आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Drought Prevention Commissioners Promise

केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्तांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण/ ढोरकीन - तालुक्यात मोठा गाजावाजा करत मंगळवारी केंद्रीय दुष्काळ निवारण अतिरिक्त आयुक्त राघवेंद्र सिंग यांच्यासह पथक दाखल झाले होते. या पथकाने ढोरकीन, कारकीन, ७४ जळगाव परिसरातील पिकांची पाहणी केली. या वेळी विविध शेतकऱ्यांनी या पथकासमोर आपल्या समस्या मांडत शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी केली. या वेळी राघवेंद्र सिंग यांनी "ठीक है, मैं आया हूं ना' चे आश्वासन देऊन केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक पाचोडच्या दिशेने रवाना झाले.
या वेळी पाचोडकडे जाताना रहाटगावजवळ संतप्त शेतकऱ्यांनी पथकाचा रस्ता अडवत त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तेव्हा पथकाने चर्चा करून भरपाई देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. त्यानंतर ते पुढे पाचोडला रवाना झाले. दरम्यान, दौरा सुरू असताना रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पथकाला छत्र्या घेऊन पाहणी पूर्ण करावी लागली. अशा स्थितीमुळे दुष्काळ अन् पाहणी दौऱ्यादरम्यान पावसामुळे विरोधाभासाचे चित्र निर्माण झाले होते.
मराठवाड्याचा दौरा मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झाला. पथकाने ढोरकीन, कारकीन भागात कपाशी, सोयाबीनची पाहणी केली. पथकात आयुक्त तथा प्रमुख राघवेंद्र सिंग यांच्यासह राष्ट्रीय फलोत्पादक महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. के. सिंग, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, आमदार संदिपान भुमरे आदींचा समावेश होता.
३० ते ४० वाहनांच्या ताफ्यात दौऱ्याला सुरुवात झाली. दौऱ्यातील अधिकाऱ्यांना मराठी येत नसल्याने हिंदीतून संवाद साधला. ढोरकीन येथील शेतकरी प्रकाश भडके यांनी "सोयाबीनचे पीक पूर्ण गेले आहे. लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. आम्ही जगायचे कसे?' असा सवाल अधिकाऱ्यांना केला. "गेल्या चार वर्षांत हीच परिस्थिती आहे. मात्र ना शासनाची कोणती मदत ना कोणाचा सहारा' अशी अार्त हाक शेतकऱ्यांनी दिली. यावर आम्ही वरिष्ठ स्तरावर तुमच्या अडचणी मांडू व अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे अाश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.अधिकाऱ्यांनी कारकीन येथील कपाशीच्या पिकाची पाहणी केली. त्या वेळी कपाशीचे पीक या घडीला गुडघ्याच्या वर येते. मात्र, आजघडीला हे पीक जमिनीला लागून आहे, असेही शेतकऱ्यांनी पथकाच्या निर्दशनास आणून दिले.
रहाटगाव परिसरात पथकाला अडवले
कारकीन येथे पाहणी करून पथक पाचोडच्या दिशेने सुमारे २० गाड्यांच्या ताफ्यासह निघाले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना रहाटगावजवळ अडवत जोरदार घोषणाबाजी केली. मदतीसाठी पथकाची काय गरज, सर्व सुविधा असताना पाहणीचे नाटक कशासाठी, असा सवाल शेतकऱ्यांनी केला होता. या वेळी आक्रमक होत असताना पथकातील आयुक्तांबरोबर असणारे राष्ट्रीय फलोत्पादन महामंडळाचे ए .के. सिंग हे आपल्या वाहनातून खाली उतरलेदेखील नाहीत. पंधरा मिनिटे घोषणाबाजी करत त्वरित मदत देण्याची मागणी केली.