आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Ex Commissioner Joginder Singh In Aurangabad

स्वायत्तता सोडा, ‘सीबीआय’ला मोकळेपणाने काम करू द्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘सीबीआय’ला स्वायत्तता द्यावी, अशी देशभर चर्चा सुरू आहे; परंतु त्यांना आधी मोकळेपणाने काम तर करू द्या.. तेच सर्वांत महत्त्वाचे आहे. सध्या कुठलीही गोष्ट करण्याआधी सरकारला विचारावे लागते. त्याशिवाय अनेक अडचणी आहेत, ज्यामुळे ‘सीबीआय’ आपले काम मोकळेपणाने करू शकत नाही, असे स्पष्ट मत ‘सीबीआय’चे माजी महासंचालक जोगिंदरसिंग यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यक्रमानिमित्त ते शहरात आले होते. सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जोगिंदरसिंग यांनी ‘सीबीआय’च्या कामातील अडचणी मांडल्या. ते म्हणाले, मुळात अधिकारी-कर्मचार्‍यांची मोठी कमतरता आहे. पोलिस, सीपीआरएफ, बीएसएफमधून ‘सीबीआय’साठी अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करावी लागते. त्यांच्या संपूर्ण नोकरीचे रेकॉर्ड तपासले जाते. गुणवत्तेबरोबरच प्रामाणिकपणा, सचोटी बघूनच नेमणूक केली जाते. निकषांशिवाय नेमणूक होत नसल्याने कायम माणसांची कमतरता असते. परिणामी, डीएसपी दर्जाच्या अधिकार्‍यालाही छोटी-छोटी कामे करावी लागतात. त्यामुळेच आहे त्या मनुष्यबळाकडून काम करून घ्यावे लागते. तपास यंत्रणेसाठी लागणारी वाहने व इतर सोयी-सुविधांचीही सतत वानवा असते. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला विचारावे लागते. अगदी पेन, पेन्सिल, कागद घ्यायचा असला तरी सरकारले विचारावे लागते. अशा सगळ्या अडथळ्यांचा परिणाम कामावर होतो. या पार्श्वभूमीवर ‘सीबीआय’ला देशातील इतर काही स्वायत्त संस्थांप्रमाणे मोकळीक देणे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी गैरव्यवहार करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना 24 तासांच्या आत निलंबित करणे महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेशच्या एका सनदी अधिकार्‍याला गैरव्यवहारप्रकरणी चक्क तीन वर्षांनंतर निलंबित करण्यात आले, ही कुठली कारवाई, असा सवालही जोगिंदरसिंग यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण देशपांडे व इतरांची उपस्थिती होती.

पंतप्रधानांचाही दबाव झुगारला
महासंचालक असताना एका केसच्या संदर्भात थेट पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जो काही आदेश आहे, तो तोंडी न देता लिखित स्वरूपात द्यावा, या मतावर मी शेवटपर्यंत ठाम राहिलो. त्या वेळी काय वाट्टेल ते झाले तरी चालेल; परंतु तपास पूूर्ण करायचा, या निश्चयाने मी उभा राहिलो, अशी आठवणही जोगिंदरसिंग यांनी सांगितल्या.