आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी दिली पण कोणाचीही यादी नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीने वापरला अजब फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हो-नाही, म्हणत शिवसेना-भाजपची अखेर युती झाली. अनपेक्षितपणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनसले. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार तास शिल्लक आहेत. उमेदवार निश्चित झाले पण वरील चार प्रमुख पक्षांपैकी एकानेही आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी सोमवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केली नाही.

शिवसेना तसेच भाजप या दोन्हीही पक्षांकडून कोणत्या वाॅर्डातून कोण लढणार याची नावे जवळपास नक्की होती. काँग्रेस व राष्ट्रवादीचेही उमेदवार फायनल झाले होते. फक्त युती, आघाडीची चर्चा शिल्लक होती. सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादीचे बिनसले. तेव्हा दोन्हीही पक्षांनी लगेच उमेदवारांना बी फॉर्म वाटप सुरू केले. काँग्रेसने सायंकाळी उशिरापर्यंत सर्व ११३ वाॅर्डांत उमेदवारांना बी फॉर्म दिले. त्यामुळे मंगळवारी त्यांचे सर्व उमेदवार अर्ज दाखल करतील. कोणत्या वाॅर्डातून कोणाला उमेदवारी दिली, याची यादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडे असली तरी त्यांनी ती जाहीर करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. राष्ट्रवादीने रात्रीपर्यंत ७५ वाॅर्डांत बी फॉर्म वाटले होते. त्यांच्याकडे या उमेदवारांची नावेही होती, परंतु त्यांनीही यादी प्रसिद्धीस देण्याचे टाळले. सायंकाळी युतीची अधिकृत घोषणा झाली. त्यांचेही उमेदवार नक्की झाले आहेत. शिवसेनेच्या वतीने काही उमेदवारांना सोमवारीच अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे कोणत्या वाॅर्डात कोण लढणार हे जवळपास नक्की झाले, तरीही सेना किंवा भाजपनेही उमेदवार जाहीर करण्याचे टाळले. कारण एकच होते. बंडखोरांना वेळ मिळू नये. बी फॉर्म ज्या उमेदवाराला देण्यात आला, त्याने कोणाला काहीही सांगू नये, असे बजावण्यात आल्याचे समजते. कोणत्या वाॅर्डात किती अर्ज आले, कोणी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी भरली, यावरून नंतर मतदारांनाच अधिकृत पक्षाचे उमेदवार शोधावे लागेल किंवा प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना हे काम करावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...