आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांच्या भांडणात तिसऱ्याला नव्हे, दोघांनाही लाभ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्हा परिषदेवर कुठला पक्ष विराजमान होतो हे आज दि. २३ रोजी लागणाऱ्या निकालानंतर  सकाळी अकरा वाजेपर्यंत समोर येईल. मात्र या निवडणुकीत दाेघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण सार्थ  ठरणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा आहे. 
 
शिवसेना व भाजपच्या  भांडणात दाेघांचाच लाभ होणार, असे चित्र मतदानानंतर दिसून आले. २०१२ च्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ६० गट व पंचायत समितीचे १२० गण होते. गतवेळच्या निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मनसे या नवख्या पक्षाने ८ जागा जिंकून किंगमेकरची भूमिका बजावली होती. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित युतीने लढवूनही सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेसोबत हातमिळवणी करून पाच वर्षे भाजप-सेना युतीला सत्तेबाहेर ठेवले. केवळ दाेघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय २०१२ च्या निवडणुकीत आला. 
२०१७ च्या निवडणुकीत भाजप, शिवसेना एकमेकांविरुद्ध लढली. 
 
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैजापूर व जिल्ह्यातील तुरळक मतदारसंघांत युती पाहावयास मिळाली. मनसेनेही आपला सवतासुभा उभा केला होता. परंतु उमेदवारच न मिळाल्याने हाताच्या बोटावर मोजण्याएवढेही त्यांचे उमेदवार नव्हते. त्यामुळे या वर्षी मनसेची राजकीय ताकद नगण्य असणार आहे. 
 
दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता मिळवण्याची संधी चालून आली होती. परंतु भाजप व शिवसेनेतील  संघर्षाचा लाभ दोन्ही काँग्रेसला घेता आला नाही. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेलाही एकहाती सत्ता मिळणार नाही, असे राजकीय चित्र आहे. परंतु निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षांच्या सदस्यांची संख्या मिनी मंत्रालयाच्या खुर्चीपर्यंत जाईल, असे राजकीय क्षेत्रात बोलले जाते. 
 
आैरंगाबाद, गंगापूर, सिल्लोड व फुलंब्रीत भाजपला बऱ्यापैकी जागा मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर तालुक्यात आपले अस्तित्व कायम राखेेल, तर शिवसेना पुन्हा पैठण, कन्नड व इतर तालुक्यांतील काही जागांवर भरारी घेईल. सिल्लोड, औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यातील अस्तित्व कायम राखण्यासाठी झगडावे लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...