आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या चिमुकल्याला झाला होता कर्करोग, पण त्यावर अशी केली मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आमचे सगळे काही सुरळीत सुरू होते. आनंद, उत्साह अन् चैतन्याने भरलेले आयुष्य होते. तिसऱ्या वर्गातील परागच्या कोडकौतुकात संपूर्ण कुटुंब अक्षरश: दंग झाले होते. पण २०११ मध्ये एके दिवशी आमच्या चिमुरड्याला कर्करोगाचे निदान झाले अन् आमच्यासाठी आभाळच फाटले. तो जगणार नाही, असे आम्ही समजू लागलो होतो. आम्ही त्याला गमावले होते, पण डॉक्टरांनी केलेले उपचार अन् मानसिक ऊर्जेमुळे आज तो उभा आहे, अशा हृदयद्रावक शब्दांत कर्करोगावर मात केलेल्या वर्षीय परागची आई वैशाली यांनी भावना मांडल्या अन् सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले. 

हा कौतुक सोहळा होता कर्करोगावर मात करणाऱ्या बहाद्दर मुलांसाठी. डॉ. शंतनू कुलकर्णी यांनी उपचार केलेल्या कर्करोग या भयंकर संकटावर मात करून आयुष्याचा आनंद अनुभवणाऱ्या मुलांचा हा सत्कार सोहळा अक्षरश: भारावून टाकणारा होता. परागचे वडील श्रीनिवास म्हणाले, ७० किमोथेरपी आणि बाकी उपचार घेतल्यानंतर अंथरुणाला खिळलेला माझा पराग आज उभा राहिला. चारचौघांप्रमाणे बोलतो, खेळतो आहे. 

‘आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाचा आधार’ हे गाणे गाणाऱ्या प्रतीक बालवेचे वडील नानासाहेब यांनी पाणावल्या डोळ्यांनी स्वत:चा अनुभव सांगायला सुरुवात केली. ते सांगू लागले, माझा प्रतीक दीड वर्षाचा असताना त्याला कर्करोगाचे निदान झाले होते. आजही तो प्रसंग अंगावर काटा उभा करतो. एमए, बीएड करूनही मला नोकरी मिळत नव्हती. २००४ मध्ये पहिल्या मुलाचा आनंद साजरा करतो करतो तोच त्याला किडनीचा कर्करोग असल्याचे कळाले. मी हतबद्ध होऊन पाहत होतो. मुलगा काहीही करून वाचवायचा हे एकच लक्ष्य होते. तत्काळ शस्त्रक्रिया करून एक किडनी काढली. दीड-दोन वर्षे मी एकटा त्याला घेऊन औरंगाबाद -नगर वाऱ्या करत होतो. आज तो पूर्णपणे सुरक्षित आहे. 

आत्मविश्वासाने ग्रामीण भागातील उत्कर्ष लोखंडे आणि आकाश गडगूळ यांनी केलेली भाषणे त्यांनी अनुभवलेल्या निराळ्या ऊर्जेचा अनुभव देणारी होती. या सर्व मुलांना कर्करोगावर यशस्वी मात करून वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. 

चौथ्या पातळीतील कर्करोगही बरा होऊ शकतो
यावेळी डॉ. शंतनू कुलकर्णी यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले, पहिल्याच नाही तर अगदी चौथ्या पातळीवर पोहोचलेल्या कर्करोगावरही मात करता येते. फक्त आपण योग्य तज्ज्ञांकडे पोहोचलो पाहिजे. रेडिओथेरपी आणि किमोथेरपी निरनिराळ्या आहेत, त्याचे तज्ज्ञ वेगवेगळे आहेत. जाणीवपूर्वक असे उपचार घेता आले तर कर्करोगावर निश्चित मात करता येते. 

मनोगत व्यक्त करताना परागचे वडील श्रीनिवास आणि आई वैशाली. 
या वेळी मुलांनी कला सर्वांना खिळवून ठेवले होते. शेरोशायरी, जोक्स, वृक्ष लावण्याविषयीचे संकल्प अशा विषयांवर हा सुंदर सोहळा झाला. पालकांनीही अनुभवकथन केले. या वेळी डॉ. मंजूषा शेरकर, डॉ. रोशनी सोधी, डॉ. वर्षा वैद्य, डॉ. रेणू बोराळकर, आसावरी कौशिक, रश्मी जोशी, अभिजित जोशी, डॉ. उमेश आणि वृंदा कुलकर्णी, मनीष कौशिक, भाऊसाहेब बोराडे या मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नितीन ओझा, धनराज पाटील, मनीषा मुर्ताडकर, वर्षा गाडेकर, विनोद बोराडे यांनी परिश्रम घेतले. 
 
बातम्या आणखी आहेत...