आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोतीवाला ट्रेड सेंटरच्या पार्किंग ठेकेदारावर गुन्हा, प्रोझोन मॉलनंतर निराला बाजारात दुसरी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
अौरंगाबाद - प्रोझोन मॉलच्या वाहनतळ कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे बेकायदेशीर पार्किंग वसुलीविरुद्ध नागरिकांत जागरूकता निर्माण होत असून एका नागरिकाने निराला बाजार येथील मोतीवाला ट्रेड सेंटरच्या वाहनतळ कंत्राटदाराविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस आता मनपाकडून पार्किंग नियमावली मागवणार आहेत. मनपाने किती ठिकाणी पार्किंग झोनला मंजुरी दिली आहे? जर मंजुरी दिली असेल तर त्यांची मुदत संपली की सुरू आहे ? या सर्व बाबी पडताळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
गुरुवारी प्रोझोन मॉलच्या वाहनतळ कंत्राटदाराविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने स्वत: फिर्यादी होत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी निराला बाजारात दुसरी कारवाई झाली. सुनील विठ्ठल कोटकर (३३, रा. उत्तरानगर, ब्रिजवाडी) शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता मोबाइल दुरुस्तीसाठी निराला बाजारातील मोतीवाला ट्रेड सेंटर येथे गेले होते. त्यांना तेथील वाहनतळ कंत्राटदाराने पार्किंगसाठी दहा रुपये मागितले. शुक्रवारी वृत्तपत्रांत प्रोझोन मॉलच्या वाहनतळ कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या वाचल्याने त्यांनी वाहनतळाच्या परवान्याची मागणी केली. परंतु तेथील तरुणाने दादागिरी करत वाद घातला. मग त्यांनी दहा रुपये देऊन पावती घेतली आणि थेट पोलिस आयुक्तालय गाठले. पावतीवर कुठल्याही प्रकारचा कर नोंदणी क्रमांक, जीएसटी किंवा तारखेचा उल्लेख नव्हता. आर्थिक गुन्हे शाखेने याची दखल घेत मोतीवाला ट्रेड सेंटरचे मालक वाहनतळ कंत्राटदार शेख मुश्ताक शेख कय्युम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 
लोकहो, तक्रारी करा: पोलिसांचे आवाहन 
शहरातीलसिडको बसस्थानक, मुख्य बसस्थानक, रेल्वेस्थानक, घाटी रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालये, जिल्हा सत्र न्यायालय आणि महाविद्यालयांत वाहनतळासाठी शुल्क आकारले जाते. यात मुख्य बसस्थानकाच्या वाहनतळावर अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशा सर्व प्रकरणांत नागरिकांनी अवैध वाहनतळ शुल्काविरोधात तक्रारी कराव्यात, आम्ही गुन्हे दाखल करू, असे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...