आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनॉटमधील बर्थडे प्रकरण: ‘त्या’ युवकांवरील गुन्हे रद्द करा; हायकोर्टाचा पोलिसांना दणका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कॅनॉट प्लेसमध्ये रस्त्यावर बर्थडे केक कापल्याच्या आरोपाखाली सिडको पोलिसांनी मार्च महिन्यात सात तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. मुळात ही कारवाईच बनावट असल्याचे डीबी स्टारच्या तपासातून पुढे आल्यानंतरही तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी या कारवाईचे समर्थन केले होते. अखेर उच्च न्यायालयानेच ‘ही केस पुढे चालू ठेवली तर कायद्याचा गैरवापर होईल,’ अशी टिप्पणी करत त्या तरुणांविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे अखेर या तरुणांना न्याय मिळाला आहे.

 

कॅनॉटमध्ये स्वयंघोषित दादा, भाऊंचा उच्छाद वाढला होता. रात्रीच्या वेळी टुकार मुले एकत्र जमत. रस्त्यावर तलवारीने केक कापणे, धिंगाणा घालणे असे प्रकार या भागात घडत होते. या भागात व्यावसायिकांसह रहिवाशीही मोठ्या प्रमाणावर आहेत. बर्थडे प्रकरणाला वैतागलेल्या व्यापारी आणि रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. आमदार अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनीही तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन या टुकार तरुणांना लगाम घालण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना सोडून ही बनावट कारवाई केली होती.

 

काय होते प्रकरण?
कॅनॉटप्लेसमध्ये सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी अाडव्या लावून, गैरकायद्याची मंडळी जमवून वाढदिवसानिमित्त केक कापल्याच्या आरोपाखाली 4 मार्च रोजी सिडको पोलिसांनी रोहित रमेश गित्ते, ऋषिकेश दिनकर सानप, अमोल जालिंदर गिरी, मारुती देवकाते, रूपेश परमेश्वर गुट्टे आिण राकेश राजेंद्र गायकवाड यांच्याविरुद्ध १४५, ३४१ भादंविनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हे सर्वजण अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत.

 

डीबीस्टारकडे कैफियत
राेहित रमेश गित्ते या तरुणाचा 4 मार्च रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त मित्र नातेवाईक ऋषिकेश सानप, अमोल गिरी, मारुती देवकाते रूपेश गुट्टे यांच्यासाेबत रोहित कॅनॉटमधील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. केकदेखील कारमध्येच होता. जेवण झाल्यानंतर मित्राच्या रूमवर जाऊन केक कापण्याचे त्यांचे नियोजन होते. जेवण सुरू असतानाच रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिस आले अन् ‘चला, हॉटेल बंद करा,’ असे हॉटेलमालकाला सांगू लागले. या तरुणांनाही जेवण अर्ध्यावर सोडून बाहेर काढले आणि व्हॅनमध्ये बसवले. पोलिसांच्या बोेगस कारवाईची माहिती राकेश राजेंद्र गायकवाड याला मिळाली. राकेश त्यावेळी एका खासगी रीडिंग रूममध्ये होता. तो लगेच होस्टेलला आला आणि तिथून सिडको पोलिस ठाण्याकडे गेला. त्याने मित्रांची विचारपूस केली तेव्हा त्यालाही पोलिसांनी लॉकअपमध्ये टाकले.
एफआयआरमध्ये लावलेले आरोप खोटे असल्याबाबत या तरुणांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. पोलिस निरीक्षकांनी कशा पद्धतीने मारहाण केली, मानसिक छळ केला याचा पाढाच या तरुणांनी वाचला होता.

