आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंडोबा मंदिरावर चार नवीन कॅमेऱ्यांची नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा गावातील खंडोबा मंदिरात आलेल्या एमआयटीच्या विद्यार्थिनीचा दहा हजारांचा मोबाइल चोरांनी पळवल्याची घटना मागील महिन्यात घडली. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैदही झाला. परंतु मुळात कमी क्षमतेचा कॅमेरा त्यातच कॅमेऱ्यापासून ही घटना दूर घडल्यामुळे चोरट्यांना ओळखणे अवघड बनले. त्यामुळे मंदिर ट्रस्टने मागील आठवड्यात बैठक घेऊन चार अत्याधुनिक कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी नवीन कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि इतिहासातील पुरातन ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा मंदिरात भाविकांची रीघ लागलेली असते. यात्राकाळात तर गर्दीचा उच्चांक होतो. त्यामुळे मंदिर परिसरात यापूर्वीच चार कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, मागील महिन्यात चोरट्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाइल लांबवला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊनही उच्च दर्जाचे चित्रीकरण झाल्याने चोरट्यांना ओळखणे शक्य झाले नाही. त्यातच वार्षिक यात्रोत्सवही तीन महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे मंदिर परिसरात तिसऱ्या डोळ्याची नजर आणखी करडी करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्याबाबत गत आठवड्यात झालेल्या बैठकीत मौर्या कन्सलटन्सीने कॅमेरे त्याचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवले होते. संस्थानच्या सर्व सदस्यांना खात्री पटल्यानंतर कॅमेरे खरेदी करून मंदिर परिसरात लावण्याचा निर्णयही तत्काळ घेण्यात आला. त्यानुसार मंदिर संरक्षण भिंत यासह बाहेरील परिसरावर आता नवीन जुने अशा एकूण आठ कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

दोनवर्षांपूर्वी लावले होते चार कॅमेरे : दरवर्षीचीमहिनाभर चालणारी यात्रा लक्षात घेऊन तत्कालीन विश्वस्त मंडळाने ६५ हजारांचे चार कॅमेरे खरेदी करून मंदिरात लावले होते. आतापर्यंत या चार कॅमेऱ्यांद्वारे मंदिर परिसरातील हालचाली टिपल्या जात होत्या. मात्र, गर्दी नसतानाही चोरीचा प्रकार घडल्याने कॅमेऱ्यांची संख्या आणि दर्जा वाढवण्याची गरज अधोरेखित झाली. त्यामुळे आणखी चार कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेत ते बसवण्यात आले आहेत.

सुरक्षेला अग्रक्रम
^चोरी तसेच अप्रिय घटना टाळण्यासाठी यापूर्वीच कॅमेरे बसवले होते. यासह रात्रीच्या वेळीही मंदिर परिसरावर नजर ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांची संख्या वाढवली -साहेबराव पळसकर, अध्यक्ष, खंडोबा मंदिर

गर्दी हाताळणे शक्य
नवीन जुन्या एकूण आठ कॅमेऱ्यांमुळे मंदिर, संरक्षक भिंतीच्या आतील परिसर तसेच बाहेरील आवार यावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. अंधारातील हालचाली टिपण्याची क्षमताही या कॅमेऱ्यांत आहे. त्यामुळे यात्रोत्सवाचे नियोजन, भाविकांची गर्दी हाताळणे सोयीचे होणार आहे.
सातारा गावातील खंडोबा मंदिरात अत्याधुनिक कॅमेरे बसवण्याचे काम बुधवारी पूर्ण करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...