आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवदान : साडेचार किलोच्या ट्यूमरपासून बालकाची सुटका!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कॅन्सरचा जन्मजात अतिदुर्मिळ ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना तीन तासांच्या क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर यश मिळाले. नऊ वर्षे दुर्लक्ष केल्याने हा ट्यूमर साडेचार किलोचा झाला होता, पण ट्यूमरच्या विळख्यातून या मुलाची अखेर सुटका झाली. मात्र, कॅन्सरचा अंश असल्याची शक्यता आहे. या कठीण शस्त्रक्रियेसाठी मुलाच्या पित्याला अर्धा एकर जमीन विकून पैसा उभा करावा लागला.

माजलगाव (जि. बीड) येथील गोविंद केसकर या नऊ वर्षांच्या मुलाचे 15 दिवसांत एक किलो वजन घटले. तीव्र पोटदुखी, पोट फुगणे, भूक मंदावणे, उलट्या, संडास आदी लक्षणांनी गंभीर स्वरूप धारण केल्याने नातेवाइकांनी माजलगाव, बीड परिसरात उपचाराचा प्रयत्न केला; पण उपयोग झाला नाही. त्याचे शहरात निदान झाले. ‘टेराटोमा’ (फिट्स इन फिट्स) या प्रकारातील अतिदुर्मिळ ट्यूमरचे सीटी स्कॅनमध्ये निदान झाले. मात्र, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत स्थिती अधिक गंभीर असल्याचे लक्षात आले. पोटाच्या (रिट्रोपेरिटोनियल) मागच्या बाजूला असलेल्या तब्बल साडेचार किलोच्या ट्यूमरमुळे उजवीकडील आतडे, किडनी, स्वादुपिंड, रक्तवाहिनीवर (आयव्हीसी) दाब येत होता. शिवाय हे अवयव ट्यूमरला चिकटल्यामुळे ट्यूमर काढणे कठीण बनले होते. मात्र, साडेतीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे ट्यूमर काढण्यात यश मिळाले. लक्षणांवरून कॅन्सरची शक्यता असल्याने पुढील उपचार आवश्यक ठरणार आहेत. कॅन्सर असल्यास रेडिओथेरपी, किमोथेरपीचे उपचार अनिवार्य ठरतील, असे शस्त्रक्रिया करणारे बालरोग सर्जन डॉ. संदीप हंबर्डे यांनी सांगितले.

मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी कोणीही आर्थिक मदत केली नाही. म्हणूनच पाच एकरपैकी अर्धा एकर जमीन विकली. उपचारासाठी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरलो. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.
रोहिदास केसकर, मुलाचे वडील

छायाचित्र - शस्त्रक्रिया झालेल्या गोविंद केसकर (मध्यभागी) सह त्याचे नातेवाईक.