आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Ex Commissioner Jogindar Singh In Aurangabad

व्यवस्थेतील बदलांसाठी आधी स्वत: बदला- सीबीआयचे माजी महाचालक जोगिंदरसिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- देशातील व्यवस्थेमध्ये बदल आणण्यासाठी सरकारवर दबाव आणा; परंतु त्याआधी स्वत:मध्ये बदल घडवा आणि सर्व बदलांची सुरुवात स्वत:पासून, घरापासून करा. देशाच्या प्रगतीसाठी सैनिक बनल्याशिवाय नवीन घडणार नाही याची खूणगाठ बांधा, असे आवाहन ‘सीबीआय’चे माजी महासंचालक जोगिंदरसिंग यांनी केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या देवगिरी प्रांताच्या वतीने रविवारी ‘शुद्धतेसाठी युद्ध’ या विषयावर संत एकनाथ रंगमंदिरात कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपमहापौर संजय जोशी, अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण देशपांडे, गंगाधर शुक्ल उपस्थित होते. जोगिंदरसिंग म्हणाले, सत्तेतील मंत्री, आमदार-खासदार हेसुद्धा समाजाचा भाग आहेत. त्यामुळे आधी स्वत:ला बदलावे लागेल. सरकारवर दबाव आणावा लागेल. व्यवस्था बदलण्यासंदर्भात सरकारला मार्गदर्शन करणे, नवनवीन सूचना करणे, निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडणे, यासारख्या विविध मार्गातून हे युद्ध प्रत्येकाला लढावे लागेल. अनेक कायदे इंग्रजांच्या काळातील असल्याने ते बदलल्याशिवाय तरणोपाय नाही, असेही जोगिंदरसिंग म्हणाले. साळुंके यांनी अन्न सुरक्षा कायद्याची माहिती दिली. तर 2006 मध्ये आलेल्या व 2013 मध्ये लागू झालेल्या अन्न सुरक्षा कायद्यामुळे भेसळ करणार्‍यांना कुठलीही भीती, दहशत वाटू शकत नाही. भेसळ करून लाखो रुपये लाटणार्‍यांना पाचशे-हजारांचा दंड लावण्याची तरतूद असणारा हा कायदा म्हणजे निव्वळ बुजगावणे आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली. अश्विनी दाशरथे यांनी सूत्रसंचालन केले.