आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची काच फोडून सहा लाख लांबवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लेथ आणि ट्रेडिंग मशीनचा व्यवसाय करणार्‍या पडेगावातील व्यापार्‍याच्या कारची काच फोडून अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या पदमपुरा भागातून भरदिवसा चोरट्याने 5 लाख 90 हजार रुपयांसह कॅमेरा आणि कागदपत्रे असलेली हँडबॅग लंपास केली. दुपारी पावणेबारा ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

पडेगावातील व्यापारी इंद्रजित शिवाजी जेटीथोर (45, रा. मीरानगर) यांनी मित्र विजय श्रीपतराव समदळे यांना उसने पैसे द्यायचे असल्याने डीसीबी बँकेच्या अदालत रोडवरील शाखेच्या बचत खात्यातून सहा लाख रुपये काढले. यानंतर सोबत असलेला मित्र शिवाजी जवणे याच्यासोबत इंडिगो कारने (एमएच 14 एएम 2230) पदमपुरा येथील जय टॉवरजवळ असलेल्या विक्रम इंटरप्रायझेस येथे गेले. पार्किंगमध्ये कार उभी करण्यापूर्वी त्यांनी सहा लाख रुपयांमधील दहा हजार रुपये स्वत:च्या खर्चासाठी काढून घेतले. याच्यानंतर उर्वरित पाच लाख 90 हजार रुपये कागदात गुंडाळून हँडबॅगमध्ये ठेवले. ही रक्कम कारच्या पाठीमागील सीटवर ठेवली. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर अध्र्या तासाने जेटीथोर आणि जवणे दोघेही कारजवळ आले. तेव्हा कारच्या पाठीमागील डाव्या बाजूची छोटी काच त्यांना फुटलेली दिसली. या वेळी त्यांनी आत डोकावले तेव्हा कारमधील रक्कम, मुलाची शैक्षणिक कागदपत्रे आणि कॅमेरा असलेली हँडबॅग लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत जेटीथोर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रभाकर जायभाये करत आहेत.

चोरांचा धुमाकूळ सुरूच
ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून गेल्या चार दिवसांत तीन मोठय़ा चोर्‍या झाल्या आहेत. त्यात बेगमपुरा, जवाहरनगर भागात घरफोड्या झाल्या, तर जैन मंदिरातील चार दानपेट्या पळवण्याची घटना घडली. दरम्यान, बॅग लंपास करण्यार्‍या रेकॉर्डवरील, पण सध्या फरार असलेल्या एका कुख्यात गुन्हेगारावर पोलिसांना दाट संशय असून गुन्हे शाखा पोलिस त्या संशयिताचा शोध घेत आहेत.