आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CCTV Camera And Temple Security Issue At Aurangabad

सीसीटीव्ही विक्रेत्यांनी सवलतीत यंत्रणा देण्याची दाखवली तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धार्मिक स्थळी अपप्रकार घडू नये म्हणून लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या "दिव्‍य मराठी'च्या आवाहनाला शहरातील प्रमुख विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहरातील केवळ धार्मिक स्थळांसाठी ना नफा, ना तोटा तत्वावर ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याची तयारी ८ प्रमुख विक्रेत्यांनी दाखवली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळी ही यंत्रणा लावण्याच्या खर्चात मोठी कपात होणार आहे.

चोरी आणि विटंबना टाळण्यासाठी आणि पर्यायाने शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वच धार्मिक स्थळी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, असे आवाहन 'दिव्‍य मराठी'ने केले आहे. त्याची आवश्यकता स्पष्ट करणारी आकडेवारी आणि जुन्या घटनाही समोर आणल्या. त्यामुळे अशी यंत्रणा बसविण्याची आवश्यकताही सर्वांनाच प्रकर्षाने जाणवते आहे. "दिव्य मराठी'च्या आवाहनानंतर कंुवारफल्लीतील जागृत गणेश मंदिरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यातही आली आहे. त्यासाठी गणेशभक्त शंकर रामचंदानी यांनी पुढाकार घेतला. अनेक धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनानेही ही यंत्रणा बसविण्याची तयारी दर्शवली आहे.

आता शहरातील प्रमुख आठ विक्रेते पुढे आले असून त्यांनी धार्मिक स्थळांसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर सीसीटीव्हीची यंत्रणा द्यायची तयारी दाखवली आहे. त्यामुळे खर्चात २५ टक्क्यांपर्यंत बचत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्यावसायिकांनी अनेक मोठ्या संस्थांमध्ये ही यंत्रणा बसवली असून या धार्मिक आणि समाजहिताच्या कामात आपले योगदान असावे, यासाठी आपण हा पुढाकार घेत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या सुविधेचा लाभ धार्मिक संस्थांनी घेण्याची आवश्यकता आहे.
दानशूरांचाही हवा पुढाकार
"दिव्‍य मराठी'च्या आवाहनानंतर अनेक धार्मिक संस्थांनी ही यंत्रणा बसविण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यासाठी लागणारी रक्कम उभी करणे अनेक संस्थांसाठी कठीण आहे. अशा धार्मिक स्थळी ही यंत्रणा बसवून देण्यासाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहनही 'दिव्य मराठी' करीत आहे. ज्यांना एक किंवा अधिक धार्मिक स्थळी सीसीटीव्ही बसविण्याची इच्छा असेल अशा प्रायोजकांनी खाली दिलेल्या क्रमांकावर एसएमएसद्वारे अथवा ई मेल आयडीवर संपर्क साधावा.