औरंगाबाद- मराठमोळ्या लावणीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात रंगत आणली. बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी, ठसका आणि व्यासपीठावर चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजनाची सीमाच गाठली. मुलींसह अनेक मुलांनीदेखील लावण्या सादर केल्या. त्यामुळे ढोलकीच्या तालावर अन् घुंगारांच्या बोलावर तरुणाई थिरकल्याचे पाहायला मिळाले. दिवसभरात सादर झालेल्या एकापेक्षा एक सरस लावण्यांवर युवक-युवतींनी ठेका धरून नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. या शिवाय लोकनाट्य, वादविवाद स्पर्धा, शास्त्रीय तालवाद्य, एकांिकका स्पर्धा झाल्या.
पारंपरिक लावणीचे बदलले रूप
लावणीलाचांगले व्यासपीठ मिळावे म्हणून हा कलाप्रकार पुन्हा युवक महोत्सवात सादर केला. मात्र ढोलकी, घुंगरू, सहकलाकार असे मिळून सादर होणारी पारंपरिक लावणी, जी नेहमीच लोकप्रिय असायची तो कलाप्रकार आता िदसून येत नाही. त्यामुळेच स्पर्धेत सादर होणारी ही लावणी आता पारंपरिक लावणी राहिलेली नाही. या स्पर्धेत चित्रपटातील लावणी सादर करण्यात आली. यामुळे लावणीचे अस्सल पारंपरिक रूप हरपले असून लावणीचा बाजार आणि खेळ झाल्याची खंत परीक्षकांनी व्यक्त केली.
मुलांनीसादर केलेल्या लावणीचे आकर्षण
लावणीफक्त मुलीच सादर करतात असे नाही, तर महोत्सवात मुलांनीही बाजी मारली. चेहऱ्यावरील हावभाव आणि मुलीसारख्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. वेशभूषा, केशभूषा करून मुलांनीही एकापेक्षा एक सरस अशी लावणी सादर करत सर्वांनाच आकर्षित केले.
प्रथमचबैठकीची लावणी
आजपर्यंतलावणीचे सांघिक अथवा जुगलबंदीचे प्रकार स्पर्धेत झाले आहेत, परंतु यंदा प्रथमच बैठकीची लावणी केएसके महाविद्यालय, बीड येथील विद्यार्थिनीने सादर केली. "नको परकेपणा मला
आपुली म्हणा' स्वत:च गात एक वेगळाच माहोल स्पर्धेत निर्माण केला.महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखली जाणारी ठसकेबाज लावणी सादर होताच विद्यापीठ परिसर सोमवारी शिट्या अन् टाळ्यांच्या आवाजाने दणाणला. रेशमाच्या रेघांनी, नटले मी तुमच्यासाठी, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, लाल पैठणीचा रंग माझ्या चोळीचा यासारख्या अनेक लावण्यांसाठी तरुणाईने पगडी फेकत वन्समोअर करत जल्लोष केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीनदिवसीय केंद्रीय युवक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दुपारी दीड ते ४.३० पर्यंत लावणी कलाप्रकार सादर करण्यात आला. यात १८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. गेल्या पाच वर्षांपासून अप्रिय घटनांमुळे बंद करण्यात आलेली लावणी कला यंदाच्या युवक महोत्सवात पुन्हा सादर करण्यात आली. महाराष्ट्राचा पारंपरिक कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. घुुंगरांचा आवाज आणि ठसकेबाज नृत्य सादर होताच तरुणाईसह प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांनाही शिट्या वाजवण्याचा मोह अावरला नाही. सौंदर्य आणि हावभावातून नखरेल अदांवर सादर होणारा प्रकार सर्वांनाच आकर्षित करत होता. लावणीच्या वेळेआधीच व्यासपीठाजवळ तरुणाईने गर्दी केली होती.
औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाच्या पूनम तायडे जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाच्या रूपाली म्हस्के यांनी “खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’ ही लावणी सादर केली. या लावणीवर अनेकांनी शिट्ट्या वाजवत बसल्या जागेवरच ठेका धरला. परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या राजू गिरी, पवन काळे, कमलाकर चव्हाण या विद्यार्थ्यांनी लाल पैठणी रंग माझ्या चोळीचा, तुम्ही यावं सजणा रंगहोळीला तसेच जालन्याच्या बारवाले महाविद्यालयाच्या मेघा दहिवालने रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी, देवगाव रंगारीच्या आसाराम भांडवलदार महाविद्यालयाच्या काजल अजमेरा घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या श्रीकिसन म्हस्के याने मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, मग इश्काचा गुलकंद खिलवा ही लावणी सादर केली. या लावणीला युवकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. विवेकांनद महाविद्यालयाच्या ज्योती पाटील, रिंकू चव्हाण, वृषाली राऊत, मधुरा कांबळे, शिल्पा धनवे या संघाने रंग गोरा गोरा पान जसं केवड्याचा रान, तर बीडच्या केएसके महाविद्यालयाच्या रसिका बेदरे हिने घरच्यावाणी मला वागवा... धुंदीत ही रात्र जागवा ही शृंगारांनी ओतप्रोत असलेली लावणी सादर केली. गेवराईच्या र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या दीपक गिरीने आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला ही लावणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
याशिवाय उस्मानाबादच्या महाजन महाविद्यालयाच्या योगेश्वरी पाटील, विभावरी पाटील, सूरज भालेकर, विजय जमाले या संघाने ‘गाडी आणावी बुरख्याची... बुरख्याची दोन चाके’ तर नळदुर्ग येथील कला विज्ञान महाविद्यालयाच्या दीपाली कदम हिने ‘नाकी डोळी छान रंग माझा गोरा गोरा पान’, शिवाजीनगर (औ.बाद) येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या पूजा पाटीलने ‘बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची’ ही शृंगाराने नटलेली लावणी सादर केली. तसेच विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची अपेक्षा निर्मळ हिने ‘पारवा घुमतोय कसा’ ही लावणी सादर करून सर्वांना लावणीवर ठेका धरायला लावला. मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या श्यामला गायकवाड हिने ‘ढोलकीच्या तालावर अन् घुंगराच्या बोलावर... मी नाचते, डोलते इश्काच्या दरबारात’ या लावणीने अक्षरश: मंच परिसरात काहूर माजवले. उपस्थित युवक-युवतींनी बेधुंद होऊन लावणीवर नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या नीता इप्पर हिने“िपकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ ही लावणी सादर केली. बीडच्या बलभीम महाविद्यालयाची प्रतीक्षा काळे हिने ‘मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका..’ तर सरस्वती भुवनच्या सोनाली राठोडने ‘नटले तुमच्यासाठी दिलबरा’ धावड्याच्या राजकुंवर महाविद्यालयाच्या प्रियंका झापर्डे मृणाल गायकवाड यांनी ‘मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा’ ही लावणी सादर केली. गेवराई तालुक्यातील गढीच्या कला विज्ञान महाविद्यालयाच्या अश्विनी जाधव हिने ‘आशुक माशुक नाशिकची नार’ लावणी सादर केली.
व्यावसायिककलावंत; विद्यापीठ प्रशासन अनभिज्ञकलाकारालाआवाज देण्यासाठी स्पर्धेच्या नियमाप्रमाणे ढोलकी, तबला, घुंगरू आणि गायक हवा असतो. परंतु विद्यार्थी स्पर्धेत विद्यार्थीच असायला हवा. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही महाविद्यालयांनी मात्र यश मिळवण्यासाठी खोटी माहिती देत अन् शिक्षक आहे, असे सांगत चक्क व्यावसायिक कलावंत स्पर्धेत गायनासाठी आणले. हानियमबाह्य प्रकार असला तरी विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षकांच्या ते लक्षात आले नाही, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, लावणीतील अदाकारी.. तसेच महोत्सवातील भन्नाट क्षण....