आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक दर्जाची उत्पादने, निर्यातीवर लक्ष केंद्रित करा : उद्योजक जगत शहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ८० टक्के बाजारपेठ चीनने पळवली आहे. मेक इन इंडिया या सोहळ्याची उद््घाटनेही चायना मेड टीव्ही झाली. विदेशी लघुउद्योजकांचेही भारतीय बाजारपेठेवर लक्ष आहे. त्यांच्याबरोबर स्पर्धा करावी लागणार असल्यामुळे भारतीय उद्योजकांनी मोबाइल, टीव्ही स्क्रीन उत्पादनात यावे. जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीसह निर्यातही करावी, असे आवाहन गुजरात येथील प्रसिद्ध उद्योजक तथा मोटिव्हेशनल स्पीकर जगत शहा यांनी केले.

सीआयआय संघटनेच्या वतीने भानुदास चव्हाण सभागृहात विद्यार्थी नवोदित उद्योजकांसाठी आयोजित खास व्याख्यान आणि संवादपर कार्यक्रमात ते बोलत होते. सीआयआयचे अध्यक्ष संदीप नागोरी यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी शहा म्हणाले की, भारत देश मोठा आहे. उत्पादन आपल्या देशात चालू आहे, ना मग काही भीती नाही असा विचार करणारे भारतीय लघुउद्योग जागतिक स्पर्धेत मागे आहेत. ते निर्यातीचा विचार करत नाहीत. भारतातच खूप काम अन् संधी आहेत, असे त्यांना वाटते, परंतु आगामी तीन ते चार वर्षांत भारतीय बाजारपेठेचे चित्र बदलेल. आपल्या देशात उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्या विदेशी उद्योजकांची संख्या पाहता आपली बाजारपेठ खूप छोटी होईल. याला बिझनेस थ्रेट असे म्हणतात, ते लघुउद्योजकांनी ओळखले पाहिजे.

गुजरात पॅटर्न आदर्श
गुजरातमधील उद्योग क्षेत्रात राबवलेल्या अनोख्या पॅटर्नमुळे मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. गुजरातची उद्योग क्षेत्रातील वाढ २९ टक्के आहे, तर गत २० वर्षांपासून आपल्या देशाची वाढ १५ टक्क्यांवर स्थिर आहे. गुजरातच्या उद्योजकांनी जगभरातील संधींचा शोध घेत मालाची निर्यात वाढवली, त्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्रातील लघुउद्योजकांनाही अशीच प्रगती करावी, असेही शहा यांनी सांगितले. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मला देशभरात फिरण्याची संधी मिळाली. विदेशातही अनेक वर्षे काम केले. अफगाणिस्तान प्रतिकूल परिस्थितीत उद्योजक कसे उद्योग उभारतात, धडपडीने चालवतात, हेही पाहिले. ३० वर्षे तर तेथे युद्धच सुरू होते, उद्योगांना पुरेशी वीजही मिळत नाही. तेथे भारत सरकारच्या वतीने पहिला पॉवर प्रोजेक्ट होतोय तोही १०० मेगावॅटचा. तेथे अनेक कारखाने जनरेटरवर सुरू आहेत. हा आदर्श भारतीय उद्योजकांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.

चिपचा सर्वाधिक धोका
इलेक्ट्रॉनिक वस्तूत सध्या तरी चीनशिवाय पर्याय नाही. आपण सॅटेलाइट सोडले पण मोबाइलची चिप तयार केली नाही, हीच मोठी चूक झाली. मोबाइल क्रांतीने चीनला श्रीमंत केले. भारताची मोबाइल बाजारपेठ चीनच्या ताब्यात आहे. आता आपण टीव्ही स्क्रीन, मोबाइल चिपचे उत्पादन केले पाहिजे. तरच स्पर्धेत भारत टिकू शकेल, असा इशारा शहा यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...