आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत बेदरकार चालकाची पिवळा सिग्नल पार करण्याच्या नादात तीन वाहनांना धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको बसस्थानकाकडून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने शुक्रवारी दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी हायकोर्टासमोरील सिग्नल तोडून तीन कारला जबर धडक दिली. तेव्हा या अपघातात किमान काहीजण गंभीर जखमी झाले, असे वाटले होते. प्रत्यक्षात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने सारेचजण बचावले. धडक देणाऱ्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

हायकोर्टानजीक चौकात सेव्हन हिल्सच्या दिशेने जाणारे वाहने पिवळा सिग्नल लागल्याने थांबली होती. चिकलठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हिरवा दिवा होता. तेवढ्यात सिडको बसस्थानकाकडून सेव्हन हिल्सकडे निघालेली किमान ८० किलोमीटर प्रतितास वेगातील स्विफ्ट कार (एम एच १२ - एफ यू - ९२२७ ) सिग्नलवर उभ्या इनोव्हावर (एमएच-१६- बीएच-८०८०) आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की इनोव्हा सिग्नलच्या आठ ते दहा मीटर पुढे ढकलली गेली. स्विफ्टचा चालक रघुनाथ पवारचे नियंत्रण सुटल्याने ती इंडिका व्हिस्टा (एमएच२०-बीवाय २२४६) अन्य एका कारला धडकली. या चारचाकींच्या मध्ये एक दुचाकीचालकही होता. धडक लागून तोही खाली पडला होता.  

चार्ली घटनास्थळी 
वाहतूक पोलिस कर्मचारी महादेव गायकवाड यांनी अपघाताची माहिती कंट्रोल रूमला कळवल्यावर चार्ली घटनास्थळी दाखल झाले. मग वाहने क्रेनच्या साहाय्याने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आली. अपघातातील आणखी एका कारलाही धडक बसली. पण त्याचे किरकोळ नुकसान असल्याने तो निघून गेला. पुंडलिकनगर ठाण्यात घटनेची नोंद करून स्विफ्टचालक पवारला घाटीत वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.  

सीसीटीव्ही गरजेचे 
हायकोर्ट सिग्नलवर सेव्हन हिल्सच्या दिशेने जाणारे वाहनचालक वाहतूक कर्मचाऱ्यांना जुमानता सर्रास सिग्नल तोडतात. त्यांच्यावर कारवाईसाठी या चौकात सीसीटीव्ही अत्यावश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

भयंकर घटना पण... 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा अपघात हृदयाचा थरकाप उडवणारा होता. स्विफ्ट आणि इनोव्हाची अवस्था पाहता आम्हाला तर काहीजण अपघातात गंभीर जखमी झाले असावेत, अशी शंका होती. पण कोणाला साधा ओरखडाही उमटला नाही. इनोव्हामध्ये चालकासह पाच ते सहा, व्हिस्टामध्ये तीन जण तर स्विफ्टमध्ये चारजण होते. दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असावा. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...