आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे वाॅर्ड अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांवर सीसीटीव्हीची नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाॅर्ड कार्यालयात कोण हजर आहे अन् कोण गैरहजर, कोण काम करतो, कोण टवाळक्या करतोय, आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स काय करताहेत, शाळेच्या वर्गात शिक्षक शिकवताहेत की मुले फक्त बसून आहेत, हे यापुढे पालिकेचे आयुक्त एका ठिकाणी बसून बघू शकतील. यामुळे कामचुकारांना चाप बसेल. त्यासाठी वाॅर्ड कार्यालय, रुग्णालय शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून कंट्रोल रूम स्थापन करण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव येत्या १९ नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसे नाहीत, असे कारण पुढे येऊ नये म्हणून यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शासनाकडून निधी मिळवावा, अशी सूचनाही सदस्यांनी केली आहे.
गेल्या दीड वर्षापासून शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीचीच चर्चा सुरू आहे. केंद्राने मान्यता दिल्याने शहरालगत लवकरच नवे स्मार्ट शहर वसणार आहे. सगळीकडे स्मार्ट गोष्टी होत असताना महानगरपालिकेनेही काही स्मार्ट कामे करावीत, अशी पालिका सदस्यांची इच्छा आहे.
पालिकेचा कारभार सुधारला तरच आपण स्मार्ट झालो, असे म्हणता येईल. परंतु पारंपरिक पद्धतीने आणि सामान्य नागरिकांची कामे करण्याची पद्धत कायम ठेवली तर पालिकेची आणखी बदनामी होईल, ही भावनाही त्यामागे आहे. त्यामुळे वाॅर्ड कार्यालय, पालिकेच्या सर्व शाळा, सर्व रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक कंट्रोल रूम तयार करण्यात यावी आणि एकाच ठिकाणाहून वरील तिन्हीही ठिकाणच्या कामकाजावर लक्ष ठेवता यावे यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे प्रस्तावाचे सूचक नंदकुमार घोडेले यांनी म्हटले आहे.

नागरिकांचीकामे मार्गी लागतील
आपल्या कामावर थेट आयुक्तांचीच नजर असल्याचे समजल्यानंतर वरील तिन्हीही ठिकाणचे अधिकारी-कर्मचारी सुतासारखे सरळ होऊन जनतेची कामे करतील. नागरिकांची कामे लवकर निकाली निघतील अन् महानगरपालिका आता स्मार्ट झाली असे चित्रही निर्माण होईल. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने शाळा तसेच रुग्णालयांसाठी असा प्रयोग केला असून त्यामुळे मोठा फरक पडल्याचे समोर आल्यानंतर सदस्यांनी हा अशासकीय प्रस्ताव पुढे केला आहे. यासाठी फारसा खर्च अपेक्षित नाही. परंतु जो काही खर्च येईल तो स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शासनाकडे मागावा आणि तो मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. हा निधी मिळेल अन् येत्या काही महिन्यांत अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर आयुक्तांची नजर असेल असे सदस्यांना अपेक्षित आहे. कॅमेरे बसल्यानंतर उपद्रवी अभ्यागतांनाही आळा बसेल.

नेमका काय फायदा होईल ?
प्रत्येक वाॅर्ड कार्यालयात वाॅर्ड अधिकाऱ्यासह कर्मचारी बसतात तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. त्याचबरोबर पालिका शाळांच्या प्रत्येक वर्गात असे कॅमेरे असतील. रुग्णालय आरोग्य केंद्रात डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात तेथेही कॅमेरे असतील. त्याचे नियंत्रण पालिका मुख्यालयातील एका नियंत्रण कक्षात असेल. तेथे बसून स्वत: महापौर, आयुक्त किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी निगराणी करू शकतील. वाॅर्ड अधिकारी कार्यालयात आहे काय, आहेत ते कर्मचारी काय करताहेत, त्यांच्याकडे कामासाठी आलेली व्यक्ती किती वेळेपासून कार्यालयात आहे, शिक्षक कोणत्या वर्गात आहे, कोणत्या वर्गात शिक्षक नाहीत, डॉक्टर नेमके काय करताहेत. रुग्णांची किती लांब रांग लागली आहे, या सर्व बाबी बसल्या जागी दिसू शकतील.
बातम्या आणखी आहेत...