आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमीवरील स्मितहास्य हरपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण करणा-या स्मिता तळवलकर गेल्याने रंगभूमीवरील स्मितहास्य हरवल्याची प्रतिक्रिया रंगकर्मी आणि अभिनेत्यांनी व्यक्त केली.
खाली बसून नाटक पाहिले

- ‘गाजराची पुंगी’ नंतर विभागातर्फे ‘लक्ष’ हे सव्वा तासाचे मूकनाट्य बसवण्यात आले होते. अरविंद जगताप यांनी हे नाटक लिहिले होते. प्रेषित रुद्रावार, शीतल रुद्रावार, सतीश परब, विनीत भोंडे, योगेश शिरसाट या कलावंतानी या नाटकात काम केले. त्या वेळी नाट्यगृहात आसन व्यवस्था नव्हती. तेव्हा तळवलकर यांनी खाली बसून हे नाटक पाहिले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दिलीप घारे, ज्येष्ठ रंगकर्मी
उत्तम प्रशिक्षक
स्मिता तळवलकर या उत्तम अभिनेत्रीबरोबरच उत्तम प्रशिक्षक होत्या. नवोदित कलाकारांना त्या नेहमी प्रोत्साहन द्यायच्या. विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाला त्यांनी भेटही दिली. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी असूनदेखील त्यांनी साध्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शशिकांत बºहाणपूरकर, विभागप्रमुख, नाट्यशास्त्र विभाग, विद्यापीठ

आशयघन चित्रपटांची निर्मिती केली
चित्रपट प्रभावी माध्यम आहे याची जाणीव ठेवून आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्यामध्ये स्मिता तळवलकर पुढे होत्या. एक वेगळा विचार मांडणा-या निर्मात्या, दिग्दर्शिका म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. सध्याच्या तरुण पिढीसमोर त्यांचे कार्य आदर्शवत आहे, यात शंका नाही. किशोर शिरसाट, ज्येष्ठ रंगकर्मी

मने जपणारी कलावंत
- तीन वर्षांपूर्वी मुंबईत त्यांच्या थिएटर अकादमीत जाण्याचा योग आला होता. त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन एक व्यावसायिक नाटक करण्याचा विचार होता. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रथम परिपूर्ण व्हावे. रंगभूमीचा अभ्यास करावा, असे मत मांडले होते. त्यांनी ही गोष्ट अगदी प्रेमळपणे समजावून सांगितली. आपल्या बोलण्याने कोणाचेही मन दुखावू नये, याकडे त्या लक्ष देत होत्या. प्रकाश भागवत, चित्रपट संवादलेखक