आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या सिमेंटच्या जंगलात हरवली हिरवाई!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्रातील हिरव्या शहरात नागपूर ‘नंबर वन’ आहे. त्यानंतर सांगली, पुणे, ठाणे, नगर अशा क्रमाने ब-याच शहरांची यादी लांबत जाते. मात्र शहरात झाडांचे अगदीच अत्यल्प अर्थात 3.4 टक्के प्रमाण असलेले औरंगाबाद हिरव्या शहरांच्या यादीच्या बाहेर आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ने औरंगाबादची स्थिती जाणून घेतली आणि आपल्या शहराची अवस्था विदारक असल्याचे चित्र समोर आले. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या तुलनेत शहरात 33 टक्के झाडे असायला हवीत. निवासी जागेत शंभर चौरस फुटांवर एक झाड तर रस्त्यावर 10 फूट अंतरावर एक झाड असायला हवे, असा नियम खुद्द महापालिकेने केला आहे. हा नियम फायलीतील कागदाच्या घडीत बंदिस्त आहे. पालिका प्रत्येक कुटुंबाकडून 1 टक्का वृक्षकर घेते. ते पैसे जातात कुठे ? पालिकेने पुढाकार घेऊन नियमाची अंमलबजावणी केली आणि बोडके डोंगर, उजाड उद्याने यात झाडे लावली तर औरंगाबाद हिरवेगार व्हायला वेळ लागणार नाही.


वड, पिंपळ, लिंब जगवायलाच हवेत
तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

पर्यावरण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. मुकादम पाटील, अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ दिलीप यार्दी यांच्याकडून दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने वेगवेगळ्या विषयांवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शहरातील प्रदूषण धोक्याच्या पातळीजवळ गेले असून त्या तुलनेत आजपर्यंत कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत, अशी खंतही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद शहर हे पूर्णपणे डोंगर-टेकड्यांनी वेढलेले आहे; परंतु या टेकड्या हिरव्यागार नव्हे, तर बहुतांश बोडक्याच आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शहर व शहरालगत दहा टक्क्यांपेक्षाही कमी ‘ग्रीनरी’ आहे. गेली दहा वर्षे 20 ते 30 हजार झाडे दरवर्षी लावण्यात आली. यातील 90 टक्के झाडे जगलीच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच झाडे थोडी कमी लावली तरी चालतील; पण ती जास्तीत जास्त जगणे आवश्यक असल्याचा सूर व्यक्त होत आहे. त्यातही अधिकाधिक प्राणवायू देणारी, हवा-पाणी-जमिनीतील घातक द्रव्य-प्रदूषण शोषून घेणारी असल्यास अधिक उपयुक्त ठरू शकतात. त्यादृष्टीने तुळशीपासून ते वड, पिंपळ, कडूलिंब, अशोका, सप्तपर्णी, बहावा, पलाश, जंगल बदाम, पिवळा कण्हेर अशी पारंपरिक वृक्षवल्ली जगल्याशिवाय औरंगाबादकरांना तरणोपाय नाही, असा इशारा अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.


सर्व बाजूंनी विचार व्हावा
‘क्रिटिकली पोल्युटेड’ योजनांना अडसर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून ‘आयआयटी’ने (दिल्ली) गेल्या वर्षी शहरात सर्वेक्षण केले. यात हवा, पाणी, ध्वनी अशा सगळ्याच बाबतीत मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण असल्याचा निष्कर्ष निघाला. आवश्यक असूनही शहरात ‘सायलेन्स झोन’ नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच ‘आयआयटी’ने औरंगाबादला ‘रेड झोन’मध्ये टाकले आहे. प्रदूषणाची पातळी खाली येईपर्यंत ख-या अर्थाने शहराचा विकास होऊ शकत नाही. अनेक महत्त्वपूर्ण योजनांना अडसर होऊ शकतो.


