आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार म्हणतात, वर्षभरात गोठे शहराबाहेर हलवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुवारफल्लीत गोठय़ांमुळे पसरणारी रोगराई, विद्यार्थ्यांना होणारा त्रास, रस्त्यावर पसरणारी घाण आणि अरुंद झालेल्या गल्ल्यांच्या प्रश्नावर डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि नगरसेवकांसह कुवारफल्लीत दाखल झाले. व्यवस्थेविरुद्ध लढा देणार्‍या जरिवाला या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानी दांपत्याची भेट घेतली व केवळ कुवारफल्लीतीलच नव्हे तर वर्षभरात संपूर्ण शहरातील गोठे हलवले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. गोठेधारकांना पर्यायी जागा दिली जाईल तसेच अरुंद गल्ल्या मोठय़ा केल्या जातील, असेही ते म्हणाले.

इंग्रज आणि रझाकारांविरुद्ध तीव्र लढा देणार्‍या 95 वर्षीय रतिलाल जरिवाला आणि 91 वर्षीय चंदाबेन जरिवाला हे वयोवृद्ध दांपत्य गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते कुवारफल्ली भागातील जनावरांचे गोठे हलवा, गलिच्छ गल्ल्या स्वच्छ करा, रस्ते रुंद करा.. शालेय मुलांच्या आरोग्यासाठी तरी हे प्रश्न मार्गी लावा.. या मागण्यांसाठी महापालिकेकडे सतत गार्‍हाणे मांडत आहेत; पण मनपाच्या निर्ढावलेल्या अधिकार्‍यांनी त्यांच्या अर्जांना सातत्याने केराची टोपली दाखवली. साधारण 1990 पासून या भागातील घाणीने व नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्या सर्वांच्या पाठीशी जरिवाला दांपत्य उभे राहिले. अनेक स्मरणपत्रे पाठवूनही त्यांच्या वॉर्डातील नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यावर डीबी स्टारने 6 जुलै रोजी ‘इंग्रजांना हरवले, रझाकारांना नमवले, पण मनपासमोर हात टेकले..’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून मनपाच्या अंधेरनगरी कारभारावर तोफ डागली.

खासदार, महापौरांसह अधिकार्‍यांची कुवारफल्लीत धाव
वृत्त प्रसिद्ध होताच कुंभकर्णी झोपेत असलेले मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. सायंकाळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा अधिकार्‍यांसह कुवारफल्लीत दाखल झाले. या सर्वांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून समस्यांची माहिती घेऊन जरिवाला दांपत्याची भेट घेतली. या वेळी मनपाचे प्रभारी शहर अभियंता हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली, प्रभाग अधिकारी संपतराव जरारे, उपअभियंता के. आर. कुलकर्णी, नगरसेवक जगदीश सिद्ध यांच्यासह मनपाचे इतर अधिकारीही उपस्थित होते. या वेळी खासदार खैरे यांनी वर्षभरात शहरातील सगळेच गोठे हलवून गोठेधारकांना स्वतंत्र जागा दिली जाईल, असे आश्वासन जरिवाला दांपत्याला दिले.

खासदार खैरेंना रहिवाशांचा घेराव
समस्यांची पाहणी करण्यासाठी खासदार खैरे, महापौर ओझा यांच्या वाहनांचा ताफा संस्थान गणपतीमार्गे चिंचोळ्या कुवारफल्लीत शिरला खरा, मात्र अरुंद रस्ते, तुंबलेल्या गटारी व साचलेल्या कचर्‍यातून वाट काढणे अवघड झाल्याने सर्वांना पायी चालत परिसराची पाहणी करावी लागली. या वेळी नागरिकांनी खैरे यांच्यासह सर्वांना गराडा घालून समस्यांचा पाढा वाचला.

थेट सवाल: चंद्रकांत खैरे, खासदार, औरंगाबाद
वारंवार घोषणा करूनही गोठे शहराबाहेर का हलवले जात नाहीत?
हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. त्यासाठी मी सतत पाठपुरावा करीत आहे. पण आता ही योजना लवकरात लवकर राबवावी यासाठी आणखी लक्ष घालणार.

गोठे शहराबाहेर हलवण्यासाठी व पर्यायी जागा देण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे?
135 कोटी रुपये. प्रस्ताव तयार करून तो केंद्राकडे मनपाने पाठवला आहे. यात 80 टक्के केंद्र सरकार, दहा टक्के राज्य सरकार, तर उर्वरित दहा टक्के रक्कम मनपा खर्च करणार आहे.

हा प्रकल्प कधी पूर्ण होणार?
मला एक वर्षाचा कालावधी नागरिकांनी द्यावा. मी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करतो. वर्षभरात या प्रकल्पाचा निधी आणतो. त्याआधी मात्र हे काम होणे अवघड आहे. कुवारफल्लीत खूप नागरी समस्या आहेत, जरीवाला दांपत्य त्रस्त आहे.
डीबी स्टारमुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या निमित्ताने साफसफाई होईल. मी सर्व मनपा अधिकार्‍यांना हा वॉर्ड दाखवला आहे. वॉर्ड स्वच्छ ठेवण्याच्या कडक सूचना महापौरांनीही दिल्या आहेत. शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, वॉर्ड अभियंता व नगरसेवकांना सफाईचे आदेश दिले आहेत.

यापुढे हा त्रास होणार नाही
>या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दांपत्याला यापुढे त्रास होणार नाही याची आम्ही स्वत: काळजी घेऊ. शहराप्रमाणेच कुवारफल्लीतही सातत्याने स्वच्छता ठेवली जाईल. त्यात दुर्लक्ष करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई करणार.
-कला ओझा,महापौर

लगेच प्रस्ताव तयार करणार
>गोठय़ांच्या प्रस्तावाचे काम करण्यासाठी लगेच पशुसंवर्धन अधिकार्‍यांची मदत घेतो. चिकलठाण्याची 25 एकर जागा यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तेथे काही तांत्रिक अडचणी आहेत. शिवाय केंद्राच्या निधीची बरीच वाट पाहावी लागणार. यानंतर शेड उभारणी, जनावरांच्या पाण्याची सोय, ड्रेनेज या सगळ्या गोष्टींसाठी थोडा धीर धरावा लागेल. तरीही आम्ही लगेच कामाला लागणार आहोत.
-सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, मनपा

अतिक्रमण काढणार
> माझे वॉर्डात चांगले लक्ष आहे. या वसाहतीचा जुना नकाशा तपासून जिथे जिथे अतिक्रमण आहे,त्यावर हातोडा पाडणार. याबाबत सहायक नगर संचालकांना जाब विचारणार. एकदा अतिक्रमण काढले की मग रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होईल.
-जगदीश सिद्ध, नगरसेवक