आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. शाळांमधील गुरुजींच्या बदल्या रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यात पूर्ण होते. या वर्षीही शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले होते. मात्र, हायकोर्टाने बदली प्रक्रिया संच मान्यतेअभावी थांबवल्याने बदल्यांवर यंदा संक्रात आली असल्याचे बुधवारी समोर आले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हाभरात नऊ हजार ३२८ शिक्षक कार्यरत आहेत. यात गेल्या वर्षी खासगी शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाल्याने त्यांनाही जिल्हा परिषदेच्या शाळांवर सामावून घेण्यात आले होते. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. खासगी शाळेवरच्या शिक्षकांना शहराच्या आसपास येण्याचे वेध लागले होते, तर पूर्वीपासून जिल्हा परिषदेच्या शाळेवर असणाऱ्या शिक्षकांनी गावाजवळच्या अथवा सोयीच्या ठिकाणी जाण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून फील्डिंग सुरू केली होती. काही संघटनेच्या शिक्षकांनी या वेळी महागाईचा परिणाम बदल्यांच्या किमतीवरही होणार असल्याचे सांगत बदल्यांची किंमत दोन लाख रुपयांपर्यंत नेऊन ठेवली होती.
मात्र, बदल्यांपूर्वी काही शिक्षकांनी न्यायालयात जाऊन आरटीईनुसार संचमान्यता नसल्यामुळे संचमान्यता अगोदर पूर्ण करून शिक्षकांचे पदनिर्धारण पूर्ण करावे आणि नंतरच बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली होती. त्यातील तथ्य लक्षात घेऊन हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी संचमान्यता नसल्याने बदली प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ही प्रक्रिया थांबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.
कोणतीही निश्चिती नाही
न्यायालयानेही प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, किती दिवसांपर्यंत हा स्टे असणार आहे, संचमान्यता किती दिवसांपर्यंत करायची, याचे कोणतेच आदेश देण्यात आले नसल्याने शिक्षण विभागाचा जीव भांड्यात पडला आहे. ही प्रक्रिया राज्यभर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांकडून आदेश येण्याची वाट शिक्षण विभाग पाहत असल्याचेही समोर आले.
प्रक्रियेवर स्थगिती
- न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी आरटीईनुसार शिक्षकांची संचमान्यता पदनिर्धारण केले नसल्याने बदली करता येणार नसल्याचे सांगून बदली प्रक्रियेला स्थगिती दिली. उच्च शिक्षण विभागाकडून पुढील आदेश येईपर्यंत काहीच हालचाल करता येणार नाही.
नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी
बातम्या आणखी आहेत...