2 महिने वृक्षारोपण, 12 महिने वृक्षतोड
शहरात पावसाळ्याचे केवळ दोन महिने वृक्षारोपण होते; परंतु 12 महिने वृक्षतोड सुरू असते. वृक्षारोपण कार्यक्रमात फोटो काढण्यापुरतीच झाडे लावली जातात, नंतर त्यातील किती जगली, याकडे कोणीही लक्ष देत नाही. 2009 मध्ये दिलीप यार्दी यांच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाविषयी एक सर्व्हे केला. त्यात असे लक्षात आले की, वृक्षारोपण केलेली 90 टक्के झाडे जगत नाहीत. म्हणजे वृक्षारोपण कागदावरच राहते. त्यामुळे झाडे जगवण्यासाठी दंड आकारणे, नियमांची सक्ती करणे अनिवार्य आहे.


शहर, टेकड्या बोडक्याच
शहरातील हिमायतबाग, सिद्धार्थ बाग, विद्यापीठ परिसर अशा काही भागांमध्ये वृक्षवल्ली कमी झाली असली तरी काही प्रमाणात दिसते. मात्र, चिकलठाण्यापासून दौलताबाद टी पॉइंटपर्यंत आणि जळगाव टी पॉइंटपासून हर्सूलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिशय कमी झाडे आहेत. शहराच्या आजूबाजूच्या गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी, सातारा परिसरातील टेकडी अशा सगळ्याच टेकड्या बोडक्या आहेत. वर्षानुवर्षे सरकारी यंत्रणेमार्फत वृक्षारोपण काही प्रमाणात होते; परंतु त्यातील किती झाडे जगली, याची जबाबदारी कोणीच घेत नाही.


‘सीएसई’ने केला प्रदूषण शोषून घेणा-या झाडांचा अभ्यास
‘सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन’ने (सीएसई) प्रदूषित हवा, पाणी, घातक द्रव्ये शोषून घेणा-या सर्वस्तरीय छोट्या-मोठ्या झाडांचा अभ्यास केला. त्यानुसार 10 टक्क्यांपर्यंत शोषण्याची क्षमता असलेली झाडे अशी : क्रेप, जास्वंद, रातराणी, क्राऊन डेसी, मोरपंखी, सर्पगंधा, अश्वगंधा, अ‍ॅकॅन्थस, हरिसिंगर, सिल्व्हर फायर, बाभूळ, कुर्ची, ग्लोरी बॉवर, वड, करीलिव्हज, रानभेंडी. 11 ते 20 टक्के क्षमता असलेली झाडे : लिली, सूर्यफूल, गेंडा, मनी प्लँट, बांबू, क्रेप मिर्टिल, गुलाबी कण्हेर, क्रोटन, पिवळा कण्हेर, दुधी, गुलाब, बेशरम, चांदणी, कॉपर लीफ, टेंपल ट्री, सुभाबूळ, चिल्गोजा, इंडियन रबर, शुगर अ‍ॅपल, आंबा, वुली मॉर्निंग ग्लोरी, पिंपळ, विलायती किक्कर, पेरू, पल्म्स, जांभूळ, सागवान, लिंबू, मल्बरी, चिकू, कदंब, साल, शिशम, गुलमोहर, शिरीस, जॅकफ्रूट, टॉर्च ट्री, कंचनार, ड्रम स्टिक, बेल. 21 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमता असलेली झाडे : एलिफंट इअर, कॉक्सकोम्ब, बोगनवेल, अमल्तस, पाइन, सामल, पळस, सतानी, कडूलिंब, अशोका, बॉटल ग्रश, जंगल बदाम, अर्जुन, मेलिया, खजूर, पिल्कम, पापाडी, ब्लूगम, महुआ.


