आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन गव्हाच्या साठाप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकास अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - लासूर स्टेशन- देवगाव रंगारी रस्त्यावरील गोडाऊनमध्ये सोमवारी रेशन गव्हाचा साठा असल्याची माहितीवरून तहसील प्रशासनाने १६४ गोण्यांतील ८२ क्विंटल गहू व दहा किलो तांदूळ आढळून आल्याने गोडाऊनला सील ठोकले आहे. या प्रकरणी पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार सीताराम ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पंकज जयकुमार ठोळे, नारायण ठोळे, परेश छाजेड व नवनिर्वाचित उपसभापती संपत छाजेड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद  करण्यात आला असून पोलिसांनी नारायण ठोळे याला अटक केली अाहे. मंगळवारी न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  
 
सोमवारी तहसील प्रशासनास दूरध्वनीवरून भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अनंतपूर शिवारातील गोडाऊनमध्ये रेशनचा गहू साठवून ठेवल्याची माहिती दिली होती. त्यावरून तहसीलदार डॉ. चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सीताराम ठोंबरे, मंडळ अधिकारी रिता पुरी, तलाठी राहुल वंजारी यांनी शिल्लेगाव पोलिसांना सोबत घेऊन अनंतपूर शिवारातील छाजेड कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शेत गट नंबर ३२ मधील गोडाउनमध्ये येऊन पाहणी केली होती.

या वेळी त्यांना पंकज ठोळे यांनी छाजेड यांच्याकडून तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोडाऊनमध्ये साठवलेल्या गव्हाच्या १६४ गोण्या, दहा किलो तांदूळ व शासकीय शिक्का असलेल्या ५३ रिकाम्या गोण्या आढळून आल्या. केलेल्या पाहणीत प्रथमदर्शनी हा व्यवहार संशयास्पद वाटत असल्याने तहसीलदार शेळके यांनी गोडाऊन सील करून जप्त केलेल्या मालाचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संजय पाटील तिखे, संदीप गायकवाड, अजित जाधव, पीटर सुतार, बाळासाहेब थोरात, अमोल शिरसाठ यांच्यासमक्ष पंचनामा करून गव्हाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवले.  यानंतर हा माल कशाचा आहे हे सिद्ध होणार असल्याचे तहसीलदार शेळके यांनी सांगितले.   
 
कठोर कारवाईची मागणी : मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूरच्या बाजारपेठेत दररोज भुसार मालाची लाखो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे येथील काही व्यापारी काळ्याबाजारातील रेशनिंगचा गहू घेऊन गोरखधंदा चालवत आहेत.   

येथे अनेक वर्षांपासून काही भुसार व्यापारी काळ्याबाजारातील रेशनिंगचा माल घेण्याचा ऐवढा मोठा धंदा करत असताना पोलिसांना तसेच काही शासकीय अधिकाऱ्यांना कशी कल्पना नसावी, अशी चर्चा बाजारपेठेत सुरू आहे. त्यामुळे गरिबांना मिळणाऱ्या  रेशनचा गहू घेऊन गोरखधंदा चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून होत आहे.

राजकीय आकसापोटी गुन्ह्यात गोवले  
आम्ही हे गोडाऊन तीन महिन्यांकरिता भुसार माल आडत व्यापारी पंकज ठोळे यांच्या अजय ट्रेडिंग कंपनीस भाडेतत्त्वावर दिलेले आहे. त्यामुळे आमचा  कसलाही संबंध नाही. राजकीय आकसापोटी या गुन्ह्यात मला नाहक बदनामी करण्याच्या उद्देशाने गोवण्यात आले आहे.
- संपत छाजेड, उपसभापती, पंचायत समिती, गंगापूर.
 
बातम्या आणखी आहेत...