आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात प्लॉट किंवा फ्लॅट घेताना फसवणुकीचे प्रकार वाढले; घर खरेदीपूर्वी ही काळजी घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकाच फ्लॅटची अनेक व्यक्तींना इसारपावती करून दिल्याचे प्रकरण शहरात नुकतेच उघडकीस आले. हा प्रकार पहिल्यांदाच घडला असे नाही. सातत्याने अशी प्रकरणे शहरात घडली आहेत. काही बिल्डरांमुळे खरेदीदार आता सगळ्यांकडेच संशयाने पाहत आहेत. घर, फ्लॅट किंवा प्लाॅट घेताना फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात बिल्डर्सची संघटना क्रेडाई आणि दुय्यम निबंधकांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. त्या अशा...
 
अगोदर कुणाला विक्री केलाय का?
कुठल्याही प्रॉपर्टीची रजिस्ट्री ऑनलाइन होते. जेव्हा एखादी प्रॉपर्टी तुम्ही घेण्याचा निर्णय घेता, तेव्हा सर्वप्रथम ती प्रॉपर्टी आपल्या अगोदर अन्य व्यक्तीला विकलेली नाही ना, हे बघणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्या प्रॉपर्टीचे सर्व डिटेल घ्यावेत. त्या प्रॉपर्टीचा काही व्यवहार झालाय की नाही हे समजते. यात खरेदीखत, इसारपावती झालेली असेल तर तीसुद्धा लगेच निदर्शनास येईल. तसेच काही बँका नोंदणीकृत गहाणखत करून कर्ज देतात. या गहाणखताची नोंददेखील या कार्यालयात होते. याबद्दलही पडताळणी करता येऊ शकते.
 
पावती नाेंदणीकृतच करा...
अनेक जण नोटरी किंवा बाँडवर इसारपावती (अॅग्रीमेंट टू सेल) करून घेतात. मात्र, असे करता दुय्यम निबंधक कार्यालयात रीतसर शुल्क भरून नोंदणीकृत इसारपावती करून घ्यावी. कारण नोटरी बाँडवरील इसारपावतीला कायदेशीरदृष्ट्या कमी महत्त्व असते. शिवाय नोटरी, बाँडवर आपल्या आधी किती जणांना इसारपावती करून दिलीय हे कळू शकणार नाही. त्यामुळे नाेंदणीकृत इसारपावतीला पर्याय नसतो.
 
बिल्डरच्या फर्मची माहिती...
प्रत्येक बिल्डरची एक फर्म असते. जर एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन फर्म चालवत असतील तर त्यांच्यामध्ये तशी पार्टनरशिप डीड झालेली असते. पार्टनरशिप डीडमध्ये ज्या व्यक्तींची नावे असतील, त्यांच्यासोबतच आर्थिक व्यवहार करावा. इसारपावती किंवा खरेदीखत फर्ममधील अधिकृत मालकांच्या स्वाक्षरीनेच करावे.

सर्च रिपोर्ट काढा...
खात्रीच्या वकिलामार्फत त्या प्राॅपर्टीचा सर्च रिपोर्ट काढणे आवश्यक अाहे. जर ती प्रॉपर्टी एखाद्या बँकेला तारण असेल तर सर्च रिपोर्टमध्ये तसे आढळून येते. तसेच वर्तमानपत्रामध्ये प्रॉपर्टी खरेदी करीत असल्याबाबत वकिलामार्फत जाहीर प्रगटन द्यावे, जेणेकरून एखादा पूर्वीचा मालक त्यावर आक्षेपही घेईल. हे सगळे झाल्यानंतरच आपण घेतो ती मालमत्ता योग्य आहे की नाही हे कळेल.

डीड ऑफ डिक्लेरेशन पाहा...
कुठलाही गृहप्रकल्प सुरू करण्यापूर्वी विकासक मूळ जमीनमालक ‘डीड ऑफ डिक्लेरेशन’ बनवतात. यामध्ये विकसकाच्या हिश्शाला कुठला आणि जमीनमालकाच्या हिश्शाला कुठला फ्लॅट, रो-हाऊस असेल याची नोंद असते. संपूर्ण गृहप्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ, बांधीव क्षेत्रफळ, सामूहिक मालमत्तेचा तपशील, सर्वांना समान हक्क राहतील अशी नोंद, एफएसआय किंवा टीडीआरचे हक्क सोसायटीच्या नावे असल्याबाबत ग्राहकांना बिल्डरकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची नोंद यात केलेली असते. त्यामुळे ‘डीड ऑफ डिक्लेरेशन’ पाहूनच प्रॉपर्टी खरेदीचा निर्णय घ्या.
 
ऑनलाइन पेमेंट करा...
प्रॉपर्टी खरेदी करताना इसार म्हणून बरेच जण रोख पैसे देतात. पण जेव्हा प्रत्यक्ष खरेदीखत करायचे असते तेव्हा जर बिल्डरने भूमिका बदलली तर आपण पैसे दिल्याचा कुठलाच पुरावा शिल्लक राहत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून पूर्ण व्यवहार हा रोखीऐवजी चेक अथवा ऑनलाइन पेमेंटने केला पाहिजे. ऑनलाइन पेमेंट हे मोबाइलवरूनही होते. ज्यांना मोबाइलवरील ऑनलाइन पेमेंट करता येत नाही त्यांनी बँकेत जाऊन आरटीजीएस अथवा एनईएफटी करावे. अवघ्या काही मिनिटांमध्ये हे पेमेंट होते.
 
संबंधित बिल्डरची डीड ऑफ डिक्लेरेशन पाहावी...
प्रॉपर्टी घेऊ इच्छिणाऱ्यांनी संबंधित बिल्डरची डीड ऑफ डिक्लेरेशन पाहिली पाहिजे. बऱ्याचदा बिल्डर हे जमीनमालकाच्या हिश्शाचे फ्लॅट विकतात. आपल्याला दिलेला फ्लॅट खरोखर बिल्डरच्या हिश्शाचा आहे की जमीनमालकाच्या, हे डीड ऑफ डिक्लेरेशनमधून कळेल. तसेच खात्रीच्या वकिलाकडून सर्च रिपोर्ट घ्यावा. इसारपावती करायची असेल तर रजिस्ट्री कार्यालयात नोंदणीकृतच केली पाहिजे.
- के. एच. शिमरे, सहदुय्यम निबंधक, रजिस्ट्री ऑफीस
 
रेराच्या संकेतस्थळावर माहिती मिळणार...
आताऑगस्टपासूनरेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गृहप्रकल्पातील किती घरांची, फ्लॅटची विक्री झाली, इसारपावती झाली याची ऑनलाइन नोंदणी प्रत्येक बिल्डरला करणे बंधनकारक असणार आहे. ही माहिती सामान्य नागरिक रेराच्या संकेतस्थळावर पाहू शकतील. याशिवाय दुय्यम उपनिबंधक कार्यालयात संबंधित प्रॉपर्टीच्या इसारपावतीबद्दल, खरेदीखताबद्दल कर्जाबद्दलची माहिती घ्यावी.
- सुनील पाटील, अध्यक्ष, क्रेडाई
 
 
बातम्या आणखी आहेत...