आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cancer Suffered Health Massenger, Resolution After Mother Disease

कॅन्सरग्रस्त रुग्णांचा आरोग्यदूत, आईच्या वेदना पाहून तरुणाचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने रुग्णासह नातेवाइकांचेही मनोधैर्य खचून जाते. शिवाय औषधोपचारांसाठी होणा-या खर्चाचीही चिंता यात भर टाकते. अशा काळात कॅन्सरग्रस्तांना मदत करून त्यांच्या अहर्निश सेवेत झोकून दिलेला औरंगाबादेतील सतीश महाजन हा तरुण समाजासाठी आदर्श ठरला आहे. कॅन्सरग्रस्त आईच्या वेदना त्याने पाहिल्या आणि तीन वर्षांपूर्वी कॅन्सरग्रस्तांच्या सेवेचे व्रत त्याने स्वीकारले.

कॅन्सर म्हणजे जिवंतपणीच मरणयातना. यामुळे संपूर्ण कुटुंबच जणू शारीरिक व मानसिकदृष्ट्या आजारी पडते. उपचारांसाठी प्रचंड पैसा लागतो. अशा वेळी सर्वार्थाने मदत करणारा मार्गदर्शक नसतो. नेमकी ही बाब हेरून सतीश महाजन यांनी अशा रुग्णांसाठी जणू मदत केंद्रच सुरू केले आहे. तीन वर्षांत त्यांनी गरीब-श्रीमंत किंवा जातीभेद न पाळता २५ पेक्षा अधिक कॅन्सरग्रस्तांना मदत केली आहे. गरीब रुग्णांना ते पैसा उभा करून देतात तर श्रीमंतांना भावनिक व श्रमिक आधार.

कुरियरचा खरा मंत्र जपला : सतीश महाजन हे मूळ विदर्भातील मेहकर गावचे रहिवासी. नोकरीनिमित्त ते औरंगाबादेत स्थायिक झाले. ‘ब्ल्यू डार्ट’ कुरियर कंपनीत ते काम करतात. त्यांच्या मातोश्री प्रमिला यांना २०११ मध्ये कॅन्सर झाल्याचे निदान झाले. खूप धावपळ करावी लागली. पैसा तर खर्च झालाच शिवाय धावपळही झाली. आईच्या प्राणांतिक वेदना पाहून ते कळवळायचे. २०१२ मध्ये आईचे निधन झाले. यानंतर त्यांनी कॅन्सरग्रस्तांना मदत करण्याचा संकल्प केला. मित्र, नातेवाईक व कार्यालयातील सहका-यांना तो सांगितला. तेव्हापासून महाजन यांच्याकडे लोक मदत मागू लागले. कार्यालयाचा व्याप सांभाळून ते कोणतीही तक्रार न करता लोकांच्या मदतीला धावून जातात.

शिवराज यांच्या कुटुंबाला मदत
गरवारे कंपनीतून सेवानिवृत्त झालेले शिवराज यांच्या पत्नीस हाच दुर्धर आजार होता. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न असले तरी त्यांचे या शहरात कुणीही नातेवाईक नव्हते. महाजन त्यांच्या मदतीला धावून गेले. रोज औषध गोळ्या आणणे, रुग्णालयात नेणे अशी मदत त्यांनी दोन वर्षे केली. दुर्दैवाने शिवराज यांच्या पत्नी जगू शकल्या नाहीत.

दोन लाखांचा धनादेश फ्रेम करून ठेवला : उद्योगपती अरुण देवकर यांचा महाजन यांच्या कार्यावर प्रचंड विश्वास बसला. विदेशात जाण्यापूर्वी कामगारांच्या वेतनाची जबाबदारी त्यांनी महाजन यांच्याकडे सोपवली. मुलीच्या भेटीसाठी अमेरिकेत गेलेले देवकर यांचे दुर्दैवाने अमेरिकेतच ४ जुलै २००८ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात एक वर्ष कंपनीचे व्यवहार सांभाळल्यानंतर त्यांच्या पत्नी मनोरमा भारतात आल्या. पती वियोगामुळे त्या पुण्यात स्थायिक झाल्या. जाताना त्यांनी महाजन यांची रुग्ण सेवाभाव पाहून मदत म्हणून कोरा चेक दिला. हवी तेवढी रक्कम लिहिण्यास सांगितले. त्यावर महाजन यांनी ‘काहीच नको’ असे सांगितले; परंतु मनोरमा यांनी दोन लाख रुपयांचा चेक त्यांच्या हातावर ठेवला. महाजन यांनी तो चेक फ्रेम करून ठेवला आहे. ‘मी आईच्या स्मरणार्थ सेवा करतो. हे पैसे घेतले, तर कॅन्सरग्रस्तांचे रक्त प्यायल्यासारखे मला वाटेल,’ अशी त्यांची भावना आहे.

२५ रुग्णांना केली मदत
डॉक्टरांना लागणारी औषधांची लिस्ट आणून देणे, गोळ्या व इंजेक्शन, किमोथेरपीसाठी मदत करणे अशा प्रकारे महाजन यांनी आजवर २५ कॅन्सरग्रस्तांची सेवा केली आहे.

अफसरची सेवा...
गॅरेज चालवणारा अफसर खान गॅरेजवर दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर महाजन यांनी चौकशी केली, तर त्याला कॅन्सर झाल्याचे कळले. गरिबी अन् हातावरचे पोट. महाजन यांनी कार्यालयातील सहका-यांना मदतीचे आवाहन केले. निधी गोळा केला आणि अफसरवर उपचार सुरू झाले.

एकटाच मदत करतो...
कॅन्सरग्रस्तांसाठी मदतीला धावून जाणे हे माझे कर्तव्यच आहे असे मी समजतो. कारण आईला झालेल्या वेदनांचा मी साक्षीदार आहे. लोक स्वत:हून मदत मागतात. काही आर्थिक मदतही करतात. सतीश महाजन