‘नासा’ने सांगितलेली हवा शुद्ध करणारी 10 सर्वोत्तम झाडे
‘नासा’ या जगविख्यात अमेरिकी संस्थेने पर्यावरणाच्या दृष्टीने अलीकडेच अभ्यास केला असून 10 सर्वोत्तम झाडे घर तसेच कार्यालय परिसरात लावावीत, असे सुचवले आहे. यामध्ये पाम, लेडी पाम, बांबू पाम, डेट पाम, खजूर, ड्रासोना, इंग्लिश आयव्ही, बोस्टन फर्न, फायकस अली, फायकस रोबुस्टा आदी वृक्षवल्लींचा समावेश आहे. ही वेगवेगळी प्रकारची झाडे हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे.


वड, लिंब, पिंपळ उपयुक्त

ज्या वृक्षांची पाने मोठी त्यांची प्राणवायू सोडण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळेच काही कालावधी वगळता वर्षभर पाने हिरवी राहणारे कडूलिंब, वड, पिंपळ असे वृक्ष प्राणवायू देण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम समजले जातात. तसेच दुधाळ झाडे (लॅटेक्स) म्हणजेच पाने, फुले तोडल्यानंतर दुधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडणारे उंबरासारखे वृक्षही प्रदूषण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.


रसायने शोषण्यासाठी जलपर्णी सर्वोत्तम
औद्योगिक वसाहतीमध्ये तसेच कारखान्याच्या आसपास जिथून रसायनयुक्त पाणी, घातक द्रव्ये बाहेर पडतात, अशा ठिकाणी जलपर्णी (वॉटर हायसिंथ) सर्वोत्तम काम करते. जलपर्णी घातक द्रव्ये शोषून घेते. त्याचप्रमाणे त्यांच्या पानांपासून प्रथिने तयार होऊ शकतात आणि त्याचा प्राण्यांसाठी, पोल्ट्रीसाठी वापर होऊ शकतो. मुळांपासून खतही तयार होऊ शकते. या जलपर्णीचा औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

पिढ्यान्पिढ्या मायेची ऊब देणारी शहर परिसरातील झाडे!
शहरातील काही जागा, ठिकाणे अवघ्या शहराच्या ओळखीची असतात. मध्यवर्ती बाजारपेठेत म्हणजे कासारीबाजार आणि राजाबाजार येथे असलेली चिंचेची झाडे आणि मोर्सल्ली म्हणजेच बकुळाचे झाड हे त्यातीलच एक. सुमारे 250 वर्षांपूर्वी निजाम राजवटीत पेरण्यात आलेली ही झाडे. या झाडांची बीजे आज लॅॅँडमार्क झाली आहेत. कासारी बाजार येथे असलेले चिंचेचे झाड गेल्या चार पिढ्यांपासून इतिहासाची साक्ष देत उभे आहे. अशा प्रकारची झाडे आणि अस्थाना शहरात 5 ठिकाणी होती. रिगल चित्रपटगृह परिसरात, देवडा कॉम्प्ल्ोक्समध्ये, महावीर चौकात आणि केळीबाजारात यापैकी कासारी बाजार येथील झाड शेकडो वर्षांतील बदलांची साक्ष म्हणून आजही उभे आहे. औरंगाबादेतील प्रत्येक जण एकदा तरी चिंचेच्या झाडापाशी गेलेला आहेच. पर्यावरणात महत्त्वाचा वाटा उचलण्यात अशा झाडांचा सहभाग आहे. कधी रस्ता रुंदीकरण, तर कधी इमारतींचे बांधकाम. कारण कोणतेही असो, जुन्या झाडांची कत्तल होते. औरंगाबादेत अशा कत्तली झाल्याच. त्यातूनही शहराच्या मध्यवस्तीत काही झाडे जगली-वाचली. काही ठिकाणी पर्यावरणप्रेमींच्या आग्रहामुळे ती वाचवली गेली. किमान चार पिढ्यांची साक्षीदार होत ती आजही डोळ्यांना विसावा देतात. शहराच्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या अशाच काही महत्त्वपूर्ण झाडांची ही ओळख.

