आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून मित्रांना मोबाइल दिला, कारमध्ये बसून उत्तरे शोधतानाच छापा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपास रस्त्यावरील भालगावजवळ असलेल्या शरदचंद्र पवार तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे सोमवारी पोलिसांच्या छाप्यानंतर स्पष्ट झाले. एका परीक्षार्थीने परीक्षा सुरू होताच अर्ध्या तासात मोबाइलने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला. परीक्षा केंद्राच्या परिसरातच कारमध्ये बसलेल्या मित्रांकडे पाठवला. तिघेजण कारमध्ये बसून प्रश्नांची उत्तरे शोधत असतानाच चिकलठाणा पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा मारला. या सामूहिक कॉपी प्रकरणात एक विद्यार्थिनीही सहभागी असून पोलिसांनी तिच्यासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा चिकलठाणा पोलिसांत महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र अंभोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तंत्रनिकेतन तृतीय वर्ष सिव्हिलचा “काँक्रीट टेक्नोलॉजी’ विषयाचा पेपर होता. या विषयाची प्रश्नपत्रिका दहा वाजता परीक्षा केंद्राच्या बाहेर आली. रवींद्र उत्तम पवार या परीक्षार्थीने परीक्षा सुरू होताच त्यांच्याकडील मोबाइलने प्रश्नपत्रिकेचे पहिले पान सोडून इतर सर्व पानांचे फोटो काढले महाविद्यालयाला लागून असलेल्या कारमध्ये बसलेल्या मित्रांकडे पाठवून दिले. त्याचा आधार घेत हे मित्र कॉपी पुरवण्यासाठी पुस्तकाचे पान फाडताना कागदावर उत्तरे लिहिताना चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या पथकाने छापा टाकत हा डाव उधळला. या प्रकरणात वापरण्यात आलेला मोबाइल, अॅक्सेंट कार (एमएच २० इजे ०९८२ ), इतर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. 


अक्षय त्र्यंबक सरकटे (२२, रा. देवखेड, ता. सिंदखेडराजा), दिव्या सतीश गाजरे (२०, रा. गुलमोहर कॉलनी, सिडको) हे घटनास्थळी होते, तर आशिष जोगदंड नावाचा तरुण पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्या मोबाइलने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले होते तो फोन रवींद्र उत्तम पवार याचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानेच मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून गाडीत बसलेल्या अक्षय, दिव्या, आशिष यांच्याकडे आणून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, पोलिस उपअधीक्षक अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, सहायक फौजदार कटकुरी, सुनील गोरे, दीपक इंगळे, संतोष टिमकीकर, नामदेव इजलकुंठे, छाया राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


होम सेंटरमुळे घडला प्रकार
सहामहिन्यांपूर्वी सावंगी येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी मध्यरात्री नगरसेवकाच्या घरी पेपर लिहिताना सापडले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने या वेळी कारवाई केली होती. शिवाय २०११-१२ मध्ये तंत्रशिक्षण मंडळाचे पेपर फुटले होते. याप्रकरणी उपसचिवांची बदली झाली होती. तरीही परीक्षा केंद्रावर तंत्रशिक्षण मंडळाकडून खबरदारी घेण्यात आली नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या केंद्रावर पोलिस बंदोबस्तही नव्हता. होम सेंटर असल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे. 


याच केंद्रावर १४ कॉपी केसेस
शरदचंद्रपवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच कॉपीचा प्रकार टेक्नॉलॉजीचा वापर करून होत असावा. जो प्रकार घडला त्यात कॉलेजच्या आतील लोकांचाही सहभाग असावा, असा दावा पोलिसांनी केला असून, या परीक्षा केंद्रावर पेपरच्या दुसऱ्या दिवशीच १४ कॉपी केसेस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


बैठेपथक रद्द

पारदर्शकतेच्यानावाखाली तंत्रशिक्षण मंडळाने यंदा बैठे पथक रद्द केले. त्याऐवजी फिरते पथक म्हणजे परीक्षा नियंत्रक हा केंद्रावर आळीपाळीने बसेल अशी पद्धत केली. मात्र अनेक केंद्रांकडे फिरते पथकही फिरकलेच नाही. आज कॉपीचा प्रकार उघड होताच पोलिसांच्या कारवाईनंतर उपसचिवांनी भेट दिली. 


अहवालानंतर कारवाई 
कॉलेजमध्ये मोबाइलवर प्रश्नपत्रिका पेपर होण्यापूर्वीच बाहेर आल्याचा प्रकार माझ्याही कानावर आला आहे. यासंदर्भात कॉपी केसचा अहवाल मागवला असून, तो अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल. 
- डॉ.व्ही.एम.मोहितकर, राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव 


उप सचिवांकडूनच पाठीशी घालण्याचा प्रयत्न
हा प्रकार घडला तेव्हा तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव आणि सहायक सचिव दौऱ्यावर होते. पेपर संपण्यापूर्वीच बाहेर कसा आला, असे विचारता असा प्रकार कॉलेजमध्ये घडलाच नसल्याचे सांगत उपसचिव सहायक सचिवांनी कॉलेजलाच पाठीशी घातले. राज्याचे सचिव डॉ.व्ही.एम.मोहितकर यांनी विचारणा केली असता उपसचिव सहायक सचिव यांनी आम्ही शहरातच आहोत असे ठोकून दिले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही संशय घेतला जात आहे. 


परीक्षा केंद्रात मोबाइल येतो कसा? 
कॉपीच्याप्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात परवानगी नसताना मोबाईल नेला कसा? परीक्षा सुरू असताना तो परीक्षेच्या बाहेर आला कसा? कारमधील तिघे हे फक्त रवींद्रला कॉपी देणार होते की सामूहिक कॉपीचा प्रकार होता? याचा पोलिस तपास करीत आहेत. कॉलेजच्या उजव्या बाजूला शेत असून या ठिकाणी संरक्षण भिंतीही नाहीत. शेताला लागून परीक्षा हॉल आहेत. 


प्राचार्य शैलेंद्र अंभोरे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या पत्रकात साडेबारा वाजता ही कारवाई झाली, ही बाब आम्हाला पोलिसांकडूनच समजल्याचे म्हटले आहे. तर परीक्षा सुरू होताच अर्ध्या तासात म्हणजे सकाळी दहा वाजताच आम्ही छापा टाकल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दहा वाजता कारवाई झाली होती तरी रात्री आठ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती. नोव्हेंबर रोजी पहिला पेपर होता तेव्हापासूनच हा प्रकार सुरू असावा, असा पोलिसांचा संशय आहे. यात काही प्राध्यापक महाविद्यालयातील इतर कोणी सहभागी असल्याचा संशय असून त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती ताईतवाले यांनी दिली. 


कॉलेजच्या आत नव्हे, बाहेर घडला प्रकार 
कॉपीचाप्रकार कॉलेजच्या आत नाही तर बाहेर घडला. केस होईल, त्याची कमिटी बसेल. त्यानंतर कारवाईची शिफारस करू, असे तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ.आनंद पवार यांनी सांगितले. 


केवळ यांनाच मोबाइलची परवानगी 
परीक्षेच्यावेळी फक्त मुख्य परीक्षा अधिकारी, ऑफिसर इन्चार्ज, कंट्रोलर यांनाच फक्त मोबाइल वापरण्याची परवानगी आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...