आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी केंद्रातच सुखी, कोण म्हणतो प्रदेशाध्यक्ष होणार? दानवे यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मी केंद्रातच सुखी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र्यांना जाच आहे असे कोण म्हणतो? मंत्री व्हायचे अन् कामही नाही करायचे असे कसे होऊ शकते? मला केंद्रात मंत्रिपद दिले ते काम करण्यासाठी. केंद्रात मंत्री असताना मी राज्यात का परत यावे? मी केंद्रात सुखी आहे, माझे कामही चांगले आहे. राहिला विषय भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा, तर ते पद कोठे रिक्त आहे, असा सवाल केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) रावसाहेब दानवे यांनी केला. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे ते काही म्हणाले नाही.
राज्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सत्काराच्या निमित्ताने दानवे शहरात आले होते. सुभेदारी विश्रामगृहावर ते काही काळ थांबले. तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील सवाल केला. दानवे हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी केंद्रीय राज्यमंत्रिपद सोडून येणार असल्याची चर्चा होती. पंतप्रधान मोदी यांच्या कडक शिस्तीमुळे दिल्लीत त्यांचे मन रमत नाही, असेही बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना छेडले असते. मन मोकळे करता त्यांनी त्रोटक माहिती देताना मी दिल्लीतच सुखी आहे, असे सांगितले. प्रत्येक मंत्र्याला काम करावे लागते. मीही करतो. त्याला मोदी यांचा जाच कसे म्हणता येईल, असा सवाल करतानाच राज्याचे प्रदेशाध्यक्षपद कोठे रिक्त आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. शिवाय पक्षश्रेष्ठींनी आपल्याला विचारणा केली नसल्यामुळे हा मुद्दा माध्यमांनीच उचलून धरला असल्याची टीका केली. तुम्ही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही का, या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले नाही.

आयआयएमवर चुप्पी
आयआयएमनागपूर येथे होत असल्याची चर्चा समोर आल्यानंतर औरंगाबादकरांनी त्याविरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली. याप्रकरणी दानवे यांना छेडले असता त्यांनी अक्षरश: चुप्पी साधली. आयआयएम औरंगाबादेत होणार का, असा प्रश्न केला असता बिनसाखरेचा चहा त्यांनी पुढे केला. पत्रकारांनी दोन मिनिटे प्रतीक्षा केली; परंतु उत्तर आले नाही. पुढे बघू काय होते ते, असे म्हणत त्यांनी विषय संपवला.