राजाबाजारातील बकुळीचे झाड
दरवळणारा सुगंध आणि कडक उन्हाळ्यातही गारवा देणारे संस्थान गणपतीसमोरील मशिदीच्या बाजूला असलेल्या बकुळाच्या झाडाला 250 वर्षांचा इतिहास आहे. मोर्सल्ली हे या झाडाचे उर्दू नाव आहे. निजाम काळापासून हे झाड अस्तित्वात आहे. पांढ-या रंगांच्या लहान फुलांमुळे या रस्त्याने जाणा-या येणा-या प्रत्येकाचे लक्ष हे झाड वेधते.
1] रेल्वेस्थानक परिसरात अनेक वर्षे जुनी काही झाडे आहेत. त्यापैकी एका झाडावर अनेक वर्षांपूर्वीच केबिन बनवण्यात आले होते. या ठिकाणी सध्या काही काम चालत नसले तरी आठवण म्हणून ते जपले आहे.
2] रेल्वेस्थानक परिसरातच हे लिंबाचे झाडही अनेक वर्षे जुने आहे. अनेकदा झालेल्या विकासावेळीही ते जपले आहे.
3] डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसर ख-या अर्थाने पर्यावरण जोपासणारा ठरतो. परिसरातील रस्त्यावरची दुतर्फा झाडे नेहमीच सुखद अनुभव देतात.
4] शहरातील सर्वच भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या सुपारी हनुमान मंदिराजवळील हे पिंपळाचे झाड आता या मंदिराची ओळखच बनले आहे.
5] विद्यापीठ परिसरात असणा-या या वडाच्या झाडाचा विस्तार अगदी शेजारच्या विहिरीत खोलवर झालेला आहे.


पर्यावरण संवर्धनाचा अनोखा ‘प्रयास’
तरुणांनी घेतला वसा
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण झपाट्याने विकासाच्या दिशेने जात असताना ‘प्रयास’ ग्रुपने मात्र सामाजिक जाणिवेच्या भावनेतून गोगाबाबा टेकडीच्या स्वच्छतेसह अनेक पर्यावरण पोषक उपक्रम हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हे उपक्रम नेटाने तडीसही नेले आहेत.
चार वर्षांपूर्वी देवगिरी महाविद्यालयातील एनसीसीचा विद्यार्थी रवी चौधरी व त्याचे तीन मित्र गोगाबाबा टेकडीवर ट्रेकिंगसाठी गेले होते. तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी परिसरातील कच-याची विल्हेवाट लावली. तेव्हापासून पर्यावरण संरक्षणाविषयी जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. चार मित्रांच्या गु्रप हळूहळू वाढत गेला व सर्वांनी मिळून ही टेकडी दत्तक घेतली. दर रविवारी जाऊन टेकडीची साफसफाईचे काम त्यांनी अविरत सुरू ठेवले. संपूर्ण टेकडी झाडांनी बहरून टाकण्याचे उद्दिष्टही त्यांनी हाती घेतले आहे. त्या दृष्टीने टेकडीवर वृक्षारोपण सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जांभूळ, लिंब, वड अशा झाडांची लागवड करण्यात आली. पाहता पाहता 500 च्या वर झाडांची लागवड झाली. सध्या ग्रुपमध्ये 100 सदस्य काम करत आहेत. प्रत्येक रविवारी हा ग्रुप गोगाबाबा टेकडीवर जाऊन श्रमदान करतो.


टाकाऊचा वापर पर्यावरणासाठी
प्लास्टिक हे पर्यावरणासाठी सर्वाधिक घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, याचाच वापर विद्यार्थ्यांनी पर्यावरणासाठी पूरक म्हणून करून घेतला. पर्यटकांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या तसेच वेफर्स किंवा खाद्यपदार्थांची पाकिटे विद्यार्थ्यांनी गोळा केली. प्लास्टिकच्या बाटल्या अर्ध्यातून कापून त्यामध्ये तुळशी तसेच निंबाच्या रोपांची लागवड केली. टेकडीवर वृक्षारोपण तर केलेच, शिवाय शहरातील नागरिकांना ही रोपे मोफत वाटून त्यांनाही झाडे लावण्यास उद्युक्त केले. प्रयास ग्रुपची स्वतंत्र नर्सरीही यामुळे निर्माण झाली आहे.


