नेटाने केला. त्यानंतर अद्ययावत यंत्रसामग्रीसह तो भरभराटीस नेतानाच अनेक कुटुंबाना उदरनिर्वाहाचा आधार दिला. त्यांच्या कंपनीत सध्या प्रेस टूल डाइज, जिग्ज, फिक्चर्स, गेजेस ऑटोमोबाईल कंपोनंटचे उत्पादन घेतले जात आहे. जिद्द व मेहनतीच्या जोरावर सर्वांना विकासाच्या वाटा सापडतात, याचा प्रत्यय गजानन महादेव यांच्याकडे पाहिल्यानंतर येतो.

सेल्जे शहरात भरले प्रदर्शन
राष्ट्रीय लघु उद्योग निगम लि. यांच्या माध्यमातून देशभरातून 11 उद्योग तर महाराष्ट्रातून एकमेव डायटेक इंजिनिअरिंग या उद्योगाची जागतिक स्तरावरील प्रदर्शनासाठी निवड झाली होती. युरोप खंडातील स्लोवेनिया देशातील सेल्जे शहरात हे प्रदर्शन 11 ते 17 सप्टेंबर दरम्यान चालले.

स्टॉलला पंतप्रधानांची भेट
जागतिक पातळीवरील 46 वे ‘इंटरनॅशनल ट्रेड फेअर’ पाहण्यासाठी स्लोवेनियाच्या पंतप्रधान अलेंका ब्राटू सेक या आल्या होत्या. त्यांनी डायटेक इंजिनिअरिंग उद्योगाने सादर केलेल्या ऑटोमोबाईल कंपोनंटच्या स्टॉलला भेट देऊन प्रशंसा केली. उद्योजक नांदूरकर यांच्याकडून त्यांनी कंपनीच्या उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली.

प्रदर्शनात सहभागाचे र्शेय यांना
या प्रदर्शनात निवड झाल्याचे सर्व र्शेय उद्योजक नांदूरकर यांनी राष्ट्रीय लघु उद्योग निगम लि.चे डीवाय मॅनेजर संजय भोंडेकर, दिल्ली कार्यालयाचे हरजिंदरसिंग सैनी, डायरेक्टर पी. उदयकुमार, निर्देशक उमेशचंद्र शुक्ल यांच्यासह ऋचा ग्रुप, व्हिक्टर गास्केट, पुणे, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्ससह आपल्या सहकार्‍यांना दिले आहे.