आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॅशलेस’ व्यवहार २० टक्क्यांनी वाढले, उद्योगांत बाराशे कोटींचे व्यवहार ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीला आठ डिसेंबर रोजी एक महिना पूर्ण झाला. त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कॅशलेस व्यवहार गेल्या दोन आठवड्यात किमान २० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.
छोटे-मोठे व्यापारी, हॉटेल चालक मोठ्या संख्येने डिजिटल व्यवहाराकडे वळत आहेत. पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशिन असणाऱ्यांचा व्यवसाय ५० टक्के वाढला आहे. मात्र, रिक्षाचालक, दूध किरकोळ दैनंदिन उपयोगी वस्तूंचे विक्रेते अजूनही नोटांवरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसत आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील छोटे उद्योजकही अडचणीत असून त्यांचा सुमारे १२०० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. तो पुढील तीन-चार महिन्यात मार्गी लागण्याची चिन्हे नाहीत. दरम्यान, गेल्या महिनाभरात औरंगाबादकरांनी सुमारे हजार कोटी रुपये बँकेत जमा केले असून १२०० कोटींचे वितरण झाले आहे. आणखी दोन महिने नोटांचा तुटवडा राहिल, असे बँकांकडून सांगण्यात येत आहे.

नोटाबंदीनंतर पहिले चार दिवस शहरातील व्यापार पूर्णपणे ठप्प होता. त्या चार दिवसात लोकांनी सीडीएम मशीनमध्ये २० कोटी रुपये जमा केले होते. नंतरचे दोन आठवडे एटीएम अपडेट करण्यात गेल्याने लोकांना नोटा मिळाल्या नाहीत. नंतरचे दोन आठवडे लोक नोटांच्या तुटवड्यामुळे त्रस्त झाले. दुसरीकडे ते खरेदीसाठी डिजिटल व्यवहाराकडे वळत असल्याचे समोर येत आहे.

आतानोटा मिळाल्या पाहिजेत
गुरुवारी बँकासमोरील रांगेत उभ्या असलेल्या ७० टक्के लोकांनी नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. मात्र, आता कुठल्याही परिस्थितीत नोटा मिळाल्याच पाहिजेत, अशी भावनाही व्यक्त केली. दरम्यान, बँक व्यवस्थापनांनी आणखी दोन महिने नोटांचा तुटवडा राहिल, असे सांगितले. जनधन अंतर्गत २० हजार खाती उघडण्यात आली. दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा असल्याने कर्ज वितरण ठप्प असल्याचे महाराष्ट्र स्टेट बँक एप्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीला ७० तर एकूण व्यापाराला ६० टक्के फटका बसला आहे. डिसेंबर महिन्यात तो आणखी वाढणार आहे.
पीओएस असलेल्यांचा फायदा : एमजीएमसमोरील मणियार सुपर मार्केटचे हरिहर मणियार म्हणाले की, नोटाबंदीनंतरचे पहिले चार दिवस व्यापारी वर्गासाठी कठीण गेले. गेल्या काही दिवसांत लोक पीओएस मशिन असलेली दुकाने शोधून तेथून खरेदी करत आहेत. माझ्याकडे सध्या साठ टक्के व्यवहार कॅशलेस होत आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होईल, असे दिसते. नोटा सांभाळण्याची गरज नाही. चोरी जाण्याची भिती नाही. हे लक्षात आल्याने लोक आनंदाने खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषीउत्पन बाजार समितीत ७० टक्के व्यवहार चेकने
कृषी उत्पन बाजार समितीचे सचिव विजय सिरसाट यांनी सांगितले की,आता ७० टक्के व्यवहार चेकनेच होत आहेत. जाधववाडी व्यापारी समितीचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल म्हणाले की, बँकेतून रोख रक्कम मिळत नसल्याने मी शेतकऱ्यांना चेक देत आहे. ज्यांचे बँकेत खाते नाही त्यांची अडचण होत आहे. शिवाय बँकांकडे नोटाच नसल्याने चेक मिळाले तरी शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडत नाहीत.

इंटरनेट बँकिंग, पेटीएम, बँकाचे मोबाइल अॅपचा वापर
^औरंगाबाद जिल्ह्यात२० टक्क्यांनी कॅशलेस वाढला आहे. पीओएस मशीन खालोखाल इंटरनेट बँकिंग, पेटीएम, बँकाचे मोबाइल अॅपचा वापर होत आहे. बँकांही कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण देत असल्याने आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जी.जी.वाकडे,व्यवस्थापक अग्रणी बँक

नसलेल्यांचा तोटा
एन-८ येथील किराणा दुकानदार आर. जी. शेवाळे म्हणाले की, नोटाबंदीने खरेदी क्षमताच कमी झाली. दोन हजाराच्या नोटांमुळे ग्राहकांना सामान देणे अवघड झाले आहे. पीओएस नसल्याने ५० % व्यवसाय कमी झाला.

बँकांचे कॅशचे मॅनेजमेंट
आरबीआयकडून नोटा येत नसल्याने बँकांनी एका आठवड्यात एकाच व्यक्तीला २४ हजार देण्यापेक्षा सहा जणांना प्रत्येकी चार हजार देण्याचे व्यवस्थापन केले.
हातावर पोट असलेल्यांची दैना
हातावरपोट असलेल्यांची महिनाभरात दैना झाली आहे. पेटीएम म्हणजे काय माहिती नाही. स्मार्टफोन घेणे शक्य नाही. असे त्यांनी सांगितले. रिक्षाचालक अब्दुल शेख म्हणाले की, दररोजची ६०० रुपयांची कमाई दोनशे रुपयांवर आली आहे.
औरंगाबाद सहजालना औद्येागिक वसाहतीतील सुमारे चार हजार उद्योगांचे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. उद्योजकांचे व्यवहार ऑनलाइन असले तरी दैनंदिन व्यवहारात त्यांचीही अडचण होत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी महिना लागेल, असा अंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा, वाळूजमध्ये हजार तर जालना शहरात आठशेवर (बियाणे, लोखंड) उद्योग आहेत. नोटाबंदीमुळे बजाजची वाहन विक्री ५० टक्क्यांनी घटली. कंपनीचा ३००, व्हेंडर्सचा २०० कोटींचे व्यवहार ठप्प झाला. औरंगाबादमधील मोंढ्याचे व्यापारी ऑनलाईन, पेटीएमकडे वळाले आहेत, असे दिलीप गांधी यांनी सांगितले. जालन्यात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे रोख रक्कम नसल्याने दोनशे कोटींपेक्षा जास्त व्यवहार ठप्प झाले आहेत.
३० वा दिवस
दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या बँकांना आरबीआयने गुरुवारी १०० आणि हजाराच्या स्वरूपात ६८ कोटींच्या नोटा दिल्या. एसबीएचला १२, एसबीआयला ३० कोटी मिळाले. ही रक्कम शहर जिल्ह्यासाठी आहे. तर महाबँकेसाठी आलेले २६ कोटी औरंगाबाद जालना जिल्ह्यातील ६९ शाखांसाठी आहेत. ही रक्कम तोकडी असल्याचे बँकांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...