आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवना परिसरात चंदन तस्करांचा धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - सिल्लोड तालुक्यातील शिवन्यासह आमसरी, वाघेरा नाटवीच्या जंगल परिसरात चंदन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. चंदनाची मोठीच्या मोठी झाडे रात्रीतून बुंध्यासगट तोडून नेण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील ही दुर्मिळ झाडे नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दिवसा झाड पाहणी व मध्यरात्री चोरी करण्यात येत असून याची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे संबंधित वन विभागाकडे करण्यात आली आहे.  

अजिंठा डोंगराचा परिसर तब्बल ८० किलोमीटर व्यासाने वेढलेला आहे. या जंगलात जंगली श्वापदांसह चंदन व सागाची झाडे आहेत. घनदाट जंगलातून दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड होत आहे. रविवारी(दि. १२)मध्यरात्री गट क्र. ५७८ मधून मल्हारी सपकाळ यांच्या शेतातील चंदनाचे मोठे झाड चोरट्यांनी तोडून नेले. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक  वर्षांपासून येथील चंदन झाडे चोरट्यांच्या नजरेत असावीत, असे शेतकरी सांगतात. सिल्लोड तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात  यापूर्वीच चंदनाची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली आहे. सध्या या भुरट्या चोरांनी शेतकरी वर्गाकडे मोर्चा वळवला आहे. मोठ्या कष्टाने वर्षानुवर्षे जतन केलेली ही झाडे रात्रीतून गायब होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. 

वाघेरा नाटवीसह या भागातील अनेक गावांत सध्या हे प्रकार दिसून येत आहेत. आधुनिक यंत्राद्वारे या झाडांचा काही भाग नेण्यात आला आहे. येथे आढळणारे चंदनाला हजारोंचे मोल मिळत असल्याने कमी कालावधीत मालामाल करणारा हा व्यवसाय चर्चेत आला आहे. अजिंठा पोलिस ठाण्यात सध्या याबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत.  पोलिस व वन खात्याने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
बातम्या आणखी आहेत...