आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बालाजी शेवाळकर दीड महिन्याच्या रजेवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमधील रेडिओथेरपी विभागाचे डॉक्टर बालाजी शेवाळकर हे दीड महिन्याच्या रजेवर गेले आहेत. डॉ. अमोल उबाळे यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे ते एकटेच या संपूर्ण विभागात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे डॉ. शेवाळकर हे सुटीवर गेल्याची कल्पना वरिष्ठांना नाही. एका लिपिकाकडेच त्यांनी सुटीचा अर्ज दिल्याचे रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी सांगितले.

नव्यानेच स्वतंत्र पातळीवर सुरू झालेल्या शासकीय कॅन्सर रुग्णालयात कसा कारभार सुरू आहे यावर ‘एकच डॉक्टर, तेही खासगीत सक्रिय’ या मथळ्याखाली डीबी स्टारने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर अनेक डॉक्टरांनी तसेच नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. आज चमूने पुन्हा एकदा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चक्कर मारली असता डॉ. शेवाळकर तेथे नव्हते. ते सुटीवर गेल्याचे सांगण्यात आले.

सर्वच जबाबदार अधिकारी रजेवर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे हे सध्या सुटीवर असल्याने त्यांचा भार डॉ. भास्कर खैरे यांच्याकडे आहे. त्यांना कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या कारभाराची कल्पना नाही, तर विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांचा अपघात झाल्याने तेही रजेवर आहेत. त्यामुळे कोण रजेवर गेले, याची कल्पना कुणालाही नाही. मात्र, रुग्णांचे हाल होत नसल्याचा दावा रुग्णालयाच्या प्रभारींनी केला आहे.

80 टक्के सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी तरी रुग्णसेवा प्रामाणिकपणे करावी. - मनोज देशपांडे, नागरिक

मी माझ्या आईच्या उपचारासाठी कॅन्सर रुग्णालयात येतो, पण येथे ताटकळत बसावे लागते. येथे जेवणाची व्यवस्था नाही. रस्त्यावर मिळेल ते खावे लागते. गोविंद जाधव, पैठण

डीबी स्टारची बातमी वाचून कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा कारभार कळला. या विषयात अधिष्ठातांनी लक्ष घालावे. तेथील रिक्त जागाही भराव्यात. - भास्कर पाटील, -वैजापूर

डॉ. उबाळे कार्यरत आहेत
डॉ. अमोल उबाळे हे एक महिन्याच्या नोटीस पिरीयडवर आहेत. त्यामुळे तोपर्यंत ते रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांचा हा कालावधी संपेपर्यंत डॉ. शेवाळकर रुग्णालयात रुजू होतील.- डॉ. सरोजिनी जाधव, प्रभारी प्रमुख, विभागीय कॅन्सर हॉस्पिटल

मी माझ्या एका नातेवाइकाला विभागीय कॅन्सर रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेलो होतो, पण डॉ. शेवाळकरांची भेटच झाली नाही. सतत तीन दिवस जाऊनही त्यांनी रुग्णाला वेळ दिली नाही.- कृष्णा राठोड,शिक्षक

मी अजूनही कार्यरत
मी 30 एप्रिल रोजीच राजीनामा दिला, पण त्यावर कुठलाही निर्णय वरिष्ठांनी अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे मी अजूनही येथे कार्यरत आहे. - डॉ. अमोल उबाळे, सहा. प्राध्यापक रेडिओथेरपी विभाग