आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेदरकार वाहनांना रोखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजआधारे होणार कारवाई, लायसन्सही होणार रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बेदरकारपणे वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही लागतील. पुढील दोन महिन्यांत शहरातील सर्व सिग्नलची दुरुस्ती करण्यात येणार असून रस्त्यावरील डावी, उजवी बाजू आणि इतर सूचना देणारे फलकही लावले जातील. नियम धाब्यावर बसवून गाडी चालवणाऱ्यांचे लायसन्सही रद्द होईल. बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे वाढणारे अपघात रोखण्यासाठी ‘दिव्य मराठी’कडून अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत दिव्य मराठी कार्यालयात बुधवारी झालेल्या टॉक शोमध्ये महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी हे आश्वासन दिले. 


या टॉक शोमध्ये वाहतूक शाखा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त चंपालाल शेवगण, मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अॅड. सचिन सारडा, रुपेश भोसले, प्रीती डिग्गीकर, रिक्षा चालक संघटनेचे निसार खान, एमआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले, समाजसेवक राजेश चंचलाणी, एसएफएसचे शिक्षक संदीप शिंदे, मोहम्मद बशीर, कैलास शिंदे यांची उपस्थिती होती. बेदरकारपणे वाहन चालवण्यामुळे बीड बायपास, जालना रोड शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 


तरुण आणि अल्पवयीन मुलेही चार चाकी आणि दुचाकी गाड्या वेगाने चालवत असून नागरिकांच्या जीवनाशी खेळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. या गोष्टी थांबाव्या यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन अभियान सुरु केले. अशा प्रकारचे अपघात रोखणे ही महानगरपालिका आणि पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन देणे, रस्ते, सिग्नल आणि थांबे आणि रस्त्यावरील सूचना फलकांचे काम पुढील दोन महिन्यांत झालेले असेल, असे आश्वासन महापौरांनी दिले, तर या उपक्रमासाठी सीएसआर, डीपीडीसी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करू,असे आश्वासन उपमहापौर विजय औताडे यांनी दिले. अशा चालकांचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी आरटीओकडे शिफारस करण्यात येईल, आतापर्यंत असे तीन हजार अर्ज केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शेवगण यांनी यावेळी दिली. 


सीएमआयए करणार सिग्नल्सची दुरुस्ती 
महापौरघोडेले यांनी या टॉक शोमध्ये अनेक निर्णय घेतले. सिकंदर अली सहायक पोलिस आयुक्त शेवगण हेही टॉक शोमध्ये सहभाग असल्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय झाले. सीएमआयएचेे रितसिंग बग्गा यांच्याशी बोलणी झाली. त्यानुसार सध्या असलेल्या सर्व सिग्नलची दुरुस्ती करुन पुढील वर्षांसाठी त्याचे मेंटेनन्ससाठी सीएमआयए पुढाकार घेईल, असे बग्गा म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...