आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालबाह्य वाहनांमधून सर्रास शालेय विद्यार्थ्यांची ने-आण, हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- परिवहन कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ३०० पेक्षा अधिक स्कूल बस, टाटा मॅजिक आदी कालबाह्य वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. याकडे पालक, आरटीओ आणि पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
 
शाळेत ये-जा करण्यासाठी रिक्षा, स्कूल बस, व्हॅन, रिक्षा, काळी-पिवळी, क्रुझर, कार आदी वाहनांचा वापर केला जात आहे. वाहनांनी फिटनेस तपासणी करून आणि वाहतूक नियमाप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करूनच विद्यार्थ्यांची ने-आण करायला हवी. मात्र, नियम डावलून कालबाह्य वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त मुले बसवून ने-आण केली जाते. याकडे आरटीओ, पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
 
असे आहेत नियम:  मे पूर्वीच वाहनाची फिटनेस तपासणी करणे आवश्यक आहे. स्कूल बस, शाळेचे नाव, फोन नंबर यांसह बसच्या मागे पुढे ठळक अक्षरांत नाव लिहिलेले असावे. दरवाजाचा कडी-कोंडा पक्का बसवावा. सीटखाली दप्तर ठेवण्याची व्यवस्था असावी. आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत, सुरक्षा रक्षक किंवा वाहक म्हणून एक व्यक्ती असावा. मुली असल्यास महिलांची नियुक्ती करावी. प्रथमोपचार पेटी असावी. खिडकीजवळ जाळी, आडवी पट्टी बसवलेली असावी. अग्निशमन साहित्य असावे, पालक, शिक्षकांनी स्कूल बसची तपासणी करावी. चालकास किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असावा. चालक नशा करणारा नसावा. वर्षात दोन वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्या चालकास स्कूल बस चालवण्यास देऊ नये. स्पीड लॉक असावे. सुरक्षित प्रवासासाठी शालेय परिवहन समिती स्थापन करून समितीने लक्ष ठेवावे. शालेय बससाठी हे नियम असल्याची माहिती परिवहनतज्ज्ञ एन. के. त्रिपाठी यांनी दिली.
 
 
राजकीय दबावामुळे आरटीओ, पोलिस प्रशासन गप्प कालबाह्य वाहने सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय घातक आहेत. अशा वाहनांतून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येत आहे. अशा वाहनांवर आरटीओ पोलिस प्रशासनाने नियमाप्रमाणे कारवाई करणे अनिवार्य आहे, मात्र राजकीय दबावापुढे ते गप्प राहत असल्याचे समोर आले आहे.
 
शहर, जिल्ह्यातील१,०९० स्कूल बसपैकी ७५० स्कूल बस चालकांनी फिटनेस तपासणी केली आहे. वेळेत फिटनेस तपासणी केली नसल्याने ८४ स्कूल बसधारकांकडून लाखांवर दंड वसूल केला. कालबाह्य स्कूल बस, नियमबाह्य खासगी वाहनांवर कारवाईसाठी मोहीम राबवणार आहे
- अमर पाटील, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद.
 
नियमबाह्य वाहनांवर कारवाईसाठी मोहीम
स्कूल बस, वाहनधारकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेऊनच विद्यार्थ्यांची ने-आण करावी, असे नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार ३१ मेपूर्वीच वाहन फिटनेस तपासणी आवश्यक आहे. मात्र, औरंगाबाद याला अपवाद असून शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप तीनशेपेक्षा अधिक स्कूल बस शेकडो खासगी वाहने फिटनेस तपासणी करताच विद्यार्थी घेऊन सुसाट धावत आहेत. विशेष म्हणजे यात आयुष्यमान संपलेललीही वाहने आहेत.
 
जबाबदार कोण?
शालेयविद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, हे माहीत असूनही पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या पाल्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून तरी पालकांनी याबाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे.
 
असे आहे वास्तव
विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या तीनशेपेक्षा अधिक स्कूल बस, ऑटोरिक्षा, क्रुझर, गॅसवर चालणाऱ्या व्हॅन, काळी-पिवळी आदी खासगी वाहनांची फिटनेस तपासणी झालेली नाही. आयुष्यमान संपलेली परराज्यातील कालबाह्य वाहने विद्यार्थ्यांना घेऊन सुसाट धावतात. काही वाहने विनादरवाजाची आहेत. जुनाट टायर, साइड ग्लास, आतून- बाहेरून दरवाजा ओढण्यासाठी हँडल नाहीत. फर्स्ट एड बॉक्स, अग्निशमन साहित्य नाही. शाळेचे नाव लिहिलेले नसते, पालक, शिक्षक स्कूल बस, खासगी वाहनांची तपासणी करत नाहीत. शालेय परिवहन स्थापन केल्या जात नाहीत. समिती तपासणी करत नाही, वाहनात स्पीड नियंत्रकही नाही.
बातम्या आणखी आहेत...