आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Bus Station To Get CCTV Security In Aurangabad

मध्यवर्ती बसस्थानकाला मिळाली सीसीटीव्हीची सुरक्षा, रोटरी क्लब ऑफ कॅन्टोनमेंटकडून दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संच भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाला आता सीसीटीव्हीची सुरक्षा मिळाली आहे. रोटरी क्लब ऑफ कॅन्टोनमेंटने यासाठी पुढाकार घेतला असून दहा सीसीटीव्ही कॅमे-यांचा संच त्यांच्याकडून भेट देण्यात आला. सोमवारपासून हा संच कार्यान्वित करण्यात आला असून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक आर. एन. पाटील, क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोवर्धन कोळेकर, रोटरी क्लबचे प्रमोद सावंत, कैसर खान, दयाल मेवानी, केनथ सँटोज यांची प्रमुख उपस्थिती होती.

चोरी, पाकीटमारी आणि गैरकृत्य यांना आळा बसावा म्हणून बसस्थानकावर सीसीटीव्ही असणे आवश्यक होते. यासाठी रोटरॅक्ट क्लबने पुढाकार घ्यावा, अशी विनंती उपायुक्त वसंत परदेशी यांनी केली होती. त्याची दखल घेत हा उपक्रम राबवण्यात आला.

बसस्थानकावरील चौकीत या कॅमे-यांची सर्व्हर रूम तयार करण्यात आली आहे. दिलेल्या सीसीटीव्हीची योग्य निगा राखावी, ते कायम सुरू राहावे यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वेळी दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जेम्स अंबिलढगे, ललित माळी, रोटेरियन पापाचंद, सोमनाथ लहाने, एम. एस पाटील, संदीप सेठी, सुदाम गायकवाड, अंबर अमोलिक, मायकल जगताप यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले.

‘दिव्य मराठी’ने घेतला पुढाकार
शहरातीलअधिकाधिक सामाजिक स्थळे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली यावीत यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लागावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले. एकूण १५०० धार्मिक स्थळांपैकी विविध धर्मांच्या २०० प्रार्थनास्थळांमध्ये सीसीटीव्ही आहेत. पोलिसांचा ताण कमी व्हावा आणि समाजातील वाईट वृत्तींना आळा घालण्यासाठी हा उपक्रम ‘दिव्य मराठी’कडून सुरू करण्यात आला आहे. आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या प्रार्थनास्थळांना सीसीटीव्ही संच देण्यासाठी प्रायोजकांनी पुढाकार घेतला. अशा प्रकराच्या सामाजिक उपक्रमासाठी सीसीटीव्ही विक्रेत्यांनीदेखील ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर आपली सेवा दिली.