आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतीत घरे दिली नाहीत, ग्राहकांना व्याजासह पैसे परत करा; ग्राहक मंचाचा बिल्डरला दणका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिल्डरने उभारलेल्या इमारतीची ही छायाचित्रे. - Divya Marathi
बिल्डरने उभारलेल्या इमारतीची ही छायाचित्रे.
औरंगाबाद- शहरातील बिल्डरने एक हजार घरांचा मेगा प्रोजेक्ट जाहीर केला. बुकिंग केल्यास ठरावीक काळात तुम्हाला ताबा मिळेल, असे आश्वासनही त्याने दिले. अनेकांनी बँकेचे कर्ज काढून घरांची बुकिंग केली. मात्र, याला दिलेली मुदत उलटून वर्षे झाली तरी अद्याप त्यांना ना घर मिळाले ना त्यांचे पैसे.
 
तत्कालीन पोलिस आयुक्तांकडे प्रकरण गेले. तेव्हा बिल्डरने मार्च २०१७ पर्यंत घरांचा ताबा देणार, असे अाश्वासन ग्राहकांना दिले. मात्र, आता जुलै उजाडला तरी घरे मिळाली नाहीत. लोक ग्राहक मंचात गेले. राज्य राष्ट्रीय ग्राहक मंचानेही बिल्डरच्या विरोधात निकाल दिला, तरीही फरक पडला नाही. इकडे ग्राहकांना बँकेचे हप्ते मात्र भरावेच लागत आहेत.
 
औरंगाबाद शहरालगत नक्षत्रवाडी येथे गट क्रमांक ८१ मध्ये मे. शमित बिल्डकॉनचे मालक सुयोग रुणवाल यांनी ‘सिंगलटन स्कीम’ या नावाने एक हजार घरांची स्कीम आणली. मार्च २०१३ मध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला. चांगला परिसर, उत्तम १०१ प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आणि बऱ्यापैकी बजेटमध्ये बसणारा हा प्रोजेक्ट आहे, असा विचार करून अनेक लोकांनी यात कर्ज काढून पैसे गुंतवले. या सर्वांना सप्टेंबर २०१४ पर्यंत घरे देण्याचे आश्वासन बिल्डर रुणवाल यांनी दिले होते. मात्र, चार वर्षांत घरे तर मिळाली नाहीतच, उलट या प्रोजेक्टची पार वाताहत झाली.
 
असा होता करार
मार्च २०१३ मध्ये सुरू झालेल्या या प्रोजेक्टच्या नियमानुसार ग्राहकांना सप्टेंबर २०१४ पर्यंत घरांचा ताबा देणे बिल्डरला बंधनकारक होते. सिंगलटन स्कीममधील ग्राहक संतोष पाटील, एकनाथ पठाडे, वैभव भगत, शलाका कहांडळ या ग्राहकांनी घरासाठी कॅश कर्जाच्या स्वरूपात लाखो रुपये जमा केले. हा प्रोजेक्ट २०१४ मध्ये पूर्ण होईपर्यंत ग्राहकांच्या कर्जाचे हप्ते बिल्डर भरेल, असेही ठरले होते.
 
पोलिस आयुक्तांना तक्रार
अखेरयाप्रकरणी सर्वांनी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे १९ जून २०१६ रोजी धाव घेतली. त्यांच्या आदेशानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. तेव्हा आपली चूक मान्य करत रुणवाल यांनी पोलिस आयुक्तांसमोर मार्च २०१७ पर्यंत सर्व ग्राहकांना घरांचा ताबा दिला जाईल, असे आश्वासन देणारे शपथपत्र दिले. मात्र, ते आश्वासनही त्यांनी पाळले नाही.
 
ग्राहक तक्रार मंचात धाव
कोणतीचयंत्रणा मदत करीत नसल्याने संतोष पाटील, एकनाथ पठाडे, वैभव भगत, शलाका कहांडळ यांनी राज्य ग्राहक तक्रार मंचात धाव घेतली. तेथे सहा महिने चाललेल्या या लढाईत अखेर ग्राहकांचा विजय झाला. सर्व ग्राहकांना मार्च २०१४ पासून त्यांनी घरांसाठी भरलेले पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश बिल्डर रुणवाल यांना देण्यात आले. या निकालाविरुद्ध रुणवाल यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार मंच दिल्ली येथे धाव घेतली. तेथे राज्य ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत रुणवाल यांची याचिका फेटाळण्यात आली. २२ जून रोजी हा निकाल आल्यानंतर ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्याचा विशेष फायदा झाला नाही.
 
पुन्हा आयुक्ताकडे धाव
संतोष पाटील, एकनाथ पठाडे, वैभव भगत, शलाका कहांडळ यांनी पुन्हा विद्यमान पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे धाव घेतली आहे. आमची फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधित बिल्डरविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. तपास करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी त्यांना दिले आहे.
 
काय म्हणतात ग्राहक
घराची विचारणा करण्यासाठी गेल्यावर चक्क आम्हाला हाकलून दिले जाते. न्यायालयाच्या निर्णयाची ऑडर दाखवली तरी दाद देत नाहीत. पोलिस आयुक्तांचे आदेश असतानाही काहीच होत नाही. काय करावे, कुणाकडे जावे काहीच कळेनासे झाले आहे.
- अनिल भगत
 

आमचे जेनुकसान झाले आहे त्याची भरपाई दिलीच पाहिजे. शिवाय जनसामान्यांना लुबाडून त्यांची फसवणूक करणाऱ्या अशा बिल्डरविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा दिल्यास ते इतरांसोबत तरी असा प्रकार करणार नाहीत.
- संतोष पाटील
 
घर घेण्यासाठी आम्ही पै-पै जमा करून पैसे दिले आहेत. आम्हाला घर देता येत नसेल तर निदान आमचे पैसे तरी परत करावेत. कारण आता जगणे अशक्य झाले आहे. बँकेचे कर्ज आणि त्याचे हप्ते देऊन थकलो आहोत.
- शलाका कहांडळ
 
केवळ आमचे एकट्याचेच तेही अर्धवट घर तयार करून राहायला या म्हणत आहेत. तेथे ना पाण्याची सोय आहे ना लिफ्टची. सातव्या मजल्यावर जाणार कसे? १०१ प्रकारच्या सुविधा देतो, असे बिल्डर म्हणाले होते. पाणी, लिफ्टसारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. शिवाय आजूबाजूला एकही फ्लॅट तयार नाही. सर्वत्र पसारा आहे. ते अर्धवट घर घेऊन काय करू?
-एकनाथ पठाडे, ग्राहक
 
पुढील स्‍लाइडवर...थेट सवाल सुयोग रुणवाल (शमित बिल्डकाॅनचेे मालक )
बातम्या आणखी आहेत...