आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नहरीचे पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नहर-ए-अंबरीच्यापाण्याची चोरी करणाऱ्या नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे महसूल तथा अल्पसंख्याक विकास औकाफ मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी निधी पांडे यांना दिले.
सोमवारी संध्याकाळी शहरातील पाणचक्कीची खडसे यांनी अचानक पाहणी केली. पाणचक्कीचे पाणी का कमी झाले, अशी विचारणा सीईओ नसीम बानो पटेल यांच्याकडे केली असता पटेल यांनी नागरिक नहर-ए-अंबरीवरून पाण्याचा उपसा करीत असल्याने पाणी पाणचक्कीपर्यंत येत नाही, असे उत्तर देताच नहरीचे पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. या वेळी ना. खडसे यांच्यासोबत आमदार इम्तियाज जलील, नारायण कुचे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, वक्फ बोर्डाच्या प्रभारी सीईओ नसीम बानो पटेल, महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर,आर्किटेक्ट माया वैद्य उपस्थित होते.

बोर्डाचीमालमत्ता, कामकाजाची घेतली माहिती : खडसेयांनी पटेल यांच्या कार्यालयात ३५ मिनिटे बसून वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची, कर्मचाऱ्यांची कामकाजाची माहिती घेतली. पटेल यांनी बोर्डाकडे अपुरे कर्मचारी असल्याचे खडसे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वक्फ बोर्डात कर्मचारी भरती केली जाईल, असे आश्वासन खडसे यांनी दिले. तसेच आर्किटेक्ट माया वैद्य यांनी पाणचक्कीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी काय करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवले. खडसे यांनी मेहमूद दरवाजाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली.

अतिक्रमणे हटवा : खडसेयांनी या वेळी वक्फच्या मालमत्तेची जिल्ह्यानुसार माहिती एकत्र गोळा करण्याचे तसेच बोर्डाच्या उत्पन्नाची माहिती देण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच वक्फच्या मालमत्तेवरील अतिक्रमणांची माहिती गोळा करून ते ताबडतोब हटवण्याच्या सूचना दिल्या. वक्फ बोर्डाच्या सदस्यांनीच जमिनी हडप केल्याचे आ. जलील यांनी ना. एकनाथ खडसे यांना सांगितले असता खडसे म्हणाले, कोणत्या सदस्यांकडे वक्फच्या जमिनी आहेत, माझ्याकडे तक्रार अर्ज द्या. मी कारवाई करतो, असे स्पष्ट केले.

पर्यटक ४५ मिनिटे ताटकळले : ना.खडसे यांचा ताफा येण्यापूर्वी पाणचक्कीमध्ये आलेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढून देण्यात आले. हैदराबादहून आलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा यामुळे हिरमोड झाला. गेटवरून दोन्ही पायांनी अपंग असलेल्या भिकारी मुलाला हाकलून देण्यात आले, तर एका वकिलाने पाणचक्की परिसरातील दर्ग्यामधून महिला आणि वृद्धांना हाकलून लावल्याने पर्यटक नाराज झाले.