आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवान्याची मुदत संपूनही मांसविक्री सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परवान्याची मुदत संपूनही विद्यानगर वॉर्डासह शहराच्या विविध भागांत खुलेआम मांसविक्री सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याची भूमिका महापालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा घेत असल्याचेही समोर आले आहे.

मनसेचे शहर सचिव संतोष पाटील, विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर डांगे पाटील यांनी संघटनेच्या पातळीवर आणि माहितीच्या अधिकारातही या प्रकाराचा पाठपुरावा केला आहे. त्यात मनपाच्या यंत्रणेचा बोटचेपेपणा स्पष्ट होत आहे. त्यांनी ‘दिव्य मराठी’कडे मांस विक्रेत्यांच्या यादीचा तपशील दिला आहे. त्यानुसार 300 पैकी केवळ 28 विक्रेत्यांकडेच परवाने आहेत. उर्वरितांच्या परवान्यांची मुदत 2006 ते 2011 कालावधीत संपली आहे. त्यांना मनपाच्या अधिकार्‍यांनी केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही केले नाही. अनेकांना तर नोटिसा बजावण्याचेही धैर्य दाखवण्यात आलेले नाही.

आदेशाची अंमलबजावणी नाही
चार सप्टेंबर 2011 रोजी मुख्य पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी वॉर्ड अधिकार्‍यांना अनधिकृत मांसविक्री करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले होते. दुकानास जाळी व काच लावली आहे काय, दुकानावर परवाना क्रमांकाची पाटी आहे काय आदींची चौकशी करावी. या बाबींचे उल्लंघन होत असल्यास पोलिस स्टेशनला माहिती देऊन मुंबई प्रांतिक अधिनियम 1949 चे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करावा, असे त्यात म्हटले होते. त्याची कठोर अंमलबजावणी झालीच नाही.