आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर सीसीटीव्ही वॉच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ही काही नवीन बाब नाही, परंतु जिल्हा परिषदेच्या सातारा येथील शाळेतील प्रत्येक वर्ग आणि मैदानातील हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांचे कंट्रोल मुख्याध्यापिकेच्या दालनात असून तेथे बसून त्या प्रत्येक वर्गातील हालचालींवर लक्ष ठेवतात. यामुळे वर्गात शिक्षक नसतानाही कोणाचे लक्ष आहे, हे माहिती झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागली आहे. तसेच परिसरात सुरक्षितता, स्वच्छता आणि शांततेसाठीही कॅमेरे उपयोगी ठरताहेत.
सातारा येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा ही देशातील पहिली आयएसओ ९००१-२००८ मानांकित शाळा आहे. एप्रिल २०११ मध्ये या शाळेला हा किताब मिळाला. खासगी शाळेलाही लाजवतील अशा अनेक सुविधा या शाळेत आहेत. आता त्यात क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेऱ्यांची भर पडली आहे.
सोळा कॅमेऱ्यांची नजर
इथली शालेय व्यवस्थापन समिती आणि लोकवर्गणीतून यंदा जुलै महिन्यात शाळेत १६ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शाळेतील १४ वर्ग, १ संगणक प्रयोगशाळा आणि मैदानातील प्रत्येक हालचाली हे कॅमेरे टिपतात. मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू या केबिनमध्ये याचे निरीक्षण करतात. प्रत्येक कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणारे छायाचित्रण ३ महिन्यांपर्यंत संगणकात सेव्ह राहते. या कामासाठी ६९ हजार रुपये खर्च आला.

असा होतो फायदा
या शाळेत बहुतांश अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही मुले शिक्षणाच्या ओढीने शाळेत येतात. त्यांचे शाळेत नुकसान होऊ नये, यासाठी कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कधी शिक्षकांना वर्गात येण्यास उशीर झाला, तर विद्यार्थी गोंधळ घालतात. काही मुले शाळेत कचरा टाकतात, इतरांना त्रास देतात. अशा सर्वच बाबींवर मुख्याध्यापिकांची कडक नजर असते. अशी घटना निदर्शनास येताच त्या वर्गात धाव घेतात किंवा इतर शिक्षकांना पाठवतात. आपल्यावर कोणाची नजर असल्याचे लक्षात आल्यामुळे विद्यार्थी स्वत:हून शिस्तीचे पालन करू लागले आहेत.

कामात मदत होते
*आमची शाळा शिस्तप्रिय आहे; पण कधी- कधी विद्यार्थी दंगामस्ती करतात. कधी शिक्षकांना वर्गात पोहोचण्यास उशीर झाल्यास अभ्यास करण्याऐवजी गप्पा मारत बसतात. शाळेच्या परिसरातील सुरक्षितताही महत्त्वाची आहे. कॅमेऱ्यामुळे बसल्या ठिकाणाहून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी मदत होते.
-मंजुश्री राजगुरू, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा, सातारा