आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chairman Selection Issue In Aurangabad Corporation

पक्ष गटनेत्याबरोबरच सभापतिपदासाठी घडामोडेंच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेतील भाजपच्या पाच वर्षांसाठी गटनेते पदाबरोबरच एक वर्षासाठी स्थायी समितीचे सभापतिपद मिळवण्यासाठी शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी जोरदार हालचाली चालवल्या आहेत. गेली पाच वर्षे ते स्वत: सभागृहात नव्हते. त्यामुळे त्याची कसर आता भरून काढण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली असल्याचे समजते. यासाठी शहराध्यक्षपद सोडण्याची त्यांची तयारी असल्याचे सांगण्यात येते.
महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होताच तिसऱ्याच दिवशी शिवसेनेने सभागृहनेतेपदी नवनियुक्त नगरसेवकाची नियुक्ती केली. त्याचबरोबर आता भाजपचा गटनेताही निवडला जाणार आहे. यासाठी घडामोडे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे फील्डिंग लावली आहे. गटनेतेपद हे पुढील आदेशापर्यंत असले तरी गत पाच वर्षे संजय केणेकर हेच या पदावर होते.
थोडक्यात एकदा हे पद आले तर पाच वर्षे पालिकेत पदाधिकारी म्हणून वावरता येईल. त्यामुळे या पदावर ज्येष्ठांचा दावा कायम आहे. मात्र, शहराध्यक्ष या नात्याने भाजपच्या विजयात आपलाही वाटा आहे, असे सांगत घडामोडे यांनी एक वर्षासाठी स्थायी समितीचे सभापतिपद मिळावे यासाठीही प्रयत्न चालवले आहेत. या पक्षात एक व्यक्ती एक पद असे धोरण असल्याने यासाठी ते शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्याही तयारीत आहे. काँग्रेसमधून आलेले प्रमोद राठोड यांना पक्षाने थेट उपमहापौर केल्याने पक्षात काहीशी नाराजी असतानाच मुख्य पदावर पक्षातील ज्येष्ठांनीच दावा केला आहे. त्यामुळे या पक्षात तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार की नाही, असाही प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

गटनेता कोण होणार आणि स्थायी समितीवर कोणाला पाठवायचे, याचा निर्णय श्रेष्ठी घेतील. कार्यकर्ता म्हणून नेत्यांकडे मागणी करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. भगवान घडामोडे, शहराध्यक्ष, भाजप.