आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात वैधतेची 10 हजार प्रकरणे निकाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जात वैधताचे मेपर्यंत 4 हजार 303 प्रकरणे प्रलंबित आहेत. 14 हजार 432 प्राप्त प्रकरणांपैकी 10 हजार 129 प्रकरणांत वैधता प्रमाणपत्र दिले आहे. त्यामध्ये सर्वाधिक 10 हजार 13 विद्यार्थ्यांचे प्रकरणे निकाली काढले आहेत. सेवानिवृत्त ज्येष्ठांनी वैधतेसाठी अद्याप कार्यालयात गर्दी केलेली नसल्याचे (20 जून) चित्र गुरुवारी निदर्शनास आले.

सिडको येथील विभागीय जाती पडताळणी समिती क्रमांक-1 च्या कार्यालयात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास आणि विशेष मागास प्रवर्गांच्या अर्जदारांच्या जात वैधतेवर निर्णय होतो. विविध कार्यालयांमार्फत येणार्‍या अर्जांवर सुनावणी होऊन प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया येथे निरंतर सुरू असून औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्याची कार्यकक्षा आहे. समिती क्रमांक-1 च्या मासिक प्रगती अहवालानुसार मे अखेरीस सर्वाधिक शैक्षणिक प्रकरणांचा निपटारा झाला आहे, तर शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांच्या सेवांतर्गत प्रकरणांचा निपटारा होण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे. एप्रिलपर्यंत 1 हजार 919 प्रकरणे दाखल होते. त्यामध्ये मे अखेरपर्यंत 794 प्रकरणांची भर पडली असून एकूण 2 हजार 713 पैकी केवळ 79 प्रकरणे वैध ठरवली आहेत. अद्याप 2 हजार 634 सेवांतर्गतचे प्रकरणे प्रलंबित आहेत. त्या तुलनेत शैक्षणिक प्रकरणांच्या जात वैधतेचा निपटारा प्राधान्याने करण्यात आला आहे. शैक्षणिक म्हणजेच विद्यार्थ्यांची 10 हजार 13 प्रकरणांची वैधता लगेच तपासून प्रमाणपत्र दिले आहे.

21 प्रकरणे प्रलंबित
सध्या निवडणुकांचा हंगाम नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रकरणे प्राप्त होण्याची संख्या मंदावली आहे. एप्रिलपर्यंत केवळ 15 प्रकरणे आली, त्यात मे च्या 6 प्रकरणांची भर पडली. एकूण 21 जणांच्या जात वैधतेचा अद्याप निर्णय घेतलेला नाही. सर्वच प्रकरणे मासिक प्रगती अहवालात अजूनही प्रलंबित दाखवण्यात आली आहेत.

पेन्शनधारकांची गर्दी नाही
18 मे 2013 च्या शासन आदेशानुसार सेवेतील कर्मचारी आणि पेन्शनर्सना 31 जुलै 2013 पर्यंत जात वैधता करून घेण्याची मुदत दिली आहे. सेवेतील प्रकरणांची वैधता तपासण्याचे काम समिती पूर्वीपासूनच करत असून त्यामध्ये विशेष वाढ झालेली दिसत नाही. तथापि, पेन्शनधारकांनीही अद्याप जात पडताळणीच्या कार्यालयात म्हणावी तशी गर्दी केलेली दिसत नाही.