आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादानंतर खैरे- कदमांचे झाले ‘बर्फी मिलन’...! वाद झालाच नसल्याचे दाेघांनी दर्शवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम आणि शिवसेना उपनेते, खासदार चंद्रकांत खैरे दोघेही शीघ्रकोपी म्हणून सर्वपरिचित आहेत. ते कधी भांडतील अन् कधी जवळ येतील याचा नेम नाही. शिवसेनेच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी कदम गुरुवारी शहरात दाखल झाले. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच अयोध्यानगरी येथे त्यांनी पाहणी केली. किरकोळ कारणावरून दोघांत जोरदार खडाजंगी झाली. मात्र, शुक्रवारी सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी या दोघांनी एकमेकांना बर्फी भरवून आपण वधूपिता आहोत, आपल्यात वाद नाहीच, असे शिवसैनिकांना दाखवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या पंधरा दिवसांपासून खैरे शहरात तळ ठोकून आहेत ते फक्त विवाह सोहळ्याच्या नियोजनासाठी. त्यांच्यासह शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी दिवसातून दोनदा अयोध्यानगरातील विवाह मंडपाच्या तयारीकडे चक्कर टाकत आहे. शनिवारी हा सोहळा होत असताना गुरुवारी कदम शहरात दाखल झाले. आल्याबरोबर त्यांनी विवाहस्थळाची पाहणी केली. त्यात त्रुटी दिसल्याने कदम खवळले. त्याला खैरे यांनी आक्षेप घेतला. ‘कार्य आहे, असे होणारच, अजून आपल्याकडे वेळ आहे,’ असा युक्तिवाद खैरे यांनी केला. खैरे-कदम यांचे सख्य जगजाहीर आहे. दोघांनीही शाब्दिक आहेर पुढे केला. मात्र, अन्य कार्यकर्ते असल्याने हा वाद तेथेच संपला. शुक्रवारी सकाळी ही मंडळी पुन्हा अयोध्यानगरीच्या मैदानावर दाखल झाली. रात्री दोघांत वाद झाल्याची कल्पना सर्व शिवसैनिकांना झाली होती. आपल्या घरचे कार्य आहे. तेथे वाद झाल्याचे संकेत जाऊ नयेत. यामुळे दोघांनीही सकाळी एकमेकांच्या तोंडात बर्फी घालून आमच्यासारखे संबंध कोणामध्येही नाहीत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही नेत्यांमध्ये गुरुवारी रात्री कसलाच वाद झाला नाही, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. सकाळी पुन्हा पाहणीदरम्यान ते सोबत असताना कोणीतरी बर्फी आणली. ती दोघांनी एकमेकांना भरवली. हे शिवसेनेत नेहमीच घडते. कौटुंबिक वातावरण कायम असते, असे दानवे यांनी सांगितले.

खैरे-कदमअन् वाद असेच समीकरण : कदमजिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याच्या पहिल्या क्षणापासून कदम अन् खैरे यांच्यात वाद होताना दिसतात. पहिल्या दिवशी ते भांडतात, दुसऱ्या दिवशी एकमेकांचे कौतुक करताना थकत नाही. खैरे म्हणतात, कदमांसारखा नेता नाही, तर कदम म्हणतात, खैरेंसारखे कोणी ज्येष्ठ नाही. उद्या जेव्हा येथे सोहळा होईल तेव्हाही हे दोघे एकमेकांचे कौतुक करताना थकणार नाहीत.