वाढदिवसही अनोखा
या ग्रुपचे सदस्य वाढदिवस निराळ्या पद्धतीने साजरे करतात. वाढदिवशी खाणे-पिणे किंवा चित्रपट पाहून पैसे खर्चण्यापेक्षा झाडांच्या लागवडीसाठी आवश्यक असणा-या साहित्यावर पैसे खर्च करण्यात येतात.


फेसबुकमधून जोडले सदस्य
प्रयास ग्रुपने फेसबुकवर आपले स्वतंत्र पेज निर्माण केले. त्यावर आपल्या प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती, फोटो ते अपलोड करत असतात. त्यामुळे अनेक लोक या ना त्या माध्यमातून ग्रुपच्या मदतीला आले आहेत. संदीप नागोरी यांनी कचरापेट्या घेऊन दिल्या, तर प्रकाश कुलकर्णी बीजारोपण करून देतात. माधव काळे यांनी बंधा-यांसाठी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले.


पाण्याचे बंधारेही बांधले
टेकडीवर पाणी जिरवण्याच्या उद्देशाने आठ ते दहा बंधा-यांचे कामही मुला-मुलींनी केले आहे. टेकडी परिसरातील दगडगोटे गोळा करून बंधा-यांची शास्त्रशुद्ध निर्मिती सर्वांनी श्रमदानातून केली. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी डोंगराच्या पोटातच साठवले जाईल. याचा फायदा डोंगरावरील झाडांना होणार आहे.


शहरात 33 टक्के वृक्ष असावेत
लागवड बंधनकारक, मात्र संख्येबाबत माहिती नाही
शहराचे भौगोलिक क्षेत्र 145 चौरस किलोमीटर आहे. पर्यावरण समृद्धीसाठी त्यापैकी 33 टक्के क्षेत्रावर वृक्ष लागवड झालेली असणे गरजेचे आहे. मात्र शहरात वृक्ष किती आहेत, पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांची संख्या पुरेशी आहे का? याबाबत मनपा प्रशासनाकडे माहितीच नाही.


गेल्या पंधरा वर्षांमध्ये शहर व परिसरात औद्योगिक वसाहती आल्याने झपाट्याने विकास झाला. सध्या शहरात 12 लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. वृक्षांची जागा सिमेंट काँक्रीटच्या इमारतींनी घेतली. त्यामुळे शहरातील वृक्षांची संख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळेच शहरात वृक्षांची पुरेशी संख्या असणे गरजेचे आहे. ती संख्या तपासण्याचे काम स्थानिक प्रशासनाचे आहे. मात्र, त्यांचे दुर्लक्ष होत आहे.


नियम कागदावर
इमारत बांधकाम करताना 300 चौरस मीटरचे बांधकाम करायचे असेल तर तीन वृक्ष लावण्याचा नियम आहे. त्यासाठी मनपा 25 टक्के अनामत रक्कमही घेते. नंतर ही रक्कम परत मिळते व बांधकाम (भोगवटा) प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, खरंच वृक्ष लागवड केली जाते? याची शहानिशा मात्र केली जात नाही किंवा त्याचे रेकॉर्डही नसते. विशेष म्हणजे लोकंही ही अनामत रक्कम परत घेण्याचे टाळतात.


झाडे लावायची कुठे?
जुन्या शहरात जवळपास सर्व जागा सिमेंटच्या इमारतींनी जागा व्यापून टाकली आहे. झाडे लावायला जागाच शिल्लक नाही. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घ्यावा असे पर्यावरणतज्ज्ञ दिलीप यार्दी सांगतात.


