आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: सीसीटीव्हीने दाखवले सिग्नल तोडणारे 5 हजार; घर सापडले 1950 जणांचेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या सहा महिन्यांत सिग्नल तोडणाऱ्या सुमारे पाच हजार जणांच्या दंडाच्या पावत्या वाहतूक विभागाने तयार केल्या. मात्र, त्यातील केवळ १९५० जणांचेच अचूक पत्ते पोलिसांना सापडले आहेत.
 
तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या संकल्पनेतील सेफ सिटी योजनेत शहरातील मुख्य मार्ग तसेच चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यातील बंद पडलेले काही कॅमेरे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पुन्हा सुरू केले. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी सीसीटीव्हीचा कितपत उपयोग होतो, याची माहिती घेतली असता पत्तेच सापडत नसल्याने पोलिस जेरीस आल्याचे सांगण्यात आले.
 
बाकीचे का राहिले? : पोलिसांच्या म्हणण्यानुसार अनेक दुचाकीचालकांचा पत्ता बदललेला, चुकीचा किंवा अर्धवट असतो. वाहन परवान्यावर (लायसन्स) बदललेल्या किंवा अचूक पत्त्याची नोंदच नसते. शिवाय काही वाहनचालक ग्रामीण भागातील अथवा दुसऱ्या शहरातील असतात. त्यामुळे जोपर्यंत अचूक पत्ता आरटीओ कार्यालयातून मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येकाच्या हातात पावती देणे कठीण आहे.

अशी आहे पद्धत
सिग्नल तोडणारे तसेच विनाहेल्मेट दुचाकीस्वार सीसीटीव्हीत पाहायचे आणि  दुचाकी क्रमांकावरून त्याचा वाहन परवाना शोधायचा. त्यावरील पत्त्यावर दंडाची पावती पाठवायची, अशी पद्धत आहे. त्यानुसार जानेवारी २०१७ ते जुलै २०१७ मध्ये एकूण पाच हजार वाहनचालकांना घरपोच पावत्या पाठवल्या. पण १९५० वाहनधारकांचा शोध लागला, असा दावा वाहतूक पोलिस विभागाने केला आहे.

विशेष कॅमेऱ्यांची मदत : सध्या पावत्या तयार करण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागते. यादव यांनी सेफ सिटी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठीच्या एक हजार कॅमेऱ्यांच्या प्रस्तावामध्ये ५० विशेष अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञानयुक्त या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साॅफ्टवेअरमध्ये आरटीओ कार्यालयातील वाहनांची नोंद असते. नियम तोडलेला वाहनचालक दिसताच दंडाची पावती तयार होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊ शकतो. नोव्हेंबरअखेर हे कॅमेरे मिळू शकतात.

काही भागात लोक वाहनचालकांचा खरा पत्ता माहिती असला तरी आम्हाला सांगत नाहीत. या गल्लीतून त्या गल्लीत फिरवतात, असाही अनुभव येत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

१ उपाय : मोबाइलवर कॉल
तज्ज्ञांनी सांगितले की, आरटीओ कार्यालयात वाहनचालक मोबाइल क्रमांक नोंदवतात. त्यावर काॅल करून त्याचा पत्ता शोधता येऊ शकतो.

२ पत्ता अपडेट करण्याचे बंधन
आरटीओ, वितरकाकडे वाहन नोंदणीेवेळी नोंदवलेला पत्ता बदलल्यास तो अपडेट करण्याचे बंधन कायद्याने करावे लागेल.

सर्वाधिक कारवाई जालना रोडवर
क्रांती चौक, महावीर (बाबा पेट्रोल पंप), अमरप्रीत, आकाशवाणी, सेव्हन हिल्स चौकांमध्ये सीसीटीव्हीद्वारे तर त्याखालोखाल समर्थनगर, मिल कॉर्नर येथील कारवाई झाली आहे. ३०५० वाहनधारकांचे पत्ते शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी सांगितले. तर जिल्ह्यात १० ते १२ लाख लोकांकडे स्मार्ट कार्डच्या रूपातील परवाना आहे, असे आरटीओतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...