 

...तरीही तत्कालीन पोलिस आयुक्तांकडून समर्थन
दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणांच्या पालकांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर अमितेशकुमारांनीही या कारवाईचे समर्थनच केले होते. त्यामुळे या तरुणांनी एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

 

गुन्ह्याचा पुरावा नाही : हायकोर्ट
खंडपीठात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मंगेश एस. पाटील या द्विसदस्यीय पीठाने या प्रकरणात निकाल दिला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले आहे की, एफआयरमध्ये जे आरोप आहेत आणि चार्जशीटमधील साक्षीदारांचे म्हणणे या दोन्ही बाबींचा विचार केला तर एफआयरमध्ये नमूद केलेला गुन्हा दिसून येत नाही. तसेच चार्जशीटमध्ये आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून वाहतुकीला किंवा इतर कुणालाही अडथळा निर्माण केल्याचा कुठलाही पुरावा चार्जशीटसोबत नाही. त्यामुळे आम्हाला या केसमध्ये बेकायदेशीरपणे गोवलेले आहे, या आरोपींच्या म्हणण्यात तथ्य वाटते. ‘आम्ही केवळ जेवण करण्यासाठीच जमलो होतो. कुठलाही वाईट उद्देश नव्हता,’ हे आरोपींचे शपथपत्रातील म्हणणे न्यायालयाकडून ग्राह्य धरण्यात येत आहे. आरोपी हे विद्यार्थी आहेत, अशा केसेसमुळे त्यांचे करिअर खराब होऊ नये म्हणून ही केस पुढे चालवण्याऐवजी रद्द करावी. ही केस पुढे चालू ठेवली तर कायद्याचा गैरवापर होईल. त्यामुळे एफआयर आणि चार्जशीट रद्द करण्याचे आदेश निर्णय न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मंगेश एस. पाटील यांनी दिला.

 

डीबी स्टारच तपास
यासहा मुलांपैकी राकेश गायकवाड हा कॅनॉटमध्ये जेवण्यासाठी आलाच नव्हता. कॅनॉटमध्ये घडलेली घटना कळल्यानंतर तो रीडिंगमधून होस्टेल आणि तेथून रात्री ११.५० वाजता सिडको पोलिस ठाण्यात गेला होता. त्या वेळी होस्टेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्येही तो दिसत होता. म्हणजे कॅनॉटमध्ये गेलेला नसतानाही त्याला या प्रकरणात गोवण्यात आले. एफआयआरमध्ये पोलिसांनी या मुलांकडून एक कार पाच दुचाकी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. या सर्व वाहनांच्या क्रमांकांचीही नोंद एफआयआरमध्ये केलेली आहे. मात्र, यातील चार दुचाकींशी या तरुणांचा संबंध नाही. त्याही यांच्याच असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले होते. डीबी स्टारने या सर्व बाबी उघड केल्या.

 

 

गृहमंत्रालयाकडे तक्रार करू
या घटनेमुळेपोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. पोलिस कसे असतात याचा बोध आम्ही या घटनेतून घेतला. आमच्या मुलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध आम्ही गृहमंत्रालयाकडेही तक्रार करणार आहोत. -डॉ.पी. के. गुट्टे, पालक


अब्रुनुकसानीचा दावा करणार
डीबी स्टारमुळेच आम्हाला बळ मिळाले. या घटनेमुळे आमच्या मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. आमच्या मुलांना खोट्या गुन्ह्यात गाेवणाऱ्या पोलिसांविरुद्ध आम्ही न्यायालयात आता अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत.
- दिनकर सानप, पालक


...तर जनतेचा विश्‍वास कमी होईल
पोलिसांनी याप्रकरणात निष्पाप तरुणांना गोवण्याचा प्रयत्न केला होता. अशा घटनांमुळे सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी होत चालला आहे. किमान यापुढे तरी असे प्रकार होणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे.
- अॅड. जनार्दन एम. मुरकुटे, आरोपींचे वकील


प्रजापतींचा बोलण्यास नकार
न्यायालयाच्या निकालासंदर्भात सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चमूने त्यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, डीबीस्‍टारने केलेला पाठपुरावा...

 

बातम्या आणखी आहेत...