आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cancer Hospital Operation In Low Cost In Aurangabad

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये लाखांची कमांडो शस्त्रक्रिया काही हजारांत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कर्करोगामध्ये अतिशय उपयुक्त ठरणारी ‘कमांडो’ ही विशेष शस्त्रक्रिया महिनाभरापासून शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू झाली असून आतापर्यंत 25 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. खासगी रुग्णालयांमध्ये 50 हजार ते एक लाखापर्यंत, तर पुणे-मुंबईला पाच लाखांपर्यंत खर्च येतो; परंतु कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तीन ते पाच हजारापर्यंत खर्च येतो. या शस्त्रक्रियेसाठी खास ‘कमांडो’ टीमही सज्ज आहे.

मागच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये नंदुरबार येथील मणिलाल ठाकरे (वय 55), धोत्रा (ता. पूर्णा) येथील प्रभाकर सोनटक्के (वय 32) तसेच खामगाव (जि. बुलडाणा) येथील कुसुमबाई खापर्डे यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे. यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ही शस्त्रक्रिया होत होती. आता कॅन्सर हॉस्पिटलमध्येही ही शस्त्रक्रिया होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात ही मोठी शस्त्रक्रिया (मेजर सर्जरी) म्हणून गणली जाते आणि तज्ज्ञ शल्यचिकित्सकांशिवाय होऊ शकत नाही. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत असून नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांमध्ये सुमारे 150 मोठय़ा आणि 1000 लहान शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ‘कमांडो’ ही विशेष शस्त्रक्रियाही एका महिन्यापासून सुरू झाली असल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सद्य:स्थितीत हॉस्पिटलमध्ये दर आठवड्यात पाच ते सहा मोठय़ा शस्त्रक्रिया होत आहेत, हे विशेष. अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे व हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या प्रयत्नांनी हॉस्पिटलमध्ये विविध सुधारणा दिसून येत आहेत.

काय आहे ‘कमांडो’ शस्त्रक्रिया?
‘कंबाइन्ड मँडिब्युलर अँड ओरल अँप्रोच’ यालाच ‘कमांडो’ शस्त्रक्रिया म्हटले जाते. हनुवटीचे हाड, गालाच्या चामडीमध्ये तसेच गळ्यापर्यंत जेव्हा कर्करोग पसरतो, तेव्हा तो कॅन्सरग्रस्त भाग एकाच वेळी काढून टाकला जातो आणि त्यालाच ‘कमांडो’ शस्त्रक्रिया म्हटले जाते. हा भाग काढून टाकल्यानंतर त्यावर छाती किंवा पाठीजवळची त्वचा काढून तिथे लावली जाते. त्यानंतर गळ्याच्या आसपास कुठे कॅन्सरचा अंश शिल्लक आहे का, याची तपासणी केली जाते आणि कॅन्सर पसरलेला दिसला तर तिथे किरणोपचार (रेडिएशन) दिले जातात, असे हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा विभागाचे अधिव्याख्याता डॉ. अतुल पोरे यांनी सांगितले.

शस्त्रक्रियेने वाढले आजारावर मात करण्याचे प्रमाण
कॅन्सर पसरलेल्या ठिकाणचा भाग काढून टाकणे हाच सवरेत्तम मार्ग आहे. कॅन्सरग्रस्त भाग काढला नाही, तर हाड सडणे आणि शेवटच्या पायरीपर्यंत आजार पसरणे, असे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच पहिल्या पायरीत उपचार सुरू होणे सर्वाधिक उपयुक्त ठरते. पहिल्या पायरीतील ‘सर्व्हायव्हल रेट’ (आजारावर यशस्वी मात करण्याचे प्रमाण) हा सर्वाधिक असतो. ‘सर्व्हायव्हल रेट’ म्हणजे 100 कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्यास पहिल्या पाच वर्षांत किती रुग्ण रोगावर मात करून जीवित राहतात, असा अर्थ वैद्यकीय क्षेत्रात घेतला जातो. नवनवीन तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियेतील आधुनिकतेमुळे मागच्या दहा वर्षांपेक्षा 20 ते 25 टक्क्यांनी ‘सर्व्हायव्हल रेट’ वाढला आहे, असेही डॉ. पोरे यांनी सांगितले.

शल्यचिकित्सकांची ‘कमांडो’ टीम अशी
डॉ. अजय बोराळकर, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. अतुल पोरे, डॉ. अब्दुल राफे, डॉ. वसंत पवार, डॉ. राहुल मांजरे, डॉ. प्रणव सदावर्ते, डॉ. एच. पी. भगत, डॉ. अलापुरे, डॉ. मनोज गजभारे, डॉ. गांगुर्डे तसेच परिचारिकांची टीम.

20 लाखांच्या खास उपकरणांचा प्रस्ताव
‘कमांडो’सह अनेक प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक उपकरणांची गरज आहे. त्यासाठीच 20 लाखांचा प्रस्ताव वैद्यकीय संचालकांकडे पाठवला आहे. डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, कॅन्सर हॉस्पिटल.