औरंगाबाद - शहरातील रस्त्यांवरील विचित्र पॅचवर्कबाबत डीबी स्टारने चार भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली. मनपाप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामही उघड करण्यात आले. त्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पाहणी केला. या वेळी त्यांनी सा.बां.च्या रस्त्यांबाबत अधिकाºयांची कानउघाडणी केली; पण पॅचवर्कच्या नावाखाली मनपाने जागोजागी केलेल्या नक्षीकामाकडे ते वळले नाहीत. महापौरांच्या उपस्थितीत शहर अभियंत्यांना, ठेकेदाराला सूचना देण्याचे सांगून ते निघून गेले.
क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन, सतीश पेट्रोलपंप ते समर्थनगर चौक, प्रतापगडनगर ते संत एकनाथ रंगमंदिर, जकात नाका ते जळगाव रोड, या व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांची बुधवारी खासदार खैरे यांनी पाहणी केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणा-याऔरंगाबाद ते पैठण रोड, दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट, नगर नाका ते बाबा पेट्रोलपंप, हर्सूल टी पॉइंट ते जटवाडा, अजिंठा- एदलाबाद रोड, अजिंठा- बºहाणपूर रोड या काही ठरावीक अंतरावरील नूतनीकरणाच्या रखडलेल्या कामाविषयी चौकशी केली. पॅचवर्कच्या कामांकडे डीबी स्टारने लक्ष वेधले असता खैरे यांनी जालना रोडकडे मोर्चा वळवला.
अधिका-यांना झापले : खासदार खैरे यांनी सिडको बसस्टँड येथे जालना रस्त्याची पाहणी करताना कार्यकारी अभियंता एम. डी. मोरे, के.टी. वाघ, एन. एस. शेगोकार या सा. बां.च्या अधिकाºयांना तत्काळ हजर होण्याचे फर्मान सोडले. चौकशीअंती 21 कोटी रुपयांतून शासनाने केवळ पाच टक्के निधी दिला आहे. त्यामुळे या रस्त्यांचे केवळ 25 टक्के काम झाले आहे. निधी नसल्याने ठेकेदारांनी काम थांबवले आहे. त्यातच 7 जूननंतर डांबरीकरणाचे काम थांबवा, असे शासनाचे धोरण असल्याने हे काम थांबवले असल्याचे उत्तर सा. बां.च्या अधिकाºयांनी दिले. त्यावर खैरे यांनी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर तोंडसुख घेतले. उच्च न्यायालयाच्या बाजूने विचित्र पद्धतीने केलेले पॅचवर्क पाहिल्यानंतर खैरेंनी अधिकाºयांना सुनावले.
मनपाच्या पॅचवर्ककडे पाठ : एकीकडे खैरे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांवर तोंडसुख घेत असताना, पालिकेच्या विचित्र पॅचवर्ककडे डीबी स्टारने पुन्हा लक्ष वेधले. त्यांनी ठेकेदाराला हजर करण्याच्या सूचना शहर अभियंता सखाराम पानझडे यांना दिल्या. मात्र, पाहणी करणे टाळले. या वेळी महापौर कला ओझा यांच्यासह इतर पदाधिकारी त्यांच्याबरोबर होते.
दर्डांच्या 21 कोटींचे काय झाले ?
- मी पॅचवर्कच्या कामाबाबतही शहर अभियंत्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट काम झाले त्यांची तपासणी करून पुन्हा ठेकेदारांकडून कामे करून घ्या. अन्यथा एकाही ठेकेदाराचे बिल काढून नका, अशा सूचनाही दिल्या आहेत; पण राजेंद्र दर्डा यांनी 21 कोटींचा गवगवा केला. मात्र एकाही रस्त्याचे काम धड चालू नाही.
-चंद्रकांत खैरे, खासदार
माझे कामावर लक्ष आहे
- काम सुरूच आहे. हायकोर्टाकडील रस्त्याच्या कामाबाबत उपअभियंता के.टी. वाघ यांना दोन दिवसांपूर्वीच सूचना दिल्या. कामावर माझे लक्ष आहे.
-राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री
पाच टक्के निधी आला
४21 कोटींतून 5 टक्के निधी मिळाला. तो पुरेसा नसल्याने ठेकेदारांनी काम करण्यास नकार दिला आहे. त्यात शासनाचे 7 जूननंतर काम करा, असे धोरण आहे. कामाची 12 महिन्यांची मुदत आहे. 3 महिन्यांपूर्वी निविदा काढल्या. काम मुदतीत पूर्ण करू.
-एम. बी. मोरे, कार्यकारी अभियंता