ग्रीन सिटी करण्याचा उद्देश
नागपूर, चंदिगड, बंगळुरू, पुणे या शहरांप्रमाणेच औरंगाबाद ही ग्रीन सिटी व्हावी, असा उद्देश आहे. त्यासाठी लोकसहभागही गरजेचा आहे. यंदा पाऊस चांगला झाला तर शहरात सुमारे दीड लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. - विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा


झाडे लावल्याचे फायदे
कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होऊन भरपूर ऑक्सिजन मिळावे, पर्यावरण शुद्धीकरण, तापमान संतुलित ठेवण्यासाठी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी, पावसासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठीही भरपूर वृक्ष असणे गरजेचे आहे.
वनसंवर्धन, संरक्षणाचा जोपासला अविरत वसा


निसर्गाचे ‘मित्र’मंडळ
झाडांच्या बेसुमार कत्तलीमुळे डोंगर उजाड होत आहेत. या डोंगरांवर पुन्हा हिरवळ पसरावी, वनसंपदेचे संवर्धन व संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने शहरातील निसर्ग मित्रमंडळाने गेल्या 25 वर्षांपासून बीजसंकलन व बीजारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे.


जून महिन्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर छंद म्हणून जिल्ह्यातील विविध डोंगरमाथ्यांवर ट्रेकिंगला जाणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दररोजचे व्यस्त जीवन सोडून निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवण्यासाठी अनेकजण ट्रेकिंगला प्राधान्य देतात. पावसाळ्यातील हिरवाईने नटलेला परिसर डोळ्यात सामावून घेताना त्याचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत या भावनेतून मंडळाने या उपक्रमाला सुरुवात केली. दरवर्षी त्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. 5 जूनला पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे शहरातील पैठण गेट, व्यंकटेश कॉलनी, विश्वभारती कॉलनी, सिडको एन-3, श्रीपाद मेडिकल हडको आदी भागांत बीज संकलन केले जाते. अनेक वेळा फळे खाल्ल्यानंतर त्याच्या बिया कच-यात टाकल्या जातात. मंडळाचे सदस्य वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाहन करून त्या बिया संकलित करतात. बीज संकलन झाल्यानंतर जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत दर रविवारी किंवा पंधरा दिवसातून एकदा निसर्ग मित्रमंडळातर्फे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येते. ट्रेकिंगमध्ये सहभागी होणा-या सर्व सदस्यांना या बिया देण्यात येतात. त्यानंतर त्यांचे विविध डोंगरमाथ्यावर रोपण केले जाते. परंतु, दरवर्षी याचे ऑडिट होत नसल्याने मागील 25 वर्षांत संस्थेच्या सदस्यांनी बीजारोपण केल्यानंतर त्यातील किती झाडांचे संवर्धन झाले याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याचे संस्थेचे सचिव किशोर गठडी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. जून ते ऑक्टोबरदरम्यान दर आठवड्याला 50 ते 200 सदस्य ट्रेकिंगला जातात. 1988 पासून अखंडितपणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

उजाड डोंगरांवर वनराई फुलवणार
जिल्ह्यातील वनसंपदेचे संवर्धन व्हावे म्हणून हा उपक्रम गेल्या 25 वर्षांपासून राबवत आहोत. या उपक्रमात सहभागी होणा-यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. उजाड डोंगरांवर वनराई निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी सांगितले.


या डोंगरमाथ्यांवर बीजारोपण
दरवर्षी जिल्ह्यातील गोगाबाबा ते दौलताबाद किल्ला, मयूरबन (दौलताबाद घाट) ते शूलिभंजन, म्हैसमाळ ते गणपती लेणी (वेरूळ), विटखेडा चेकपोस्ट ते गौतम ऋषी मंदिर, घाटनांद्रा ते हळदा रुद्रेश्वर, मुर्डेश्वर ते वेताळवाडीचा किल्ला, सारोळा परिसर आणि सातारा तांडा या भागात ट्रेकिंगदरम्यान तेथील डोंगरमाथ्यांवर बीजारोपण केले जाते.