आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'केमिस्ट्री'ची विक्रमी "सीईटी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील एमएस्सी प्रथम वर्षाच्या १४७ जागांसाठी २२ जून रोजी झालेल्या सीईटीला ८५० विद्यार्थ्यांची विक्रमी हजेरी होती. तसेच ‘बीव्होक’, वाणिज्यसह तिन्ही विभागांतील विविध अभ्यासक्रमांच्या एकत्रित ३१७ जागांसाठी १०७९ विद्यार्थ्यांनी सीईटीत भाग घेतला. तथापि, बी.ए. आणि बीएस्सीचे निकाल जाहीर झाल्यामुळे पदव्युत्तर पदवीसाठी पुढे होऊ घातलेल्या सीईटीच्या शेड्यूलवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.
सीबीसीएस म्हणजेच चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम लागू झाल्यामुळे प्रत्येक विभागाने सीईटी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, नेट-जेआरएफमध्ये प्रत्येक वर्षी उत्तम कामगिरी करणारा रसायनशास्त्र विभाग उस्मानाबादेतील अभ्यासक्रमांसाठीही दरवर्षी सीईटी घेत असतो. यावर्षी या दोन्ही ठिकाणांच्या एम.एस्सी.च्या प्रथम वर्ष प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ९२० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. यापैकी विद्यापीठात ६०४, तर उस्मानाबाद केंद्रावर २४६ अशा एकूण ८५० विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग घेतला.
‘सीईटी’चा निकाल २९ जून रोजी घोषित केला जाणार असल्याचे विभागप्रमुख डॉ. अंजली राजभोज यांनी याप्रसंगी कळवले आहे. डॉ. बापू शिंगटे यांनी येथील केंद्रावर, तर उस्मानाबाद कॅम्पससाठी डॉ. के. पी. हांवळ डॉ. भास्कर साठे यशस्वीपणे परीक्षेसाठी काम पाहिले. सीईटीसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था रसायनशास्त्र, जीव रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनतंत्रशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, समाजकार्य महाविद्यालयांसह केंद्रांवर करण्यात आली होती. विद्यापीठ परिसरातील पदव्युत्तर विभागात एम.एस्सी.च्या ७० जागा असून ‘अॅनालिटिकल केमिस्ट्री’च्या २४ जागा आहेत, तर उस्मानाबाद एम.एस्सी.च्या ५५ जागा असून या ठिकाणी अॅनॉलिटिकल ड्रग केमिस्ट्री हे विषय आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या बॅचलर ऑफ व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या शंभर जागांसाठी १४७ जणांनी सीईटी दिली. ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन असा अभ्यासक्रम असून प्रत्येकी ५० जागा आहेत. वाणिज्यच्या प्रथम वर्षासाठी ७० जागा असून त्यासाठी ८४ विद्यार्थ्यांनी विभागातच सीईटी दिली. विभागप्रमुख डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सीईटीचे नियोजन केले होते. भौतिकशास्त्र विभागाची ४८ जागांसाठी १८ जून सीईटी घेण्यात आली असून त्यासाठी २०६ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे.
निकाल रखडल्याने परिणाम
पदवी परीक्षांच्या निकालापैकी फक्त बी.कॉम.चा निकाल जाहीर झाला असून अद्याप बी. ए. आणि बी.एस्सी.चा निकाल जाहीर झालेला नसल्याने त्याचा थेट सीईटीच्या शेड्यूलवर परिणाम झाला आहे. आज होणारी अर्थशास्त्र विभागाची सीईटीही त्यामुळेच रद्द करण्यात आली. बी.ए. आणि बीएस्सीचे सात दिवस निकाल लांबणार असल्यामुळे उर्वरित सीईटीवरही परिणाम होईल, असे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...