औरंगाबाद - रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कन्नड घाटातील रस्ता खचल्याने तसेच दरड काेसळल्याने दुरुस्तीसाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल. ताेपर्यंत घाटातून वाहतूक बंद असेल. अाैरंगाबादहून येणारी व जाणारी वाहने राेहिणी, न्यायडाेंगरी, शिऊर बंगलामार्गे वळवण्यात अाल्याने या रस्त्यावर पहिल्याच दिवशी वाहतूक ठप्प झाली. घाट दुरुस्तीच्या कामाचे तीन प्रस्ताव तातडीने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे पाठवण्यात अाले.
दरम्यान, वन विभागाची मंजुरी व इतर प्रलंबित प्रक्रिया पाहता घाटातून बाेगदा तयार करण्याचे काम अजून किमान तीन ते चार वर्षांनी सुरू हाेईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत गोटकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
घाट दुरुस्तीच्या कामाचा पहिला प्रस्ताव संरक्षक भिंतच खचल्याने पुन्हा १० मीटर उंचीची नवीन भिंत उभारून त्यात भराव टाकायचा, दुसरा पर्याय खालून लाेखंडी अँगल टाकून स्लॅब करणे तसेच तिसरा पर्याय म्हणजे डंप काँक्रीट अाेतून त्यात बोल्डर व दगड टाकून काँक्रिटीकरण करायचे. यापैकी काेणताही एक प्रस्ताव मंजूर होऊन रस्ता दुरुस्ती केली जाईल. राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ वरील कन्नड घाटात म्हसोबा मंदिराजवळ रस्ता खचल्याने संरक्षक भिंत दरीत कोसळली. तसेच दाेन ठिकाणी दरडी काेसळल्याने रविवारी रात्रीपासून घाटातून वाहतूक सेवा बंद करण्यात अाली. दुुरुस्तीसाठी दीड ते दाेन महिने वाहतूक नागद तसेच नांदगाव रस्त्यावरून वळवण्यात आली अाहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दाेन महिन्यांपूर्वीच घाट रस्त्याचे डांबरीकरण करण्यात अाले हाेतेे.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व आंध्र प्रदेश या पाच राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. या मार्गावर चाळीसगाव ते कन्नड दरम्यान नऊ कि.मी. लांबीचा औट्रम घाट आहे. या घाटात म्हसोबा मंदिराजवळ शनिवारी सायंकाळी संरक्षक भिंत खचली. याशिवाय रस्त्यावरील डांबर व खडी वाहून गेली. सुदैवाने घाटात या वेळी कुठलेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक व महामार्ग वाहतूक शाखा तसेच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घाटातील वाहतूक बंद केली. घाटातून दररोज चार ते पाच हजार वाहने ये-जा करतात. अामदार उन्मेष पाटील यांनी घाटावर जाऊन माहिती जाणून घेतली.
अधिकाऱ्यांकडून पाहणी: सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत गोटकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कन्नड घाटाची पाहणी केली. संरक्षक भिंतच खचल्याने पुन्हा १० मीटर उंचीची नवीन भिंत उभारून रस्त्याचे डांबरीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी दीड ते दाेन महिने लागणार असल्याचे गोटकर यांनी सांगितले.
तीन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
औट्रम घाटात दरड कोसळण्याचा व रस्ता खचण्याचा धोका असल्याने पोलिस प्रशासनाकडून हा घाट वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जळगाव, धुळे व औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले. तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मार्ग लवकरच कळवण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीफिकेशन काढले जाईल.
बाेगद्याच्या कामाची प्रतीक्षा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यशवंत गोटकर यांनी सांगितले की, कन्नड घाटात हजारो कोटी रुपये खर्च करून बोगदा करण्याचा सरकारचा प्रस्ताव मंजूर आहे. कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे. वन विभागाची परवानगी घेण्यासाठी फायलिंग सुरू आहे. बाेगदा तयार करण्यासाठी अमेरिका अथवा कॅनडातून टनेल मशीन आणावे लागते. हे मशीन तयार करण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे बोगद्याच्या कामास चार वर्षे लागतील, असे गोटकर यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...औट्रम घाटाचे फोटो आणि व्हिडिओ...