आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूसदृश आजाराचा धोका; आरोग्य केंद्रात केवळ ताप, अंगदुखीचा उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - परिसरात डेंग्यूसदृश आजार पसरत असून येथील खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. धोका टाळण्यासाठी अनेक जण शहराकडे धाव घेत आहेत. मागील वर्षी डेंग्यू झाल्यामुळे तसेच वेळेवर उपचार मिळाल्याने औद्योगिक परिसरातील चौघांचा मृत्यू झाला होता. या वर्षीही तशीच परिस्थिती उद्भवते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने याची दखल घेणे आवश्यक आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. एखाद्याचा बळी जाण्यापूर्वीच संबंधित रोग होणार नाही यासाठी प्राथमिक उपाययोजना तसेच परिसरात धूर फवारणी, जनजागृती मोहीम सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. नागरी वसाहत असणाऱ्या बजाजनगरची लोकसंख्या एक लाखावर पोहोचली आहे. एकीकडे स्थानिक ग्रामपंचायत वडगाव कोल्हाटी प्राथमिक सुविधांसह परिसरातून निघणारा कचरा उचलण्यास हतबल ठरत आहे, तर दुसरीकडे एमआयडीसी ग्रामपंचायतीच्या वादामुळे साठत गेलेला कचरा अतिशय धोकादायक बनला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे साठलेला कचरा सडून त्यातून दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नाल्या तुंबत असल्याने रहिवाशांना विविध व्याधी जडत आहेत. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके सर्वाधिक प्रमाणात आजारी पडत असल्याचे समोर आले आहे. कामगारांना ईएसआयसी रुग्णालयातून त्यांना समाधानकारक उपचार मिळत नाहीत. त्यामुळे कामगार खासगी रुग्णालयांत धाव घेत आहेत. तेथील रुग्णालयेही फुल्ल होत असल्याने रुग्णांना तातडीने शहरातील रुग्णालयांत हलवण्याचा सल्ला येथील डॉक्टर देत आहेत.
साथरोगावर उपाययोजना
>धूर फवारणी, जनजागृतीची मोहीम हाती घेणे याासारख्या प्राथमिक उपाययोजना
> एमआयडीसी ग्रामपंचायत वादात साठलेला कचरा उचलावा
अखेर शहरातील रुग्णालयात धाव
हजारोकामगार ईएसआयसीधारक आहेत. मात्र, समाधानकारक सुविधा नसल्याने कामगार खासगी रुग्णालयात धाव घेणेच पसंत करतात. त्यामुळे परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी जागा उपलब्ध नाही. पर्यायी शहरातील रुग्णालयात धाव घेण्याकडे कामगारांचा कल वाढत आहे. वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रातूनही केवळ ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी प्राथमिक स्वरूपातील आजारांवरच उपचार होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

>अनेक रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत आहे. प्लेटलेट्स कमी होण्यामागे मलेरिया, डेंग्यूचे लक्षण असू शकते. परिसरात बालकांच्या आजारपणाची संख्या झपाट्याने वाढली आहे. आमचे रुग्णालय फुल्ल झाले आहे.
डॉ.अमोल हावळे, बालरोगतज्ज्ञ, महाराणा प्रताप चौक.
>यापूर्वी धूर फवारणी केली आहे. खबरदारी म्हणून येत्या दोन ते चार दिवसांतच पुन्हा धूर फवारणी करण्यात येणार आहे.
सुनील काळे, उपसरपंच, वडगाव कोल्हाटी.
बातम्या आणखी आहेत...