आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यांच्या आॅनलाइन शुभेच्छांवर गुरूंचा ई-आशीर्वादाने प्रेमाचा वर्षाव, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गुरुपौर्णिमा पारंपरिक उत्सव असला तरी यंदा यास अाधुनिकतेची जोड देण्यात आली. फेसबुक, फेसबुक लाइव्ह, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिष्यांनी गुरूंना शुभेच्छा दिल्या. गुरूंनीही ई-आशीर्वाद देत शिष्यांवर प्रेमाचा वर्षाव केला. शहरातील गानगुरुकुलांत संगीतसेवा झाली, तर नृत्य अकादमींमध्ये नृत्यांजली वाहण्यात आली. डॉक्टरांनीही आपल्या गुरूंना पुष्प देऊन आशीर्वाद घेतले. शहरातील धार्मिक संस्थानांमध्ये दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती. 

पाश्चात्त्य संस्कृतीत तरुणाई वाहवत जात आहे अशी ओरड सतत होत असते. मात्र, फादर्स डे, मदर्स डे अन् टीचर्स डेच्या सोबतीने तरुणाई गुरुपौर्णिमाही दणक्यात साजरी करते याचा प्रत्यय रविवारी साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाने आला. व्यक्त होण्याची माध्यमे बदलली आहेत. त्यांचा अचूक वापर करत तरुणाईने घातलेल्या सादेला गुरुवर्यांनीही त्याच भाषेत उत्तरे दिली. 

फेसबुक लाइव्ह
हेमानेरळकर यांनी राज्यभरात विखुरलेल्या आपल्या शिष्यांसोबत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. याद्वारे शिष्यांनीही गानवंदना देत गुरूंना अभिवादन केले. 

लईलई नाही मागणं.....भैरवीने साजरी झाली गुरुपौर्णिमा
ज्येष्ठगायक पं. नाथराव नेरळकर यांच्या शिष्यांनी रविवारी सकाळीच गुरूंच्या पुढ्यात हजेरी लावली. जवळचे शिष्य आणि गुरूंचा हा संगीत संवाद तल्लीन करणारा होता. राग बैरागी, शुद्ध सारंग, भूपाल तोडी, सारंग आणि अहिरभैरवसारख्या अनवट रागांनी ही छोटेखानी मैफल रंगली. स्वर-सुरांची ही जादूगिरी गुरू-शिष्यांना तृप्त करणारी ठरली. यामध्ये दिनेश संन्यासी, दिलीप दोडके, दोस्त मोहंमद खान, शिवराम गोसावी, जयंत नेरळकर यांचा सहभाग होता. ‘लई लई नाही मागणं’ या गुरुजींच्या भैरवीने गुरुपौर्णिमेची सांगता झाली. 

धार्मिकसंस्थांत रेलचेल
संग्रामनगरयेथील रेणुकामाता मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, जैन मंदिरे, साई मंदिर (चिकलठाणा), सिडको-हडको परिसरातील दत्तमंदिरे अशा सर्व ठिकाणी सकाळपासूनच अभिषेक, पूजाअर्चना, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. 

अाध्यात्मिक संस्थांचेही सोहळे 
आर्ट ऑफ लिव्हिंग, तेजज्ञान फाउंडेशन, स्वाध्याय परिवार अशा विविध अाध्यात्मिक संस्थांनी भरगच्च कार्यक्रम घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली.

साहित्य श्रेष्ठांचा फेसबुक संदेश 
प्रख्यातसाहित्यिक रा. रं. बोराडे यांनी सकाळीच ‘चराचरातील माझ्या सर्व गुरुवर्यांना वंदन’ असा सुरेख संदेश फेसबुकवर अपलोड केला अन् पाहता पाहता त्याला १७० हून अधिक लाइक्स मिळाल्या. त्यांच्या शिष्यांनी त्यावर कमेंटही केल्या. बोराडे म्हणाले, दरवर्षी माझे शिष्य राज्यभरातून मला भेटायला येतात. आता काळ बदलला आहे. आपणही त्या प्रवाहावर आरूढ व्हायला हवे. यंदा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आमची गुरुपौर्णिमा साजरी झाली. चरचरातील प्रत्येक जीव आपला गुरू असतो. साखरेचा दाणा उचलणारी मुंगीदेखील आपल्याला आयुष्याचे काही धडे शिकवून जाते. यासाठी मी सकाळीच संदेश टाकला होता.
 
डॉक्टर गुरूंचाही सत्कार 
श्वास घेण्यासही उसंत मिळत नसलेल्या घाटीच्या स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धेने साजरी झाली. विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्यासह डॉ. भक्ती कल्याणकर, डॉ. प्रतिभा दीक्षित, डॉ. ऋषिकेश मधाने, श्रीकृष्ण चौहान, डॉ. विजय कल्याणकर या शिक्षकांसाठी डॉ. रसिका महिन, डॉ. अपूर्वा आफळे, डॉ. जईता घोष, डॉ. शगुफ्ता आणि हनी गेमावत या शिष्यांनी केक आणि बुके आणला. काही क्षणांचा वेळ काढत केक कापला. 
बातम्या आणखी आहेत...