आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्भपिशवीतील कॅन्सरच्या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण, स्त्रीरोगतज्ज्ञ परिषद व जिल्ला हॉस्पिटलतर्फे इंडोसर्ज परिषद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गर्भपिशवीच्या तोंडाचा कर्करोग, गर्भाशयातील गाठी काढणे, बंद नळ्या उघडणे, अंडाशयातील गाठी काढणे तसेच खाली सरकलेल्या गर्भपिशवीला पूर्ववत करणे यासारख्या अवघड शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या माध्यमातून करण्याचे प्रशिक्षण डॉक्टरांना प्रात्यक्षिकातून देणाऱ्या इंडोसर्ज परिषदेला आज हॉटेल अतिथी येथे सुरुवात झाली. या वेळी राज्यभरातून ३०० डॉक्टरांनी सहभाग नोंदवत प्रात्यक्षिकही करून पाहिले.
स्त्रीरोगतज्ज्ञ परिषद व जिल्ला हॉस्पिटल यांच्या विद्यमाने या दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील नामवंत डॉक्टरांच्या हातून वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्ला हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण हॉटेल अतिथीमध्ये दाखवण्यात आले. भारतातील नामवंत डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे अतिशय आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. पुण्याचे डॉ. शैलेश पुणतांबेकर, मुंबईचे डॉ. राजेंद्र संकपाळ, डॉ. रंजना धानू , डॉ. मंजू जिल्ला, डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. नितीन शहा यांनी शस्त्रक्रिया केल्या.

परिषदेत दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढावी की योनीमार्गातून याविषयी ऊहापोह करण्यात आला. मोठे मांस कसे काढावे याविषयी डॉ. रंजना धातू यांनी मार्गदर्शन केले. दुर्बिणीद्वारे करण्यात येणा-या शस्त्रक्रियेत वापरले जाणारे साहित्य निर्जंतुक कसे करावे, त्याची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉ. नितीन शहा यांनी मार्गदर्शन केले. शक्तिस्थाने याबद्दल डॉ. मंजू जिल्ला यांनी, तर शस्त्रक्रियांतील गुंतागुंत याविषयी डॉ. पंडित पळसकर यांनी उदाहरणासह माहिती दिली. दुर्बिणीद्वारे करण्यात येणा-या शस्त्रक्रिया अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने कराव्या लागतात. त्यामुळे साहित्यांचा अचूक वापर कसा करावा याविषयी डॉ. स्मिता चिद्रावार यांनी मार्गदर्शन दिले. गर्भशयाच्या आतील सूक्ष्म शस्त्रक्रियेबद्दल डॉ. विवेक साळुंके यांनी, तर दुर्बिणीने टाके कसे घालावेत यावर डॉ. राजेंद्र संकपाळ यांनी प्रात्यक्षिक दाखवले. हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीच्या अनेक बाजूंवर यामध्ये चर्चा झाली. यात मोठ्या संख्येने स्त्रीरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ.प्रगती शिरपेवार आणि डॉ. मनदीप राजपूत यांनी परिश्रम घेतले.

मोफत शस्त्रक्रियेने रुग्णांना दिलासा
या परिषदेत अतिशय क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया देशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आल्या. गर्भाशयाचा कर्करोग, अंडाशयातील गाठी अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया अतिशय खर्चिक असतात. गरीब कुटुंबातील रुग्णांना हा खर्च झेपण्यासारखा नसतो. अशा सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला.
महिलांना होणार फायदा
प्रसूतीच्या वेळी सिझेरियन केल्यास महिलांना अनेक टाके दिले जातात. त्यानंतर गर्भपिशवीशी संबंधित आजार उद्भवल्यास पुन्हा शस्त्रक्रिया करणे जोखमीचे ठरते. त्यापेक्षा दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया अधिक सोयीच्या ठरतात. त्यामुळे या परिषदेचा लाभ महिलांना विशेष होणार आहे. दुर्बिणीच्या शस्त्रक्रियांचे कौशल्य यामध्ये डॉक्टरांना दिले जात आहे. डॉ. प्रगती शिरपेवार, आयोजक