आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळमध्ये न जाताही होईल लेणींचे दर्शन; लेसर, थ्री-डी मॅपिंगद्वारे लेणींची हुबेहूब प्रतिकृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - वेरूळ लेणींचे स्थापत्य कसे आहे, त्या कशा कोरल्या गेल्या आदी प्रश्नांची उत्तरे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एका नवीन प्रकल्पामुळे मिळणार आहे. लीडार तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पात लेणींचे थ्री-डी मॅपिंग आणि ई-मॉडेलिंग केले जाईल. यामुळे दुरुस्ती, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणामुळे लेणी प्रत्यक्ष बघणे शक्य नसणाऱ्यांना व्हर्च्युअल इमेजद्वारे लेणीचा हुबेहूब अनुभव मिळू शकेल. लेेणींच्या संवर्धनासाठीही याचा वापर होईल. भारतात प्रथमच वेरूळमध्ये हा प्रयोग होत असून नंतर तो अजिंठ्यातही राबवला जाईल.   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र आणि आयटी विभागातील रामानुजन जिओ स्पेटियल चेअर प्रोफेसर डॉ. सुरेश मेहरोत्रा केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्सच्या (डीएसटी) माध्यमातून हा प्रकल्प साकारणार आहेत. प्रकल्प वेरुळात असल्यामुळे त्यांनी एएसआयच्या विज्ञान शाखेसोबत करार केला आहे. 'थ्री-डी मॅपिंग अँड ई-मॉडेलिंग ऑफ एएसआय साइट थ्रू लीडार’ असे प्रकल्पाचे नाव अाहे. भारतात प्रथमच पुरातत्त्व स्थळावर लीडार म्हणजेच लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. अमेरिका, इटाली आणि रोममध्ये काही स्थळांच्या संवर्धनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. ३ वर्षांच्या प्रकल्पासाठी ७० लाख रुपयांचे बजेट असून हा निधी डीएसटीकडून उपलब्ध होईल. 
  
थ्री-डी मॉडेल करणार 
लीडार तंत्रज्ञानात लेसर स्कॅनरद्वारे लेणींच्या बाहेरील तसेच आतील परिसर फेरो थ्रीडी लेसर स्कॅनर सिस्टिमने स्कॅन केला जातो. एक कॅमेरा लेणीच्या आत आणि बाहेर प्रकाश टाकेल. यावरून लेणीतील विविध भागात प्रकाश पोहोचून तो परत येण्यासाठी लागणारे अचूक अंतर मोजून तिची अंतर्गत रचना, खडकाचा प्रकार, बांधकामाची पद्धत हे बारकावे समजू शकेल. याचा आधार घेऊन लेणीचे थ्री-डी मॉडेल तयार करता येईल. मिळालेल्या डेटावर पॉइंट क्लाऊड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया केली जाईल.
 
संशोधनासाठी फायदा
{ लेणीचे भौगोलिक क्षेत्र निवडण्यामागील कारण शोधता येतील. विविध क्षेत्रातील संशोधकांसाठी फायदेशीर.
{ लीडारमुळे वेरूळ, अजिंठा लेणीचे स्थापत्य, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, लेणीच्या सुरुवातीच्या रूपाची माहिती मिळेल.   
{ भविष्यात लेणी  बंद करण्याची वेळ आली तर तिचा हुबेहूब आभास देण्यासाठी थ्री-डी व्हर्च्युअल मॉडेल उपयोगी ठरेल.   
{ व्हर्च्युअल मॉडेलमुुळे प्रत्यक्ष लेणीत  न जाताही संगणकावर, थिएटरमध्ये लेणी बघू शकता.
 
माहिती समजेल 
या प्रयोगामुळे लेणींविषयी आजपर्यंत समोर न आलेली माहिती समजू शकेल. घरबसल्या संगणकावर लेणीचा व्हर्च्युअल टूर करता येईल - डॉ.सुरेशचंद्र मेहरोत्रा, रामानुजन जिओ स्पेटियल चेअर प्रोफेसर संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभाग, विद्यापीठ.
 
उपयोगी तंत्रज्ञान   
लीडार तंत्रज्ञाना-मुळे लपलेल्या पुरातन वास्तू शोधण्या-बरोबरच अस्तित्वात असणाऱ्या वास्तूंचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन, मूल्यमापन आणि निरीक्षण करणे सोपे जाईल - श्रीकांत मिश्रा, उपअधीक्षक पुरातत्त्व रसायनज्ञ, एएसआय , सायन्स ब्रँच, औरंगाबाद. 
 
नवीन पर्याय अपरिहार्य   
मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय बदलांमुळे लेणी जर्जर होत आहेत. याच्या संवर्धनासाठी नवीन पर्याय शोधणेही अपरिहार्य आहे. पर्यटकांना लेणीत जाणे थांबवणे हा पर्याय नाही. पण लेणींचा व्हर्च्युअल टूर घडवता येऊ शकतो - दीपक गुप्ता, सहायक उपअधीक्षक, पुरातत्त्व रसायनज्ञ, एएसआय, सायन्स ब्रँच, औरंगाबाद.    
बातम्या आणखी आहेत...